सरकारी कर्मचा-यांच्या पगारात कपात होण्याची शक्यता : ना.वडेट्टीवार

  110

  ✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  पुणे(3जुलै):पुढच्या महिन्यात पगार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला कर्ज काढण्याची वेळ पडेल अशी परिस्थिती आहे. मात्र जे कोरोनासाठी काम करतायत त्यांचा पगार व्यवस्थित होईल. परंतु इतरांबाबत थोडसं मागे पुढं होऊ शकतं. चार महत्वाचे विभाग वगळता इतर विभागांमध्ये काटछाट करण्याची वेळ येऊ शकते, असं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

  यावेळी ते म्हणाले की, सारथी संस्था सुरू राहील. यावर्षी देखील सारथी संस्थेसाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. मात्र सारथी बद्दल काहीजण गैरसमज पसरवून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. हे राजकारण कोण करतय याबद्दल मी आत्ता बोलणार नाही, असं ते म्हणाले.

  वडेट्टीवार म्हणाले की, सारथीच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. फक्त प्रशिक्षण देण्यापुरती सारथी मर्यादित राहणार नाही. सारथीला साधारणपणे ३८ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. येणा-या कॅबिनेट मिटींगमध्ये याचा निर्णय घेणार आहे, असं ते म्हणाले.

  सारथीला आम्ही आर्थिक मदत नक्की करणार आहोत. पण त्यामधे थोडं पुढं मागं होऊ शकतो. कारण आधी कोरोनासाठी काम करणा-यांना मदत होणं गरजेचं आहे. कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती गंभीर आहे आणि ती पुढच्या डिसेंबरपर्यंत चालेल असं तज्ञ सांगतात, असंही त्यांनी सांगितलं.

  वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र सरकारकडून कोणतीही मदत झालेली नाही. पीएम केअर फंडाला मदत करा असं सांगणारे महाराष्ट्र द्रोही आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे अजुनही सत्ता गेल्याच्या शॉकमधून बाहेर येऊ शकलेले नाहीत, असं ते म्हणाले.