जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडणार

33

🔹गोदाकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9404223100

बीड(दि.20जुलै):-जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे विसर्गाची शक्यता लक्षात घेत गोदाकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आला आहे, दरम्यान, पाथरवाला बुद्रुक येथील उच्च पातळीच्या बंधाऱ्यातून सोमवारी (ता.१८) पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पैठणचे जायकवाडी धरणातील जलसाठ्यात भर पडत आहे. असून पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक सुरू आहे. ही आवक अशी सुरू राहिली तर जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने नदीकाठच्या गावांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यात, नदीपात्रात कोणी जाऊ नये, पशुधन नदीपात्रात नेण्यात येऊ नये. तसेच पूरपरिस्थितीच्या दृष्टीने जीवित व मालमत्तेची हानी टाळण्यासाठी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना अंबड, घनसावंगी, परतूर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवासी जिल्हाधिकारी केशव नेटके यांनी दिल्या आहेत.

पाथरवाला बंधाऱ्यातून सोडले पाणी

पाथरवाला बुद्रुक येथील उच्च पातळी पाणी बंधाऱ्यातील जलसाठ्यात वाढ होत आहे. त्यातच रविवारपासून (ता.१७) रेवकीची नदी, जळगाव येथील नदीसह गेवराई तालुक्यातील धोंडराई आदी भागातून पाण्याची नदीपात्रात आवक होत आहे. त्यामुळे सोमवारी पाथरवाला उच्च पातळी बंधारा ९१ टक्के क्षमतेने भरला. पाण्याची आवक लक्षात घेता दुपारी १ वाजेपासून बंधाऱ्याचे १ दार उघडून नदीपात्रात ५ हजार ५३३ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. बंधाऱ्यातील आवक पाहून गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येऊ शकते, असे लघू पाटबंधारे विभागाचे उपअभियंता प्रकाश फुलवलकर यांनी कळविले आहे.

जोगलादेवीत ७० टक्के पाणी

घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यात सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत ७०.६३ टक्के जलसाठा नोंद झालेला आहे. या बंधाऱ्यात एकूण जलसाठा हा १०.०१६ दशलक्ष घनमीटर इतका आहे. बंधाऱ्यातील जलसाठ्यात पावसाळ्यात भर पडत आहे.

लोणी सावंगी बंधाऱ्यात ४९ टक्के पाणी

गोदावरी नदीवरील लोणीसावंगी येथील बंधाऱ्यात सोमवारी सकाळपर्यंत ४९ टक्के जलसाठा नोंद झालेला आहे. या बंधाऱ्यात एकूण जलसाठा हा २९.९७९ दशलक्ष घनमीटर इतका आहे.

राजाटाकळीतील जलसाठा ६३ टक्के

गोदावरी नदीवरील राजाटाकळी येथील बंधाऱ्यात सोमवारी सकाळपर्यंत ६३.६९ टक्के जलसाठा नोंदविला गेलेला आहे. या बंधाऱ्यात एकूण जलसाठा हा २५ दशलक्ष घनमीटर इतका आहे, असे लघू पाटबंधारे विभागाने कळविले आहे.

मंगरूळला ७६ टक्के जलसाठा

घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यात सोमवारी सकाळपर्यंत ७६.६० टक्के जलसाठा नोंद झालेला आहे. या बंधाऱ्यात एकूण जलसाठा हा २५ दशलक्ष घनमीटर इतका आहे.