कर्ज मागायला गेलेल्या शेतकऱ्याला शिविगाळ

28

✒️वर्धा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वर्धा(2 जुलै):-दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्या आष्टी तालुक्यातील बोरगाव टुमनीच्या शेतकऱ्याने पीककर्जासाठी साहूरच्या बँक ऑफ इंडियात अर्ज केला. पेरणी सुरू होऊनही कर्ज मिळत नसल्याने त्यांनी बँकेत विचारणा केली. एक-दोन नव्हे तब्बल नऊ वेळा बँकेत जावून आले. तरीही दाद मिळाली नाही. मंगळवारी बँकेत जाताच कर्मचाऱ्यांसह व्यवस्थापक भडकले. शेतकऱ्याला शिविगाळ करून धमकी देण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तर बँक व्यवस्थापकांनी शेतकऱ्यानेच कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्याचे म्हटले आहे.
नागपूर विभागातील एकमेव शेतकरी आत्महत्याग्रस्त वर्धा जिल्ह्यात ६० टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पीककर्ज न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या थांबल्या आहेत. बोरगाव टुमनी येथील शेतकरी हरीश भूमर हे त्यातलेच एक. भूमर यांनी ३ जून रोजी पीककर्जासाठी अर्ज केला. १ लाख ८ हजार रुपये कर्ज त्यांना मिळणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.
९ जून रोजी स्वाक्षऱ्या झाल्यानंतर २० जूनपर्यंत बँकेत न येण्याविषयी बँक व्यवस्थापकांनी बजावले. काही त्रुटी असल्यास फोन करून सांगण्यात येईल, असेही सांगितले. अजूनही कर्ज मंजूर झाले नाही. स्वाक्षरी चुकल्याचे सांगून वारंवार परत पाठविण्यात आले. हंगामात दमडीही नसल्याने भूमर मंगळवारी बँकेत गेले. मात्र बँक व्यवस्थापक अजिंक्य तिनखेडे यांनी पीककर्ज मंजूर करून देण्याऐवजी शेतकऱ्याला ‘तुमच्याकडून जे होते ते करून घ्या. आठ दिवस पुन्हा तुझे कर्ज मंजूर करणार नाही’, अशी धमकी दिल्याचा आरोप भूमर यांनी केला आहे. पण, बँक व्यवस्थापक अजिंक्य तिनखेडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत शेतकऱ्यानेच बँक कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्याचे म्हटले आहे.
करोनाच्या संकटात शेतकऱ्यांना वेळेत कर्ज द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादासाहेब भुसे, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले आहेत. दुर्लक्ष करण्यात आल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिला. पण, कर्ज मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला शिविगाळ करण्यात आल्याने काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे. शेतकऱ्याला शिविगाळ करण्यात येत असल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वरचेवर बँकेत चकरा मारल्या. पण, बँकेने अजूनही कर्ज मंजूर केले नाही. मंगळवारी बँकेत गेल्यावर कर्मचाऱ्यांनी शिविगाळ केली. ही सर्व घटना बँकेच्या गेटबाहेर असणाऱ्या एकाने चित्रीकरणदेखील केले आहे.
– हरीश भूमर, शेतकरी