शिवशाहीर,साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती विशेष लेख

32

✒️लेखक:-रामेश्वर त्रिमुखे,जालना(मो:-9420705653)
ramtrimukhe@gmail.com

सर्व जनतेस आंतरराष्ट्रीय कृतिशील साहित्यिक, शिवशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 1ऑगस्ट जयंतीनिमित्त शुभेच्छा. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी अनेक मान्यवर यांनी लिहिले आहेच, सोशीयल मीडिया मध्ये अनेक मित्रांच्या पोस्ट होत्या की ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती पाठविणे.त्यामुळे मला याबाबत लिहावे असे वाटले आणि लिहिले.त्यामुळे निश्चितपणे प्रतिक्रिया कळवा,ही विनंती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मुळनाव हे तुकाराम भाऊराव साठे होय.त्यांच्या आईचे नाव हे वालुबाई होते. सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील ‘वाटेगाव’ हे त्यांचे जन्मगाव होय. तर 1ऑगस्ट1920 ही त्यांची जन्मतारीख होय.याबाबत त्यांची आई म्हणते की,त्यादिवशी कुणीतरी मोठा माणूस मेल्यामुळे सर्व बंद होते,त्यादिवशी चा जन्म.

लोकशाहीर अण्णाभाऊ यांच्या पत्नीचे नावं कोंडुबाई होते,ज्या पाटण तालुक्यातील काळगाव येथील होत्या.अण्णाभाऊ यांना एक मुलगा होता, ज्याचे नाव मधुकर होते. अण्णाभाऊ यांना शाळेत १ली ला प्रवेश तर मिळाला पण पंत गुरुजी ने दुसऱ्या दिवशीच छडी फेकून मारली आणि अण्णाभाऊ यांची शाळा कायमची सुटली.दहा अकरा वर्षे वयातच रोजंदारीसाठी आईवडीलासोबत अण्णाभाऊ यांना मुंबईला यावे लागले. मुंबईत जीवन जगतांना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या.

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा 49 वर्षाचा जीवन संघर्ष ,कार्य आणि कर्तृत्व समजून घेतांना प्रेरणा मिळते.हृदय पिळवटून जाते.त्यांनी हमाली, बूटपॉलिश,घरगडी, हॉटेलबॉय,खाणकामगार, गिरणीकामगार आणि हातात पडेल ते काम केले.मिल बंद पडल्यावर तमाशात तबला,पेटी, ढोलकी वाजविणे सह जे जे भोगले,सहन केले, सोसले तेच लेखणी आणि वाणीच्या माध्यमातून मांडणारे अण्णाभाऊ हे जगद्गुरू संत तुकाराम,क्रांतीसुर्य जोतीराव फुले, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वारस होत.

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या प्रज्ञावंताने साहित्यातील प्रत्येक क्षेत्रात कथा, कादंबरी, नाटक, पोवाडे, गीत,लेख यात आपली जीवणानुभूतीची मांडणी केली आहे.आधुनिक भारताच्या नव्हे जगाच्या इतिहासात दीड दिवस शाळेत जाऊन 35 कादंबऱ्या,13कथासंग्रह,8 पटकथा, 3 नाटके,10 प्रसिद्ध पोवाडे,12 उपहासात्मक लेख, एक प्रवासवर्णन आणि अनेक वगनाट्य,गाणे, कवने ,रचली,गायन केली.

‘माकडीचा माळ’ ही भटक्या विमुक्त , पालावरील लोक यांचे वास्तव जीवन मांडनारी कादंबरी आहे. ज्यावर डोंगरची मैना हा चित्रपट निघाला. जगप्रसिध्द फकीरा या कादंबरीत वास्तव जीवन याची मांडणी केली आहे आणि ही कादंबरी विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीला अर्पण केली आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक साहित्यकृतीवर अनेक चित्रपट निघाले,खूप गाजले.स्त्रियांचे दुःख ,संघर्ष त्यांनी ‘वैजयंता ‘, आवडी सह इतर साहित्यात मांडला आहेच.लोकशाहीर

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा चेलीसेव साहित्यिकांकडून रशियन, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच इत्यादीसह 27भाषांत अनुवाद झालेला आहे. स्टालिनचा पोवाडा,बर्लिनचा पोवाडा,चिनी क्रांतीवरील गौरवगान प्रसिद्ध आहेत.मार्च 1948 ला रशियन सरकारने अण्णाभाऊ साठे यांचा सत्कार करून त्यांचा गौरव केला. याच बरोबर फ्रांस सरकारने पॅरिस साहित्य परिषद चे निमंत्रण देऊन गौरवासाठी बोलाविले.परंतु प्रवासासाठी पैसे नाहीत,म्हणून जाता आले नाही.त्याकाळातील आपल्या सरकारने केवळ बहुजनांच्या जातीमुळे योग्य ‘नोंद’ घेतली नाही.अण्णाभाऊ नी तमाशातील वंदन करतांना दैववाद नाकारून प्रयत्नवादाचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरव करतात, कवणात म्हणतात,

“प्रथम नमो मायभूच्या चरणा, छत्रपती शिवबाच्या चरणा,
स्मरुनी गातो कवणा”.याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा रशियात गायन केला.हे आहेत खरे शिवशाहीर, खरे महाराष्ट्रभूषण,भारतरत्न,ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी.पण मनुवादी, जातीयवादी सरकारने आजपर्यंत त्यांना दुर्लक्षित केलेले आहेच.याचबरोबर श्रमीकांच्या श्रमाचा सन्मान आणि विज्ञान यांचा पुरस्कार करतांना म्हणतात, “पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून तीकष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे.”

यातून हे स्पष्ट होते,की पुराणकथा या थोतांड आहेत,ज्यांना अण्णाभाऊंनी नकार दिला.आणि आजही आम्ही वारस म्हणणारे नवस, कंदुऱ्या,गळ टोचणे, अमावस्या मागणे, मांगीरबाबा यात्रा, आसरा, शांती यातच गुरफटलेलो आहोत.! राष्ट्रपिता जोतीराव फुलेंच्या शाळेत शिकत असलेल्या 11वर्ष वयाच्या मुक्ता साळवे ला 15 फेब्रुवारी 1855 ला हा वर्णव्यवस्थावादी धर्म आमचा नाही,हे कळले! ते 168 वर्षानंतर ही उच्च शिक्षितांना ही ध्यानात येत नाही.आणि आम्ही नव्याने बापू, बाप्या, कापू, बुवा यांचे अंधभक्त बनत आहोत,सत्संग करीत मेंदू गुलाम बनवीत आहोत. भांडवलदारी व्यवस्था यावर ही त्यांनी कडाडून प्रहार केला.

15ऑगस्ट1947 ला आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत,असा आमचा समज आहे.अण्णाभाऊ साठे यांनी हे मुठभर लोकांचे स्वातंत्र्य आहे!यात गुलामगिरी कायम आहेच,असे म्हणतात. म्हणून 16 ऑगस्ट 1947 ला भाऊ गवाणकर,शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांनी पडत्या पावसात विशाल असा मोर्चा आझाद मैदान मुंबईत काढला.यात घोषणा दिली,
“यह आझादी झुठी है,देश की जनता भुकी है.”
ज्या मातंग जातीत अण्णाभाऊ साठे जन्मले त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश यावरच आपण गेले पाहिजे असा संदेश दिला. कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सोलापूर, पुणे,मुंबई,उस्मानाबाद,कसबे तडवळ येथील मातंग समाज परिषदा मधून निर्देश मिळाले होते.कारण श्रीहरी शिंदे सारखा मातंग जातीतील कळंब येथील व्यक्ती रक्ताने लिहून तार पाठवितो की डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे प्रतिनिधी आहेत.याचबरोबर अण्णाभाऊ यांचे संदेशपर गीत…..जग बदल घालुनी घाव। सांगूनी गेले मज भीमराव।गुलामगिरीच्या या चिखलात रुतून बसला का ऐरावत।अंग झाडूनी निघ बाहेरी ।घे बिनीवरती घाव..

अण्णाभाऊ साठे यांच्या शेवटच्या दिवसात त्यांना फार हाल सहन करावे लागले. तत्कालीन सरकारने त्यांना गुन्हेगार प्रमाणे वागणूक देऊन अटक केली.अमळनेरच्या तुरुंगात त्यांचा छळ केला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना खायला सलग 5 दिवस अन्न न मिळाल्याने उपासमारीने त्यांचा 18 जुलै 1969 ला मृत्यू झाला आहे. आज त्यांची जयंती साजरी करत असताना आम्ही हा इतिहास विसरता कामा नये! कारण जे लोक इतिहासातून बोध घेत नाहीत,ते इतिहास घडवू शकत नाहीत!त्यांचा इतिहास नष्ट केला जातो.यासाठी आम्ही चांगले शिक्षण घेणे गरजेचे आहे.त्याच बरोबर आजही गावकुसाबाहेर राहणारा आणि अज्ञानी, अशिक्षित,बेघर,वंचित,शोषित समाजाला ‘लिंक ‘ करणे ही शिकलेल्या लोकांची जबाबदारी आहे.त्यासाठी आम्ही सर्वांनी पे बॅक टू सोसायटी’या न्यायाने काम करूया , हीच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीची शुभेच्छा असेल!.