आषाढ पौर्णिमेचा सार संघम् सरणम् गच्छामी!

काल बुधवारला या वर्षाची आषाढ पौर्णिमा झाली.ही पौर्णिमा तथागत बुध्दाच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित आहे.सार्वजनिक म्हणजे सामाजिक जीवन ! व्यक्तीचे सामाजिक जीवन हे लोक समूहाच्या कल्याणास उत्तरदायी असते.माणूस हा सामाजिक प्राणी आहे.हे निर्विवाद सत्य आहे.त्यात सामाजिक जीवन जगताना त्याला त्याचे भान व ध्येय- दिशा असली पाहिजे.तेव्हाच त्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो.अन्यथा मुके प्राणी काय आणि मानवी प्राणी काय,यात फरक राहणार नाही.जन्मी आला,तो जगेलच ! पण मनुष्य प्राणी म्हणून त्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला पाहिजे.तो त्यांच्या आकलन व निती वर अवलंबून आहे.तथागत बुध्दाने अगोदर आपल्या जगण्याची निती निर्धारीत केली.त्या नुसार इतरांनीही जगावे.पण ते तसे का जगत नाहीत ? हा उत्पन्न मनातील प्रश्न त्यांना सोडवायचा होता.ती धडपड त्यांना मनातीलच सर्जकतेनी ज्ञानी करून गेली.तथागत बुद्ध झाले.मनस्वी विकार मुक्त झाले.ती अखिल मानवतेची सुखद अनुभूती आहे.यातून समाजात, सामाजिक समता, मैत्री व बंधुभाव, एकात्मता निर्माण होवून जग राग, द्वेष,लोभ मुक्त होवू शकतो.

मग चला आता त्या सुखद अनुभूतीत स्वतःच रममाण न राहता,ती सामाजिक उत्तरदायित्वातून इतरांना ही देवून एका नवसमाजाची जग मांडणी करु या ! या हेतूने प्रेरित होउन तथागत बुद्धगयेतून निघाले.अगोदर शोध घेतला,ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेत आपल्याला ज्यांनी मदत केली,सोबत केली,अशांचा पत्ता घेतला.त्यांच्या पैकी केवळ पाच परिव्राजक गंगेच्या तिरावरील सारंगनाथ अर्थात सारनाथच्या जंगलात आताही तपश्चर्या करीत आहेत,ही माहिती मिळाली.तथागत तेथून त्यांच्या भेटीला निघाले.असे म्हणतात आषाढ एकादशीला ते या पाचही परिव्राजक पर्यंत पोहचले.त्यांच्याशी संवाद केला.त्यांचा कुशलक्षेम विचारला.त्यांची इत्यंभूत माहिती घेतल्यानंतर पूर्णचंद्राच्या आल्हाददायक उजेडात म्हणजे आषाढ पौर्णिमेला परिव्राजकांना जीवनाची व त्याच्या जगण्याची दिशा व ध्येय-धोरण सांगितले.ती बुद्धाची पहिली सार्वजनिक धम्मदेसना होती.त्याला पहिले ‘धम्मचक्क प्रवर्तनालया’ म्हटल्या गेले आहे.म्हणजे बुध्दाच्या विचार तत्वाला आपली सहमती त्रिवार साधू करीत देत,त्या प्रतिपादिलेल्या निती मूल्याने जगण्याचा निर्धार परिव्राजकांनी केला.अशा एक विचार तत्वांच्या तालसूरातील दिशादर्शक पहिला समूह म्हणजे बुध्दाचा घडवून आलेला भिक्खू संघ होय.ही प्रक्रिया अगोदर बुद्धत्व म्हणजे ज्ञान,दुसरी प्रक्रिया त्या ज्ञानाचे लोक प्रबोधन व तिसरी प्रक्रिया म्हणजे त्याचा परिणाम तसा लोक समूह अर्थात संघ.आणि संघा द्वारे ज्ञाता म्हणजे बुध्दाला अपेक्षीत समाजाची नवनिर्मिती घडवून आणणे.त्यासाठी ध्येयवेडे लोक लागतात.तेच त्याग व बलिदान करु शकतात.त्याच्या गरजा किमान असल्या पाहिजे.ते कोणत्याही राग,लोभाला बळी पडायला नको.निर्मल मनाचे व सुस्पष्ट आचार-विचाराचे आणि कार्यासाठी नि:स्पृहा असावेत.

असे आदर्श व्यक्ती घडवून आणण्यासाठी त्याला प्रशिक्षित करावे लागते.तेव्हा एक निष्ठेचा ध्येयवेड्या समूहाची निर्मिती होते.त्याला आजच्या भाषेत कॅडर म्हटल्या जाते.ते काम तथागत सिध्दार्थ गौतम बुद्धाने आषाढ पौर्णिमा पासून एका ठिकाणी तीन महिने राहून केले.तेव्हा ६० लोकांचा कर्मठ भिक्खू संघ निर्माण झाला.त्या संघाने प्रचलित असामाजिक मूल्यांना लोकांच्या जीवनातून बाद करीत,त्या ऐवजी त्यांच्यात नीतीमान , सदाचारी मानवीय मूल्य बहाल केली.ती म्हणजे आमुलाग्र क्रांती होती.ती तेव्हाच्या दृढ झालेल्या प्रचलित जगण्याच्या ब्राह्मणी धर्म मूल्यांविरुध्द होती.त्याचे सकारात्मक प्रतिबिंब आपल्याला बुध्दाच्या पंचशीलातून उमटलेले दिसतात.पंचशील काय आहे, मी खोटे बोलणार नाही,चोरी करणार नाही.व्यभिचार, प्राणी हिंसा आणि कोणत्याही प्रकारची नशा पाणी करणार नाही.या प्रतिज्ञा होत्या.म्हणजे तेव्हा पंचशीले विरुद्ध लोकांचे जगणे होते. ते ब्राह्मणी कर्मकांडी होते.असा त्याचा सरळ अर्थ ध्वनित होतो.त्या विरुद्ध बुद्धाचे बंड होते.त्या बंडाला अधिक व्यापक नव्हे तर जनांदोलनाचे स्वरुप आणण्यासाठी चौवीस तास निष्ठेने काम करणारा कॅडर पाहिजे होता. ते घडविण्याचे काम आषाढी पौर्णिमे पासून एका ठिकाणी राहून तथागतांनी केले.त्याला वर्षावास म्हटल्या गेले आहे.या तीन महिन्यांत बुध्दांनी आपल्या संघाला काय सांगितले असेल ? ते विनयपीटकात आहे.पातिमोक्ख यात आहे. विनयपीटक म्हणजे भिक्खुंचे नियम होत.आचार संहिता.

पातिमोक्ख काय म्हणते, भिक्खु-पातिमोक्खात अंतर्भूत असलेल्या अपराधांचे स्थूलपणे केलेले वर्गीकरण असे : (१) पाराजिक : (१) ब्रहाचर्याचे उल्लंघन, (२) चौर्यकर्म, (३) मनुष्यप्राण्याची जाणूनबुजून हत्या करणे किंवा त्यास आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने मरणाचे गोडवे गाणे आणि (४) स्वतःच्या ज्ञानाविषयी वा सामर्थ्याविषयी पोकळ बढाई मारणे, आपण काही अतिमानवी शक्ती संपादन केल्याचा आव आणणे, ह्या अपराधांचा ह्या वर्गात समावेश होतो. हे अपराध अत्यंत गंभीर स्वरूपाचे मानले असून ते केल्याबद्दल संबंधितास संघातून हाकलून द्यावे, असे सांगितले आहे.(२) संघादिदेस : ह्या वर्गात १३ अपराध येतात. ब्रह्मचर्यभंगाला अनुकूल अशा काही गोष्टी करणे, संघभेद वा त्याला पोषक अशा गोष्टी करणे, संघाने वेळोवेळी दिलेले आदेश धुडकावणे, आपल्या सहकार्यांवर पाराजिक धर्माचे खोटे आरोप करणे, अशा अपराधांचा त्यांत अंतर्भाव होतो. (३) अनियत-धम्मा : परिस्थितिजन्य पुराव्याच्या आधारे सिद्ध करावयाचे दोन अपराध ह्या वर्गात येतात. (४) निस्सग्गिय-पाचित्तिया : ह्यात येणारे अपराध ३० आहेत. आचारधर्माचे उल्लंघन करून काही वस्तू मिळविण्याच्या संदर्भातील हे नियम आहेत. अशा वस्तू, गुन्ह्याची कबुली देऊन परत केल्यास क्षमा होऊ शकेल परंतु तसे न केल्यास संबंधित वस्तू जप्त करण्याची तरतूद आहे. (५) पाचित्तिया : ह्यात ९२ अपराध येतात. त्यांतील काही असे : जाणूनबुजून खोटे बोलणे, सुरापान करणे, जाणूनबुजून प्राण्यांची हत्या करणे, कुचेष्टा करणे, अनादर करणे, इतर भिक्षूंची निंदा करणे, स्त्रियांशी लगट वा सहशय्या करणे, विहाराच्या मालकीच्या वस्तूंची हेळसांड करणे, नेमणुकीवाचून भिक्षुणींना धर्मोपदेश करणे इत्यादी. (६) पाटिदेसनीय : हे अपराध चार आहेत. अनुज्ञेवाचून किंवा आमंत्रणावाचून अन्न घेण्याबाबतचे हे अपराध आहेत. ते केल्यास जाहीर रीत्या दिलगिरी प्रदर्शित करणे आवश्यक मानलेले आहे. (७) अधिकरण-समथ : संघातील वादांचे निराकरण करण्याचे सात प्रकार येथे नमूद केलेले आहेत. ह्या प्रकारांचे उल्लंघन करणे म्हणजे अपराध होय, असे मानले आहे. (८) सेखिया : सादाचारांचे ७५ नियम ह्यात दिलेले आहेत. उदा., भिक्षूने गावात कशा प्रकारे प्रवेश करावा, त्याचे खाणे-पिणे, संभाषण, कपडे वगैरे कसे असावे इत्यादी. ह्या ७५ नियमांचे उल्लंघन म्हणजे ७५ प्रकारचे अपराध होत तथापि हे ७५ नियम पातिमोक्खात नंतर अंतर्भूत केले असावेत, असा अभ्यासकांचा तर्क आहे. भिक्षुणींच्या अपराधांचे वर्गीकरणही वरीलप्रमाणेच आहे. तथापि त्यात आलेल्या अपराधांची संख्या अधिक आहे.या संहिते द्वारे तथागत बुद्ध आपल्या संघाला नियंत्रणात ठेवतात.त्यातून बुध्द धम्म हा समाजात आदर्श अनुनयी ठरला.त्या प्रभावाने सर्वदूर गेला.

असेच काही सामूहिक धर्मांतरावेळी आपल्या नवदीक्षीत बौध्द समाजाला नियंत्रित ठेवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २२ प्रतिज्ञा दिल्या आहेत.आणि त्यांच्यात तसे संस्कार घडवून यावे यासाठी सामाजिक संस्कार केंद्राची संकल्पना मांडली होती.तर त्यातून धम्म प्रचारक निर्माण करण्यास प्रशिक्षण केंद्र उभारणीची रचना केली होती.पण ते सर्व काही घडवून आणण्यास तथागत बुध्दा प्रमाणे या युगातील बुध्द पुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वेळ व संधी नियतीने दिली नाही.लागलीच धर्मांतराच्या अडीच महिन्यांत त्यांचे महापरिनिर्वाण झाले.डॉ.बाबासाहेब हे कायेने या लोकांतून निघून गेले होते.पण विचार,ध्येय-धोरणाने लोकांच्या मनामनात जीवंत राहिले.खंत अशी तो लोकांनी बाबासाहेबांचा वैचारिक जीवंतपणा व्यवहारात अंगिकारला नाही.परिणामत: संघाच्या जोरावर ब्राह्मणांनी पुन्हा प्रतिक्रांती घडवून आणली.सांगण्याचे तात्पर्य असे,बुध्द पुरुषांचे विचार जीवनात अंगिकारण्यासाठी असतात.ते दुःख मुक्ती साठी असतात.त्याचा सिंहनाद तथागत बुद्धांनी आषाढ पौर्णिमा पासून केला होता.त्या निमित्ताने आम्ही बौध्द म्हणून बुध्द तत्वज्ञान सांगत आषाढ पौर्णिमा साजरी करीत आहोत.अशात त्याला आधार ज्ञान आहे.(बुध्दीमत्ता), नितीमत्ता ( धम्म ) आहे. पण त्यातील खरे आचरणशील तत्व संघं सरणम् गच्छामी….नाही.मग बुध्द व धम्माला काय अर्थ उरतो ? बौद्धांनी , बुध्द-आंबेडकरांच्या धम्मा पासून सार म्हणून ‘ संघ ‘ स्वीकारुन जीवनात अंगिकारले पाहिजे.त्यासाठी प्रज्ञावंतांनी पुढे येवून वस्त्या-वस्त्यातील बुध्द विहारांना धम्म संस्कार केंद्र केली पाहिजेत.धम्म प्रचारकांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारली पाहिजेत.

आपल्याच लोकांविषयी परस्पर अविश्वास आणि नकारात्मक मानसिकता घालविली पाहिजे.तसे भावनिक नातेसंबंध बौध्दात आंबेडकरी म्हणून आहे.फक्त त्याला एका तालसूरात जखडायचे आहे. येवढ्याच साठी या निमित्ताने आम्ही बौद्धांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न म्हणून हा आलेखीय प्रपंच आहे.

बुध्दं सरणम् गच्छामी !
धम्मं सरणम् गच्छामी !!
संघम् सरणम् गच्छामी !!!

✒️मिलिंद फुलझेले,नागपूर(मुख्य संपादक दैनिक बहुजन सौरभ)मो:-७७२१०१०२४७

नागपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED