पोंभुर्णा ग्रामीण रुग्‍णालयात १३ पदे कंत्राटी स्‍वरुपात भरणार

28

🔹२२ जुलै रोजी शासन निर्णय निर्गमीत

🔸माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलित

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.24जुलै):- जिल्‍हयातील नवनिर्मीत ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे १३ पदे कंत्राटी पध्‍दतीने भरण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. सार्वजनिक आरोग्‍य विभागाने दि. २२ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमीत केला आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार या संदर्भात केलेल्‍या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले आहे.

आदिवासी बहुल पोंभुर्णा तालुक्‍यातील पोंभुर्णा ग्रामीण रुग्‍णालयाची इमारत बांधून तयार आहे. मात्र विविध वैद्यकीय उपकरणांची उपलब्‍धता आणि पद भरती यामुळे सदर ग्रामीण रुग्‍णालय जनतेच्‍या सेवेत रुजु होण्‍यासाठी विलंब होत आहे. यादृष्‍टीने दि. १७ जुलै २०२२ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्‍य विभागाचे अतिरिक्‍त मुख्‍य सचिव प्रदिप व्‍यास यांच्‍यासह आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत सदर ग्रामीण रुग्‍णालयासाठी तातडीने पद भरती कंत्राटी स्‍वरुपात करण्‍याचे निर्देश आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. राज्‍यात आरोग्‍य व्‍यवस्‍थेची जवाबदारी सांभाळणा-या अधिका-यांनी अत्‍यंत संवेदनशिलपणे आणि सतर्क राहून काम करावे, केवळ अडचणी न सांगता तातडीने उपाय सुचवुन कार्यवाही करण्‍याचे निर्देश त्‍यांनी यावेळी दिले. त्‍यानंतर केवठ आठच दिवसात कंत्राटी स्‍वरुपात सदर ग्रामीण रुग्‍णालयात पद भरती करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

पोंभुर्णा ग्रामीण रुग्‍णालयात कंत्राटी मनुष्‍यबळ उपलब्‍ध करण्‍याच्‍या दृष्‍टीने अधिपरिचारीका ४ पदे, क्ष किरण तंत्रज्ञ १ पद, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १ पद, प्रयोगशाळा सहायक १ पद, कनिष्‍ठ लिपिक १ पद, शिपाई १ पद, कक्ष सेवक ४ पदे अशी एकुण १३ पदे कंत्राटी स्‍वरुपात भरण्‍याचा निर्णय दि. २२ जुलै रोजीच्‍या शासन निर्णयाद्वारे घेण्‍यात आला आहे.

सदर ग्रामीण रुग्‍णालयाचे लोकार्पण १५ ऑगस्‍ट २०२२ रोजी करण्‍याचे निर्देश आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्‍य प्रशासनाला दिले असुन त्‍या पार्श्‍वभूमीवर सदर ग्रामीण रुग्‍णालयात कंत्राटी स्‍वरुपात पद भरतीचा निर्णय हा महत्‍वपूर्ण मानला जात आहे.