वृत्तपत्रे वाचा: वाचन संस्कृती जपा!

27

मरगळत चाललेली वाचन संस्‍कृती वाढविण्‍याची नितांत गरज आहे. आपल्या बालपणी छापील कागद म्हणून नशीब होत नव्हते. पुड्या बांधून आलेली रद्दी आम्ही आलटून पालटून वाचत असू. आपल्याला त्यातील बातमी, कथा, ज्ञानवर्धक माहिती उपयोगी वाटली तर ते रद्दीचे कागद जपून ठेवत होतो. आज काळ बदलला आहे, सर्वत्र वर्तमानपत्रे नुसते पडून दिसताहेत. मात्र त्यांना उलटून पलटून वाचणारा वाचक कमी झाला आहे. म्हणतात ना, की दांत आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दांत नाहीत! अशी आजची गत आहे. वेळोवेळी प्रकाशित होणारी नियतकालिके- दैनिक वर्तमानपत्रे, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्विमासिक, त्रैमासिक… आदी पत्रिकांमध्ये चालू घडामोडी व सामान्यज्ञान- जनरल नॉलेज ठासून भरलेला असतो. आपण ते आकलनपूर्वक वाचन करणार नाहीत, तर ते आपल्या खाली खोक्या डोक्यात कसे भरेल?

वाचाल तर वाचाल असा मंत्र सांगितला जातो, ते उगीच नाही. बौध्‍दीक आणि सामाजिक विकासासाठी ग्रंथ आणि ग्रंथालयांचे अनन्‍यसाधारण महत्‍त्‍व आहे. स्‍वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीचा केवळ उक्‍तीतून उद्घोष न होता ती कृतीतून प्रत्‍ययास आणण्‍याचे कार्य पुस्‍तकांच्‍या रुपाने होऊ शकते. आजच्‍या पिढीवर असे संस्‍कार करण्‍यासाठी वर्तमानपत्रे, पुस्‍तकांशिवाय दुसरे प्रभावी माध्‍यम नाही. नियतकालिके, ग्रंथ अथवा पुस्‍तके हे माणसे घडविण्‍याचे काम करतात. त्यांच्या वाचनामुळे माणसे सुसंस्‍कृत, प्रगल्‍भ होत असतात. देशाचा विकास हा भौतिकदृष्‍ट्या कितीही असला तरी तो सांस्‍कृतिक, सामाजिक दृष्‍टीने किती विकसितआहे, हे महत्‍त्‍वाचे असते. त्‍यामुळे ग्रंथ चळवळीचा, वाचन संस्‍कृतीचा विकास व्‍हायला हवा, एवढेच नाही तर ती आज काळाची गरज आहे.भारतातील ग्रंथालय शास्‍त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन हे आहेत. ग्रंथालय शास्‍त्राची पाच सूत्रे सांगितली जातात. ग्रंथालय हे उपयोगासाठी आहेत, प्रत्‍येकाला त्‍याचा ग्रंथ मिळाला पाहिजे, प्रत्‍येक नियतकालिक, पुस्‍तकाला त्‍याचा वाचक मिळाला पाहिजे, वाचकांचा वेळ वाचावा आणि ग्रंथालय ही वर्धिष्‍णू संस्‍था आहे, ही पंचसूत्री डोळ्यांसमोर ठेवूनच वाचन चळवळीची वाटचाल व्‍हायला हवी.राज्‍यातील वाचन संस्‍कृती वाढविणाऱ्या अशा या ग्रंथालय चळवळीचा थोडक्‍यात घेतलेला आढावा खुप काही सांगून गेला आहे.

महाराष्‍ट्रातील जनतेचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्‍कृतिक जीवन समृद्ध करण्‍यासाठी तसेच वाचन संस्‍कृती वृद्धिंगत करण्‍यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांनी महत्‍त्वाचे योगदान दिलेले आहे. यामध्‍ये शासकीय ग्रंथालयांचीही तितकीच महत्‍त्वाची भूमिका आहे. या ग्रंथालयांकडून वाचकांना अधिक चांगल्‍या सेवा देण्‍यासाठी, त्‍यांना प्रोत्‍साहन मिळावे, यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्‍न केले जात आहेत. महाराष्‍ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्‍य आहे.वाचनसंस्‍कृतीचा मोठा वारसा राज्‍याला लाभलेला आहे. राज्‍यातील सार्वजनिक ग्रंथालयांना सुमारे २००वर्षांहून अधिक काळाचा वैभवशाली इतिहास आहे. स्‍वातंत्र्यपूर्व काळात कोल्‍हापूर संस्‍थानामध्‍ये छत्रपतींनी आपल्‍या जनतेला सुजाण करण्‍यासाठी सन १९४५ साली पहिला सार्वजनिक ग्रंथालय कायदा केला. त्‍यांचे हे पाऊल सांस्‍कृतिक क्षेत्रात एक नवीन आदर्श निर्माण करणारे ठरले. त्‍यानंतर सन १९६७मध्‍ये राज्‍यात महाराष्‍ट्र सार्वजनिक ग्रंथालये कायदा मंजूर करण्‍यात आला. व्‍यक्‍ती, समाज आणि राष्‍ट्र उभारणीत वर्तमानपत्रे व ग्रंथ यांचे योगदान महत्‍त्‍वाचे आहे. माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाच्‍या अंगभूत गुणांमुळे ग्रंथ हेच गुरु, असे म्‍हटल्‍या जाते. पुस्‍तके अथवा ग्रंथ यांच्‍या सारखा दुसरा गुरु नाही, असे म्‍हटले जाते. मनोरंजक आणि वैचारिक असे साधारणपणे पुस्‍तकांचे दोन प्रकार करता येऊ शकतात. मनोरंजनातून संदेश देणारी, वाचकांच्‍या भावनेला हात घालणारी पुस्‍तके ही लोकप्रिय असतात. या उलट बुध्‍दीला आव्‍हान देणारी, वाचकाच्‍या तर्कशक्‍तीला पाजवणारी पुस्‍तके चोखंदळ वाचकांमध्‍ये लोकप्रिय ठरू शकतात.

प्रत्‍येक पिढीची आवड-निवड ही वेगळी असते. त्‍यामुळे काळाच्‍या कसोटीवर आणि वाचकांच्‍या अभिरुचीनुसार टिकणारी पुस्‍तके ही चिरकाल आनंद देणारी असतात. वाचनाची आवड असणारे वाचक सर्व प्रकारची पुस्‍तके विकत घेऊन वाचू शकत नाहीत. अशावेळी त्‍यांच्‍या मदतीला येते ती टपरी व ग्रंथालय. यातील ग्रंथपाल हा मनमिळावू, सहकारी वृत्‍तीचा असेल तर वाचकाला हवे ते पुस्‍तक सहजतेने उपलब्‍ध होऊ शकते. यशस्‍वी झालेल्‍या अनेक व्‍यक्‍तींच्‍या जीवनात ग्रंथालयांनी, पुस्‍तकांनी मोलाची भूमिका बजावली आहे.रेडिओ, टीव्‍ही, मोबाईल, इंटरनेटच्‍या काळात नवी पिढी वाचनापासून दूर जात असल्‍याचे चित्र दिसते. त्‍यांच्‍यावर सुसंस्‍कार करण्‍यासाठी केवळ पाठ्यपुस्‍तके पुरेशी नाहीत. नव्‍या पिढीची मानसिकता ओळखून त्‍यांच्‍या सोयीने वर्तमानपत्रे, साप्ताहिके, पुस्‍तके अथवा ग्रंथातील ज्ञान त्‍यांच्‍यापर्यंत पोहोचवावे लागेल. त्‍यासाठी आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाची साधने वापरावी लागतील. असे बोलले जात होते, मात्र आज तंत्रज्ञानाची जोड तर मिळाली आहे. नियतकालिके- दैनिक अंक, साप्ताहिके, ग्रंथ, पुस्तके सर्व इंटरनेटवर उपलब्ध झाली आहेत. ती ऑनलाइन वाचनाच्या सोयी उपलब्ध आहेत. तरीही मात्र आजची नवी पिढी त्याकडे ढुंकूनही बघतांना दिसत नाही. काय म्हणावे या खुज्या बुद्धीला? युवावर्ग केवळ अचकट विचकट विडिओज, गेम्स, वायफळ व कुचकामी चॅटिंग यातच सारे जीवन घालवीत आहे. बुद्धिमत्ता नुसती बुरसटत चालली आहे. पुस्तक, घडवी मस्तक! हे सुविचार केवळ भाकडकथा सिद्ध होत आहे. युवा पिढी वाचनांकडे आकर्षित झाली, तरच वाचन संस्‍कृती वाचेल व ती वाढण्‍यास मदत होईल. वाचनचळवळीला खरी गतीमानता प्राप्‍त झाली म्हणता येईल. अन्यथा सर्वत्र अक्षरशत्रूंची फळी निर्माण होईल आणि वाचणारी व्यक्ती मुर्खात गणली जाईल. हेच ते पुढचे साजिरे-गोजिरे उज्ज्वल भविष्य असेल, नाही का?

✒️अलककार:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी(वैभवशाली भारताच्या प्रेरणादायी इतिहासाचे गाढे अभ्यासक)गडचिरोली, फक्त व्हॉटसॅप:-९४२३७१४०८६