माण तालुक्यातील रानंद गावचा क्रांतिकारक ऐतिहासिक निर्णय:विधवा प्रथेला दिला फाटा

30

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9975686100

म्हसवड(दि.31जुलै):-माण तालुक्यातील रानंद गांवच्या इतिहासातील “विधवा प्रथा मोडीचा” क्रांतिकारी निर्णय 29 /7 / 2022 रोजी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते मंजुर करण्यात आला.त्या बद्धल ग्रामपंचायत रानंद चे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

यावेळी सरपंच ग्रामपंचायत रानंद यांच्या अध्यक्षतेखाली व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ग्रामसभा होवून त्यात हा निर्णय घेण्यात आला. ग्रामसभेमध्ये बिदाल गावच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ पुष्पांजली मगर यांनी महिलांना अतिशय तळमळीने संबोधित केले त्याचबरोबर पुरुषांनाही विधवा प्रथा का बंद करावयाच्या याबाबत मौलिक मार्गदर्शन केले.

ग्रामसभेमध्ये हात उंचावून या चालीरीती बंद करणे बाबत ठराव संमत करण्यात आला. यानंतर उपस्थित सर्व विधवा महिलांना हळदी कुंकू लावून हिरवी साडी , पीस, नारळाने ओटी भरण्यात आली. प्रत्येक विधवा महिलांच्या केसांमध्ये इतर महिलांनी प्रेमाने गुलाब पुष्प घालून त्यांचा सन्मान केला. यावेळी खूप भावनिक क्षण निर्माण झालेला होता यावेळी विधवा महिलांना या ऐतिहासिक बदला च्या निमित्ताने अश्रू अनावर झाले तसे रानंद हे गाव घोषा संस्कृतीतले मानले जाणारे गाव आहे. परंतु ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ महिला यांनी या कार्यक्रमास मनमोकळेपणाने पाठिंबा दिला.

आजपासून यापुढे विधवा होणाऱ्या महिलांच्या बांगड्या न फोडणे कायमस्वरूपी त्यांना हळदीकुंकू लावून आपल्या सर्व शुभ कार्यक्रमास बोलवण्याचाही निर्धार सर्वांनी केला या विधवांचा सन्मान करत असताना गावातील दानशूर लोकांनी त्यांच्या साड्यांचा, बांगड्यांचा व इतर लागणारा खर्च उत्स्फूर्तपणे केला.या कार्यक्रमास तरुण तसेच ज्येष्ठ विधवा महिला स्वच्छने मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या.सदर ग्रामसभेस व या ऐतिहासिक कार्यक्रमास , उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य , ग्रामविकास अधिकारी, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक, प्राथमिक शाळेचे शिक्षक, कृषी सहायक मॅडम ,नर्स, अंगणवाडी सेविका ,अशा सेविका ,गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामसेवा संघाच्या महिला, बचत गटाच्या महिला ,मानव अधिकार आयोग च्या प्रतिनिधी उपस्थित होते.

वरील सर्वच घटकांनी विधवा महिलांचा सन्मान व्हावा यासाठी प्रयत्न केले .माण तालुक्यांमध्ये किरकसाल, बिदाल व त्यांच्या पाठोपाठ रानंद सारख्या मोठ्या गावाने तिसऱ्या क्रमांकाला विधवा महिलांचा सन्मान करून इतर गावांच्या समोर एक आदर्श निर्माण केलेला आहे. यासाठी गटविकास अधिकारी श्री. पाटील साहेब विस्तार अधिकारी यांनी वारंवार मार्गदर्शन केल्याने माण तालुक्यामध्ये विधवांचा सन्मान करणारी गावे समोर येत आहेत .आता चौथा नंबर कोणत्या गावाचा ,याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे*