पवार साहेब, तेव्हा जितेंद्र आव्हाडांना एकटे का पाडले ?

57

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

परवा पुणे येथे इतिहास अभ्यासक आणि प्रसिध्द शिव व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना जेष्ठे नेते शरद पवार यांनी बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांच्यावर घणाघाती टिका केली. पुरंदरेंनी शिवचरित्र भ्रष्ट केल्याचे सांगितले तसेच दादाजी कोंडदेव यांचा संबंध नसताना तो जोडला गेल्याचेही सांगितले. पवार एकदम सडेतोड आणि मनमोकळं बोलले. गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात हा विषय चर्चेत असतो. या वरून अनेकवेळा वादंग होते. पवारही अध्येमध्ये हेच बोलतात. शरद पवार परवा पुण्यात जे बोलले त्यात चुकीचे, खोटं किंवा अवास्तव काहीच नाही. त्यातला शब्द ना शब्द खरा आहे पण पवार त्यावर ठाम राहतात का ? हा महत्वाचा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बळवंत पुरंदरेंना महाराष्ट्र भुषण पुरस्कार देण्यात आला होता. तत्कालीन महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाविरूध्द चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, प्रतिमा परदेशी यांनी राज्यभर ‘शिवसन्मान’ परिषदा घेतल्या. सरकारचा व पुरंदरेचा निषेध करत मोठ्या प्रमाणात विरोधाची चळवळ उभा केली. या ‘शिवसन्मान’ परिषदांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता.

राज्य सरकारच्या निर्णयाविरूध्द लोकमानस तयार झाले होते. याचा कसलाही विचार न करता फडणवीस यांच्या सरकारने पुरंदरेंना पुरस्कार दिलाच. बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांनीही तो लापटासारखा घेतला. पुरस्कारावरून वादविवादाचा चिखल खुपच माजला होता. पुरस्कार घेण्यात सन्मान राहिलाच नव्हता तरीही त्यांनी तो घेतला. त्यावेळी ज्ञानेश महाराव, जितेंद्र आव्हाड आणि प्रतिमा परदेशी मोठ्या ताकदीने पुरंदरेंच्या नालायकीविरुध्द लढत होते. त्यांची भूमिका अवघ्या महाराष्ट्राला समजावून सांगत होते. तेव्हा त्यांना शरद पवार किंवा त्यांंच्या पक्षाने पाठींबा दिला नाही. त्या वेळी राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हांडाची ती व्यक्तीगत भूमिका आहे पक्षाची नाही असे सांगितले गेले. शरद पवार आणि राष्ट्रवादीने हात झटकले. पक्षाने किंवा पवारांनी आव्हाडांना पाठबळ दिले नाही. तेव्हा जे आव्हाड सांगत होते, महाराव सांगत होते तेच जर आज पवार सांगत असतील तर तेव्हा पवारांनी त्यांना पाठींबा का दिला नाही ?

जितेंद्र आव्हाडांनी त्यावेळी जे सांगितले तेच आज शरद पवार सांगत असतील तर तेव्हा पवार गप्प का होते ? तेव्हा त्यांनी पुरंदरेंच्या महाराष्ट्र भुषण पुरस्कारावर आक्षेप का घेतला नाही ? राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यावर त्यांचा पुरस्कार माघारी का घेतला नाही ? शिवचरित्राचे सर्वाधिक नुकसान करणा-या इसमास महाराष्ट्र भुषण पुरस्कार देणे म्हणजे शिवरायांची थट्टाच होती. पुरंदरेंनी शिवचरित्राचे सर्वाधिक नुकसान केलेले असतानाही त्यांचा पुरस्कार माघारी घेण्याची सुचना शरद पवारांनी का केली नाही ? आज बळवंत पुरंदरे हयात नाहीत. ते हयात असताना शरद पवारांनी असा आक्षेप का घेतला नाही ? या उलट पवारांचे व पवार फँमिलीचे पुरंदरेंशी नेहमी सलोख्याचे संबंध राहिले आहेत. त्यांनी त्याचवेळी पुरंदरेंच्या या उचापतींचा पुढे येवून साधा निषेधही का केला नाही ? बैल गेल्यावर झोपा करण्याला शहाणपण म्हणत नाहीत. पवार असे दुटप्पी का वागतात ? काही दिवसापुर्वी अमोल मिटकरींनी कन्यादानाबाबत आणि भटशाहीबाबत बोलल्यानंतर मोठे वादंग माजले. त्यानंतर पवारांनी अमोल मिटकरींना एकाकी पाडत पुण्यात ब्राम्हण महासभेसोबत सलोखा बैठक का आयोजित केली ? पवार दोन्ही डगरीवर हात का ठेवतात ? तारूण्यातल्या गमती-जमती ठिक आहेत पण आयुष्याच्या संध्याकाळी तरी त्याच्या पलिकडे जायला हवे.

सत्याची ठामपणे पाठराखण करायला हवी. पश्चातबुध्दी यायला हवी. पवार आणि त्यांचा पक्ष या भूमिकेवर इथून पुढे ठाम राहणार का ? पुन्हा सत्तेत जाण्यासाठी व येणा-या निवडणूकीत मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठीच ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर झुंज लावून देण्याचा उद्योग पवार नव्याने खेऴत आहेत का ? असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही.

बळवंत पुरंदरेंनी शिवचरित्र विकृत केले, शिव चरित्राची विटंबना केली. शिव चरित्रात अनेक घटना संदिग्ध व संशय निर्माण होतील अशा जाणिवपुर्वक लिहील्या. त्यांच्या ‘शेलारखिंड” या पुस्तकात तर त्यांनी शिवरायांना ‘जोक्ता’ म्हंटले आहे. पण हा शब्द त्यांनी शत्रूच्या तोंडी घातला आहे. पुरंदरेंनी जातीय अभिनिवेषात शिव चरित्राची मांडणी केली आहे. त्यांनी शिवरायांचा इतिहास लिहीला की स्वजातीय गौरवाचे चोपडे लिहीले ? असा प्रश्न पडावा असे लिहीले आहे. पाना-पानावर त्यांनी मांडलेली पंतांची लुडबूड, पंतांचे महात्म्य, फुगवलेले ‘पंत’ प्रकरण पुरंदरेंच्या मनातील विकृत जातीयवादाचा पुरावा आहे. शिवरायासाठी व स्वराज्यासाठी बलिदान देणा-या इतर मावळ्यांना तेवढे महत्व या चरित्रात त्यांनी दिलेले नाही. स्वराज्यासाठी धारातिर्थी पडलेल्या अनेक मावळ्यांना त्यांनी एका शब्दात निकालात काढले आहे. त्यांची दोन ओळींचीही दखल घेतली नाही. ज्यांची दखल घेतली त्यांना दुय्यम, तिय्यम स्थान दिले आहे. अख्ख्या पुस्तकात फक्त ‘पंतपुराण’ मांडले आहे. खरेतर ते ‘शिवचरित्र’ आहे की ‘पंत पुराणा’ ची चोपडी आहे ? असा प्रश्न सदरचे पुस्तक वाचताना पडतो.

पुरंदरेंनी इतिहासाशी व शिवचरित्राशी केलेली ही नमकहरामी आहे. हा प्रकार त्यांना माफ करण्यासारखा नाहीच. पण शरद पवारांना आज जे उमगलय ते या पुर्वी का उमगले नाही ? पुरंदरेंनी १९५८ साली दहा खंडात शिव चरित्र प्रकाशित केले. म्हणजे आजपासून तब्बल चौसष्ठ वर्षापुर्वी. चौसष्ठ वर्षापासून शरद पवार झोपा काढत होते की काय ? पुरंदरेंचे शिवचरित्र प्रकाशित झाले तेव्हा शरद पवारांचे वय साधारण अठरा ते एकोणीस वर्षाचे होते. पवारांचा जन्म १९४० चा आणि पुरंदरेंची चोपडी १९५८ ला प्रकाशित झाली. त्यानंतर शरद पवार १९६७ ला बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी वसंतराव नाईकांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्रीही झाले होते. १९७८ साली राज्याचे मुख्यमंत्रीही झाले. या काळात शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात शक्तीशाली होते. या सर्व काळात शरद पवारांनी बळवंत पुरंदरेंच्या विकृत लेखनाला विरोध केलेला दिसत नाही. कधी विधानसभेत या बाबत ते बोललेले दिसत नाहीत. पुरंदरेंनी केलेल्या विकृतीला इतकी वर्षे शरद पवारांची मुक समंती होती काय ? पुरंदरेंनी केलेली घाण आजवर पवारांना मान्य होती की माहितीच नव्हती ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येतात. जर पवारांची ही भूमिका प्रामाणिक असेल तर त्यांनी राजकारण फाट्यावर मारत पुरंदरेंच्या बखोटीला का धरले नाही ? इतिहासाच्या आड दडत स्वजातीय पुराण मांडणा-या पुरंदरेंचा हेतू विकृतच होता पण सदर पुस्तकास पन्नास-साठ वर्षानंतर विरोध करायला पुढे येणा-या शरद पवारांचा हेतू तरी स्वच्छ आहे काय ? असा प्रश्न पडतोच. जर पवारांचा हेतू शुध्द आहे तर त्यांनी जितेद्र आव्हाडांना एकटे का पाडले ? पुरंदरेंचा ‘महाराष्ट्र भुषण’ पुरस्कार परत घेण्याची साधी मागणीही का केली नाही ? याचे उत्तर शरद पवार देतील का ?