‘संवेदनशील’ असतात ते….!

28

सध्या नवीन सत्र सन 2022-23 च्या शाळा सुरू झाल्यात, एव्हाना महिना उलटून गेला. खरे पाहता हे नवीन सत्र पुढील इयत्तेत प्रवेश करणाऱ्या मुलांसाठी त्या इयत्तेपुरते नवीन तसे अगोदर शिकल्यामुळे सारखेच! पण, जी मुले नेमकीचं शाळेत आपले पहिले पाऊल पहिल्या इयत्तेत ठेवतात, त्यांच्यासाठी जणू ते नवीन जग असावे. विश्व तसे खूप मोठे आहे; इतके मोठे की यात हजारो प्रजाती सामावल्या आहेत. त्यातील माणूस एक प्रजात. ज्यांचे जग खूप विखुरलेले आहे. ते विखुरलेले आहे म्हणून बरेच अलग आहे. मोठ्यांसाठी शहरी-ग्रामीण असले तरी मुलांसाठी यातही भाग आहेत. त्यातला आपले म्हणावे असे जग म्हणजे स्वतःचे घर-परिवार, दुसरे जग हे आसपासचा परिसर,तिथली मुले आणि शाळेत गेल्यावर मिळणारे तिसरे जग. त्या जगात बरीच दुसऱ्या त्यांच्या जगातील मुले आणि अनोळखी शिक्षक माणसांचा समुदाय असतो.

त्या नवीन जगात प्रवेश करताना सगळे आश्चर्य असतात. ती आश्चर्य भारावून टाकणारी असतीलही पण ती आश्चर्य सुंदरतेने भरलेली असतानासुद्धा बालमनाला तिथे जोडून ठेवण्यास असमर्थ ठरतात. मुलांचा ओढा शाळेकडे पालकांच्या ओढीमुळे ओढला जातो. शाळेतल्या शिक्षकांचे बालमानसशास्त्र कितीही प्रगल्भ असून जर ते प्रत्यक्षात राबवायला वेळ घेत असेल तर अज्ञानच म्हणावे लागेल. पहिल्या इयत्तेत शिकणारी असोत की आताच्या काळात तीन वर्षापुढील एल.के.जी., यु.के.जी. त शिकणारी मुले असोत, त्यांना मानसिकदृष्टया तिथे टिकवणे आवश्यक आहे. कारण ती शरीरासोबत मनानेही तिथे रमली तरच पुढच्या इयत्तेत ती सक्षम होऊन जातील. नाहीतर फळ जसे झाडाला वाढते, कधी परिपक्व तर कधी अपरिपक्व होऊनही, काही दिवसे घेऊन गळून पडते. म्हणून ही मुले नावाला गुण घेऊन पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन शिक्षणाने जरूर मोठी होतील पण लहानपणी जर त्यांच्या मानसिकतेकडे ध्यान जर नाही दिले तर सामाजिकदृष्ट्या मागासच राहतील.

मी हे का म्हणत आहे? ‘संवेदनशील’ असतात ते म्हणून! आम्हाला लाजाळूची लाजणारी पाने दिसतात, जखम झाल्यावर विव्हळणे आणि हळहळणेही जमते. पण, जर मुलांमधील मानसिक संतुलन संतुलित नाही करता आले तर शिक्षक म्हणून फक्त अध्यापन करणारा अध्यापकच होऊ.

मुलांना शाळेत रमायला लावणारी कारणे बरीच असतील, पण त्यांना शाळेपासून आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासापासून दूर न्यायला एखादे कारण पुरेसे होईल. संवेदनशील सगळीच मुले असतात. काहींच्या संवेदना धारधार, तर काहींच्या सरासरी, काहींच्या बोथट असतात. पण संवेदना असतात, हे महत्वाचे! मुळात घरी आपल्यात मनसोक्त हसून खेळणारा, शाळेत ‘विद्यार्थी’ कधी होऊन जातो हे कळेपर्यंत त्याचा सरळ अभ्यास सुरू होतो आणि अभ्यासाच्या धामधुमीत बालपण मात्र हरवत जाते. अभ्यास तर असावा पण ते करण्यात अडचणी येत आहेत का हे शोधावे. अडचण कोणती हे शोधावे. ती बौद्धिक आहे की सामाजिक, मानसिक हे शोधावे. एखादी गोष्ट नाही जमली म्हणजे अध्ययनअक्षम आहे, किंवा अभ्यासात आळशी आहे, हे सरळ सरळ मनात कल्पनाभाव आणून निकाल घोषित करायला गडबड करून लगेच त्याला नीट किंवा सेट परीक्षा देऊन उच्च अभ्यासक्रमाला प्रवेश नाही घ्यायचा. अडचणीचे खरे कारण समोर आल्यावर पुन्हा त्या कारणाचे कारणच दूर केल्यावर अडचण कमी होत होत नाहीशी होईल.

मुले शाळेत येतात. काही रमतात, काही खेळतात, तर काही झुरतात, काही भरकटतात. प्रगती होत असेल तर कारणाच्या मागे लागण्याचे कारण नाही. पण, मागे राहण्याला कारण शोधणे हे प्रथम प्राधान्य शिक्षक म्हणून असावे.बरीच मुले शाळेतून आल्यावर नाराज दिसतात. नाराज का? तर मला शाळेत मुलांनी सतावले; मॅडमला सांगितले तर त्यांनी मी मोठा आहे (शरीराने) म्हणून मलाच मारले; मी कमी बोलतो म्हणून मला मारले; माझी पाण्याची बाटली कोणीतरी फेकून दिली; कोणीतरी माझ्या शर्टवर पेन्सिलच्या रेषा मारल्या; दुसरा मुलगा तक्रारी घेऊन शाळेत आल्यावर मी दोषी म्हणून शहानिशा न करता गुरुजींनी मलाच शिक्षा दिली. अशी बरीच नाराजीची कारणे मुले आईवडिलांना सांगतात. आता ही कारणे जरी नेमकी याच शब्दात नसली तरी त्यांचा भाव नेमका असाच असतो. मुले अशी करतच असतात म्हणून आपण दुर्लक्ष करतो. सगळेचजण जेव्हा दुर्लक्ष करतात तेव्हा मुलांचे व्यक्तिमत्व संपायचे लक्ष्य सुरू होते.

आपल्यालाही ही कारणे फार शुल्लक वाटत असतील, पण मुलांच्या भावविश्वात ती खूप मोठी आहेत. शाळेपासून आणि स्वयंविकासापासून दूर न्यायला पुरेशी आहेत. त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.मुलांसाठी गुरुजी हा ‘न्यायाधीश’ असावा. मुलांमुधील ज्या काही दिसणाऱ्या छोट्या वाटणाऱ्या भानगडी असतील त्यांना वेळीच जर आपण शमवत नसेल तर आपण ‘धृतराष्ट्र’च होऊ. मुलांची प्रत्येक तक्रार ही ऐकली जावी, ती नाही ऐकली गेली तर त्यांच्या पालकांकडे जाईल. आणि जेव्हा पालकांकडे तक्रार जाते तेव्हा एक ‘वकील’ न्याय मागायला आपल्याकडे येतो. तेव्हा दिलेला न्याय कोणत्यातरी बाजूला निश्चितच पटणारा नसतो. म्हणून शिकवणे हे आद्यकर्तव्य असले तरी शिक्षणशास्त्रात ‘बालमानसशास्त्र’ करमणुकीचा विषय नाही. याचा विचार नक्कीच करावा.

सर्वच मुले भेदरट नसतात, आणि काही मुले सुरुवातीपासूनच निडर असतात. त्यांचा तो स्वभाव त्यांचे कौटुंबिक वातावरण आणि काही अंशी त्यांचे ‘जीन्स’ बनवत असतात. हे सर्व बदलायला आपण संशोधक, शास्त्रज्ञ व थेरपिस्ट नाही पण गोळ्याला आकार देणारे कलाकार नक्कीच आहोत. काही कलाकार पारंगत व न्यायी आहेत, त्यांचे स्वागत व आभारच. पण जे अध्यापक आहोत म्हणून फुशारकी मिरवत आहेत, त्यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून पुन्हा एकदा विचार करणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थी केंद्रस्थानी आणायचा असेल तर त्याचे मोठी परीघ मोठया विचाराने जोडावे लागेल आणि केंद्रापासून परिघावरील प्रत्येक बिंदू समान अंतरावर असतो, हा समान विचार शिक्षक म्हणून करावा लागेल.

शिक्षक म्हणून शिकवतानाचा व्हिडीओ किंवा मुले आत्मविश्वासपूर्वक उत्तर देतानाच व्हिडीओ स्टेटस म्हणून डिस्प्ले करणे आपल्याला जितके महत्वाचे वाटते. तितकेच महत्वाचे त्याच व्हिडिओत एक मुलगा नाराज का आहे? हे का जेव्हा मनात येईल तिथून माणूस घडवणारे कलाकार म्हणून तुम्ही आसमंतात झळकून निघालं. नाहीतर तुमच्या स्टेटसच्या नादात, 80-90 टक्के करण्याच्या नादात एक जरी पोरगा स्वयंमग्न होण्यास मजबूर झाला तर अख्खी पिढी काही दशके, पुढे शेतके अप्रगत राहील.

मुलं घडते,
याचा अर्थ रमते…
होत असेल तर,
घडण्याची व्याख्या शोधा..
व्याख्या जर कळली-
तर आम्हालाही सांगा..!!

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(लेखक/कवी/व्याख्याते,नांदेड )