राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा-अँड.संदीप ताजने

41

🔸शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.13जुलै):-राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.विविध ठिकाणी आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट घोंघावत असल्याने बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करीत शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी बुधवारी बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी केली.

शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करीत त्यांना मदतस्वरूपी दिलासा द्यावा तसेच ओलादुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे वीज बील माफ करावीत, त्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, तसेच अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना आगामी काळात खत आणि बियाण्यांची खरेदी करण्यासाठी विशेष अनुदानाची घोषणा करण्यात यावी, अशी मागणी देखील अँड.ताजने यांच्याकडून करण्यात आली आहे. यासंबंधी लवकरच पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात येईल,असे ते म्हणाले.

अतिवृष्टीमुळे विदर्भातील ६० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांची हानी झाली आहे. खरिपाची पेरणी अंतिम टप्प्यात असताना शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. राज्यात आतापर्यंत १४१ लाख हेक्टरपैकी १०४ लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. साधारणत: १५ जुलैपर्यंत खरिपाच्या सर्व पेरण्या आटोपतात.पंरतु, संततधार पावसामुळे पेरणी वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत असल्याचे अँड.ताजने म्हणाले.

हिंगोलीतील वसमत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कुरुंदा तसेच परिसरातील गावांच्या शेतातील जमिनी खरडून गेल्या आहेत.सुमारे १५ हजार हेक्टरवरील खरीप पिके,फळपिके, भाजीपाला, बागायती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.तर,बाभूळगाव महसूल मंडळातील ३ हजार ४९५ शेतकऱ्यांचे २ हजार ४६५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.कुरुंदा या महसूल मंडळातील ६ हजार ८४० शेतकऱ्यांचे ५ हजार ३३२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

हवामान विभागाने राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.नाशिक,नागपूरमध्ये सर्वाधिक फटका बसला आहे. तर,गडचिरोली आणि अकोल्यात पुराचा कहर सुरूच आहे. पालघर, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा संकट प्रसंगी खंबीरपणे शेतकर्यांच्या पाठिशी उभे राहावे,असे आवाहन अँड.ताजने यांनी केले.
….