परळी गर्भपात प्रकरण: गर्भ अक्षरशः खेचून बाहेर काढणारा सापडला; एक नातेवाईकही अटकेत

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

परळी (बीड)(दि.28जुलै):-येथील शिवाजीनगरमधील एका विवाहितेचे बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याप्रकरणी संभाजीनगर स्टेशनच्या पोलिसांनी बार्शी येथील तथाकथित डॉक्टरास मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून विवाहितेचा पती व सासू हे दोघेजण अद्याप ही फरार आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी तीन पथके नियुक्त केली आहेत.

पहिली मुलगी असल्याने दुसरी ही मुलगी नको, असे म्हणून कुटुंबीयांनी तथाकथित डॉक्टरला हाताशी धरून बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान केले. गर्भात मुलगीच आहे हे लक्षात आल्यानंतर पती आणि सासूच्या सांगण्यावरून बार्शीच्या तथाकथित डॉक्टरने गर्भपाता दरम्यान गर्भ अक्षरश: ओढून बाहेर काढला. या प्रकरणी संभाजीनगर स्टेशनच्या पोलिसांनी मंगळवारी पहाटे नातेवाईक प्रकाश कावळे यास अटक केली. त्यानंतर तथाकथित डॉक्टर नंदकुमार स्वामी यास बार्शी येथून पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके, पोलीस सचिन सानप व गोपीनाथ डाके यांनी ताब्यात घेतले.

काय आहे घटना..!
______
शहरातील 22 वर्षे विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी मानसिक व शारीरिक छळ केला व येथील शिवाजीनगर भागात 16 जुलै रोजी घरीच एका डॉक्टरला बोलावून गर्भलिंग निदानकरून गर्भपात केला. त्यानंतर विवाहित महिला पुण्यात भावाकडे गेली. विवाहितेने पुणे येथील कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून हा गुन्हा कोंढवा पोलीस ठाणे येथून परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्यादी महिलाचे पती नारायण वाघमोडे ,सासू छाया वाघमोडे, प्रकाश कावळे ( सर्व रा. परळी ) व डॉ. नंदकुमार स्वामी (रा बार्शी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेवर सध्या पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED