‘ पुरुषाच्या देहात बाईपण मिळत होतं ! ….’

54

🔸झाडी कवी संमेलनात तृतीयपंथी निधीने कवितेतून मांडली आपल्या मनातली वेदना

✒️सावली(पुरोगामी न्युज नेटवर्क)

सावली(दि.30जुलै):-येथे पंचायत समितीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात झाडीपट्टी च्या कवींचे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. जि.प. शिक्षक सुरेश गेडाम लिखित प्रतिबिंब या कवितासंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त जिल्ह्यातील उत्साही कवींनी यावेळी उपस्थिती दर्शविली होती. यात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या तृतीयपंथी कवयित्री निधी चौधरी हीची उपस्थिती सभागृहातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी होती. कवी संमेलनात त्या ‘ बाई नावाचा माणूस’ ही कविता म्हणायला उभ्या होताच सभागृहातील सर्वांनीच टाळ्या वाजवून तिचे कौतुक केले. तिने आपल्या मनातील खदखद व्यक्त करून सर्वांचे लक्ष वेधले.

‘वयात येता येता ,सारखं गणित चुकलं होतं !
‘पुरुषाच्या देहात आता बाईपण मिळत होतं !!’

तृतीय पंथीय जनांच्या काय वेदना असतात हे कवीतेतून सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती. काव्यवाचन करण्याची संधी दिल्याबद्दल तिने मनापासून झाडीबोली साहित्य मंडळाचे आभार मानले . तृतीयपंथी कवयित्री निधी चौधरीला प्रथमच हे व्यासपीठ मिळाले होते. तीचा काही दोष नसताना तृतीयपंथी म्हणून जीवन जगत असताना आलेल्या कडवट अनुभवाची अनुभूती आणि स्वतःच्या अस्तित्वाची होणारी अगणित होरपळ ती आपल्या कवितेतून मांडत होती , आणि सारे सभागृह स्तब्ध झाले होते.

‘ठरवू देना ना मला माझ जीवन,
स्त्री की पुरुष देहात!
माणूस म्हणून जगायचं,
तुझ्याबरोबर या जगात !!

कवयित्री निधी चौधरी हिचे कवीतेचे सादरीकरण आणि त्यातील आशय लक्षात घेता तू भविष्यात मोठी कवयित्री होशील अशा शुभेच्छा ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी दिल्यात. माझे पदवीचे शिक्षण सुरू असून घरची गरीबीची परिस्थिती आहे. झाडीबोलीचे जिल्हाध्यक्ष कवी अरुण झगडकर यांचे सदैव मला मार्गदर्शन आणि लेखनासाठी उर्जा मिळत असते ,असे निधींनी याप्रसंगी सांगितले. निधी ही गोंडपिपरी तालुक्यातील चकपिपरी या गावची रहिवासी आहे.