वरोरा व भद्रावती तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची जिल्हाधिका-यां कडून पाहणी

29

🔹दोन्ही तालुका यंत्रणेचा आढावा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि. 22जुलै):-गत 15 दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे वर्धा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. या पुरामुळे वरोरा तालुक्यात 9548 हेक्टर तर भद्रावती तालुक्यात 7800 हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले तसेच घरांची पडझड झाली. या नुकसानीची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पिपरी, कोंढा, पाताळा, पळसगाव, भद्रावती, करंजी, आणि वरोरा येथे प्रत्यक्ष भेट दिली.

यावेळी तालुका यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी म्हणाले, शेत पीक नुकसनीचे पंचनामे त्वरित हाती घ्यावे. तसेच पड़झड झालेल्या घरांचे पंचनामे पूर्ण करावे. रेशन धान्य वेळेत गावात पोहोचेल अशी व्यवस्था करावी. पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांची यादी करून जिल्हा कार्यालयास सादर करावी. पशुसंवर्धन विभागाने चाऱ्याचा आढावा घ्यावा व मागणी नोंदवावी. शेतकऱ्यांची वीज तपासून चालू करावी. पूरग्रस्त भागात पिण्याचे स्वच्छ पाणी, परिसरात फॉगिंग मशीनने फवारणी करून आरोग्य तपासणी त्वरित करावी, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. यावेळी त्यांनी गावक-यांशी संवाद साधत शेत, घर, गोठे याबाबत माहिती घेतली.

पाहणी दरम्यान आमदार प्रतिभा धानोरकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, सा. बा. विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कुंभे, भद्रावतीचे तहसीलदार श्री. सोनवणे, वरोराचे तहसीलदार रोशन मकवाने यांच्यासह दोन्ही तालुक्याचे गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व इतर सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.