खासदारांनी घेतला जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचा आढावा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि. 16जुलै ):-जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृहात घेण्यात आली. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना खासदार श्री. धानोरकर म्हणाले, दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना व सरल सेल्फ प्रशिक्षण केंद्राद्वारे जास्तीत जास्त युवक – युवतींना प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसेच प्रशिक्षण झाल्यानंतर स्वयंरोजगाराकरीता बँकांनी उमेदवारांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची प्रलंबित कामे त्वरीत पूर्ण करावी. केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या विद्युत समस्यांबाबत दर तीन महिन्यात खासदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेणे आवश्यक आहे. तसेच पावसाळ्याच्या दिवसात जेथे वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो, तेथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी विद्युत विभागाने उपाययोजना कराव्यात.

सद्यस्थितीत जिल्ह्यात आलेल्या पूर परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचे खासदारांनी कौतुक केले. पुरामुळे विस्थापित झालेल्या लोकांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच वाढती कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्याकरीता आरोग्य विभागाने नियोजन करावे, अशा सुचना खासदारांनी केल्या. यावेळी त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दिनदयाल अंत्योदय योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना आदींचा आढावा घेतला.

बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

००००००

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED