पॉवर हाऊच्या आवारातील पाणी शिरले पाठीमागच्या रामनगरातील घरांत !

34

🔸घरात पोटरीभर पाणी: जेवणासह रात्रही खाटांवरच

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.१४ जुलै)-काल(दि.१३ जुलै) संध्याकाळी ८च्या सुमारास गडचिरोली शहरात जोरदार पाऊस पडला. त्यावेळी पोटेगाव रोड वरील पॉवर हाऊच्या आवारातील पाण्याचा लोंढा पॉवर हाऊसच्या पाठीमागे असलेल्या रामनगरातील संपूर्ण घरांमध्ये शिरला. घरांमध्ये पोटरीभर पाणी साचल्यामुळे येथील लोकांना रात्रीच्या जेवणासह संपूर्ण रात्र खाटांखाटांवर बसूनच जागून काढावी लागली.संध्याकाळी जोरदार पावसाने गडचिरोली शहराला धुवून काढले. पावसाच्या पाण्याचा लोंढा एवढा जोरदार होता की पोटेगाव रोडवरील पॉवर हाऊसच्या आवारातील संपूर्ण पाणी पाठीमागे असलेल्या रामनगरातील सर्व घरांना त्याची झळ पोहोचली.

पॉवर हाऊस वरभागात तर रामनगर त्याच्या सखल भागात आहे. पॉवर हाऊसच्या कंपाँड वॉलला खालून पाण्यासाठी छिद्र ठेवलेले आहेत. मात्र ते सांडपाणी वाहून जाण्यास भिंतीच्या कडेने मोरी बांधलेली नाही. त्यामुळे आज पॉवर हाऊसच्या आवारातील पाण्याचा लोंढा दरम्यानचा नगरपरिषदेने बांधलेला क्राँक्रिट रोड ओलांडून येथील लोकांच्या घरांत शिरले.

पाणी अंगणासह घरात पोटरीच्या वर चढले. त्यात हनीफ सय्यद, इस्माईल शेख, रफिक शेख, शरीफ शेख, कृष्णकुमार निकोडे, अनवर पठाण, शब्बीर बारी, इमरान शेख यांच्या घरांचा समावेश आहे. घरात शिरलेल्या पाण्यात त्यांचे भांडे व कपडे पोहत होते. लोंढ्यांना अंगणातील माती व मुरुम यांचे भरणही उखडून नेले. सदर लोंढा अख्ख्या रात्रभर थांबला नाही. त्यामुळे रात्रीच्या जेवणासह संपूर्ण रात्र खाटांखाटांवर बसूनच जागून काढावी लागली. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र भविष्यात काहीही होऊ शकते, सांगता येत नाही. म्हणून पॉवर हाऊस प्रशासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून आपल्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी यातून संबंधित लोंढाग्रस्त कुटुंबातील लोकांची मागणी होत आहे.