सेवादास खुणे विशिष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित

✒️आंधळी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

आंधळी(दि.30जुलै):-अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक तथा भजन गायक सेवादास हरिराम खुणे (आंधळी ता. कुरखेडा जि. गडचिरोली) यांना विशिष्ट सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. आजवर त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांचा गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार केला. अनेकदा त्यांनी नागपूर आकाशवाणी केंद्रावर जाऊन राष्ट्रसंत रचित ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, ग्रामपरिवर्तन , अंधश्रद्धा निर्मूलन आदी विषयांवर गीतांचे सादरीकरण केले आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने त्यांना मानपत्र आणि ग्रंथ भेट देऊन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सन १९५२ मध्ये आंधळी येथे भेट दिली होती .त्यावेळी झालेल्या राष्ट्रसंतांच्या भजन भाषणांनी आंधळी वासीय जनता प्रभावीत होऊन महाराजांच्या विचारांचे पाईक बनलेत. खुणे परिवार राष्ट्रसंतांच्या विचारांचा उपासक बनलेत. राष्ट्रसंताच्या पावन‌ प्रेरणेने गावकरी जनतेने आबादी च्या जागेवर सुंदर सामुदायिक प्रार्थना मंदिराची निर्मिती केली आहे.‌त्यात दररोज सामुदायिक प्रार्थना केली जाते, हे विशेष.

धार्मिक , महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED