प्रसूतीनंतर काही क्षणांत माय-लेकाची ताटातूट

  54

  ✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  नागपूर(3जुलै):-नऊ महिने गर्भात वाढविलेला जीव बाळंतपणानंतर जगात आल्यावर त्यापासून काही क्षणातच दूर राहण्याचा प्रसंग एका मातेवर ओढवला. या चिमुकल्याला करोनामुळे आईपासून विलग करण्यात आले आहे.
  डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालयातील डॉक्‍टरांनी या गर्भवतीची प्रसूती केली. प्रसूतीनंतर महिला करोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. डागात करोनाबाधितांवर उपचाराची सुविधा नसल्याने प्रसूतीनंतर महिलेला तत्काळ मेयोत हलविण्यात आले. बाळ आणि प्रसूत माता दोघांनाही मेयोत नेण्यात आले. मात्र खबरदारी म्हणून चिमुकल्याला आईपासून दूर ठेवण्यात आले. आता बाळाचीही करोना चाचणी केली जाणार आहे. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तरी या मुलाला पुढचे काही दिवस मातेच्या कुशीपासून दूर रहावे लागणार आहे. बाळाला बाधा होऊ नये म्हणून आईने काळजावर दगड ठेवत त्याला दूर ठेवा असे सांगितले.
  अधीक्षक नॉट रिचेबल
  डागा रुग्णालयात प्रसूत माता करोनाबाधित आढळल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवे यांच्याशी संपर्क साधला. मात्र वारंवार मोबाइलवर संपर्क साधल्यानंतरही त्या प्रतिसाद देत नव्हत्या. यापूर्वीही त्यांच्या बाबतीत असाच अनुभव अनेकांना आला आहे. त्यांचा फोन नुसताच खणखणत असतो. प्रतिसाद कधीच मिळत नाही. त्यामुळे एखाद्या गंभीर प्रसंगी कुणाशी संपर्क साधावा असा प्रश्न उपस्थित होत आहे.