🔹युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद..

5

🔸4 जुलै स्वामी विवेकानंद पुण्यतिथी निमित्त विशेष लेख

✒️लेखिका-सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे, गोंदिया

भारत हा रत्नांचा देश असून या मातीत अनेक रत्न जन्माला आले. त्या मौल्यवान रत्नांपैकीच एक रत्न स्वामी विवेकानंद ज्यांनी युगप्रवर्तन करून सुंदर भारत घडवण्यात मोलाचे योगदान दिले. ते म्हणतात ना, ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ याची प्रचिती आपल्याला स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती वरून लक्षात येते.

१२ जानेवारी १८६३ कोलकत्ता येथे एक तेजस्वी बालक जन्माला आला ज्याचा चेहरा अतिशय तेजस्वी होता. त्याच्या चेहर्‍यावरून तेज ओसंडून जात आहे असे बघणार्‍याला वाटे. या तेजस्वी बालकाच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी.विश्वनाथ दत्त हे कोलकत्त्यातील एक प्रसिद्ध वकील होते. त्यांनी धंद्यात खूप नाव मिळविले होते. पैसाही चांगला मिळविला होता ते स्वभावाने सदाचारी, पत्नी भुवनेश्वरी समाधानी व धार्मिक होती. त्यामुळे त्यांचा संसार सुखासामाधानाचा होता. तेजस्वी बालकाचे नाव ठेवले नरेंद्र ! हा नरेंद्र पुढे स्वामी विवेकानंद म्हणून जग प्रसिद्ध झाला.
नरेंद्रला दर्शनशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, कला, साहित्य इत्यादी विषयांमध्ये रूची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता अशासारख्या धार्मिक साहित्यात आवड होती. सोबतच त्यांना शास्त्रीय संगीतात सुद्धा रस होता आणि म्हणूनच त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमदखान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचं शिक्षण पुर्ण केलं. इतकेच नव्हे तर ते व्यायाम आणि खेळ खेळण्यास सक्रिय सहभागी होत असत. ते त्यांच्या प्रत्येक विषयातील आवड आणि उत्स्फूर्त सहभाग आणि स्वभावाने सर्व मित्रांमध्ये प्रिय होते. त्यांचे मित्र त्यांना ‘बिले’ आणि गुरू ‘नोरेन’ नावाने हाक मारायचे. व्यायाम, कुस्ती, मुष्ठियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन हे त्यांचे आवडते छंद होते.
इ.स.१८८१च्या नोव्हेंबर मध्ये संत परमहंस यांनी आपल्या तिक्ष्ण दृष्टीने त्यांच्या डोळ्याकडे पाहिले. ते आपल्या भक्तांना म्हणाले. “हा नरेंद्र मानव जातीच्या उद्धारासाठीच जन्मलेला आहे, तो हिंदुधर्म आणि हिंदुस्थानची मान साऱ्यां जगात उंचावेल!” नरेंद्रला ते खरे वाटेना त्याने रामकृष्णांना विचारले,” तुम्ही देव पाहिला आहे कां ?” त्यावर रामकृष्ण उत्तरले, ”होय मी देव पाहिला आहे, त्याच्याशी बोललो पण आहे. तुला सुद्धा देव सहज भेटेल.” ” केव्हा भेटेल मला देव ?नरेंद्राने विचारले, ” जेव्हा तुझ्या मनाला देव भेटण्याची तळमळ लागेल तेव्हा . “रामकृष्णांनी म्हटल्या नंतर ही त्यांचा त्यावर विश्वास बसेना, तेव्हा रामकृष्णांनी त्यांच्या हृदयाला स्पर्श केला. त्याच बरोबर सर्वत्र तेजाचे लोळ उठले. सर्वत्र प्रकाश पसरला व नरेंद्रला सर्वत्र प्रकाश व परमेश्वरच दिसू लागला!
‘जो पर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही,’
असे ते नेहमीच सांगत असत.
नरेंद्राने वडिलांच्या मृत्यू नंतर नोकरी करून घराचा भार उचलण्या ऎवजी संन्यास घेतला म्हणून आप्तेष्ट मंडळी त्यांच्या मागे त्यांची निंदा करू लागले पण नरेंद्रना गुरु कडून योग्य मार्ग मिळाला होता आणि त्या मार्गानेच जाण्याचा त्यांनी निर्धार केला होता. थोड्याच दिवसांनी रामकृष्ण कर्क रोगाने आजारी पडले. त्यांना उपचारासाठी काशीपूर येथे नेले.त्यांच्या साठी नरेन्द्रही त्यांच्या सोबत गेला.रामकृष्ण त्यांना म्हणाले, “बेटा, माझी सर्व योग शक्ती मी तुला दिली आहे. त्याच्या जोरावर तू हिंदूधर्म आणि तत्वज्ञान यांचा जगभर प्रसार कर.,आपल्या राष्ट्राचा उद्धार कर.! “ऎवढे बोलून १५ ऑगष्ट १८८६ रोजी रामकृष्णांनी जगाचा निरोप घेतला. नरेंद्र व रामकृष्ण यांच्या इतर शिष्यांनी बडानगर येथे त्यांचा मठ स्थापन केला. गुरूने सांगितलेल्या मार्गाने योगसाधना केल्यामुळे त्याच्यात आमुलाग्र बदल घडून आला. भारतभ्रमण करतांना ते काशी, अयोध्या, गया, आग्रा, वृंदावन असे करीत करीत ते पायीच फिरले. स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला पोचले . तेथील देवालयात त्यांनी ध्यानधारणा सुरु केली. त्यांना रामकृष्णांनी दर्शन दिले. अमेरिकेत भरणार्‍या सर्वधर्म परिषदेत जाण्याची त्यांना आज्ञां दिली. भारताच्या कल्याणासाठी येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनणे झटण्याचा दृढ संकल्प केला.
आपल्याकडे आधीपासूनच विश्वाच्या सर्व शक्ती आहेत. तरी लोक डोळ्यावर हात ठेवतात आणि मग आयुष्यात किती गडद अंधार आहे याबद्दल ओरड करतात असे ते नेहमीच म्हणायचे.
३१ मे १८९३ रोजी स्वामी अमेरिकेला निघाले. त्यांनी रामकृष्णांच्या फोटोला वंदन करून कालीमातेचे स्मरण केले आणि भगव्या रंगाचा पोशाख चढविला,भगवा फेटा गुंडाळला, भगवत गीता घेवून त्यांनी बोटीवर प्रवास सुरु केला. चीन, जपान, नंतर ते शिकागो बंदरात उतरले. ११ सप्टेंबर रोजी सर्वधर्म परिषदसुरु झाली. हजारो संख्येने प्रतिनिधी हजर होते. देशोदेशीचे ध्वज फडकत होते. ख्रिस्ती धर्माचे लोक जास्त आले असल्यामुळे ख्रिस्ती धर्माचेच गुणगान ते करीत होते. शेवटी स्वामींची वेळ आली. त्यांनी भाषणाला सुरवात केली. “माझ्या अमेरिकन बंधू -भगिनींनो ! या त्यांच्या पहिल्याच वाक्याला सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला, तो तब्बल दोन ते तीन मिनिटे चालला. त्यांनी हिंदूधर्मावरील परिपूर्ण भाषण दिले.परिषद संपली, पण स्वामींचे कार्य संपले नव्हते. त्यांनी अमेरिकेतील मोठमोठ्या शहरात व्याख्याने दिली. हिंदूधर्म, तत्वज्ञान यांच्या प्रचारासाठी त्यांनी न्यूयार्क मध्ये अभ्यासवर्ग सुरु केले.अनेक स्त्री-पुरुष त्यांचे शिष्य झाले.हिंदूधर्म, तत्वज्ञान यांचा प्रसार केला. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मठ स्थापन केले. रामकृष्णाची भविष्या वाणी खरी ठरली! त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी जगभर वेदांताचा प्रसार केला. भारताचे नाव उज्ज्वल केले. ! १८९७ साली स्वामी विवेकानंद भारतात परत आले. १मे १८९७ रोजी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली व लोक सेवेला सुरवात केली. अमेरिकेत असतानाच ते आजारी पडले. नंतर त्यांची प्रकृती जास्तच बिघडली होती. थोडे दिवस विश्रांती घेऊन ते परत अमेरिकेला जावून आले. १९०२ साली त्यांची प्रकृती जास्त बिघडली मठाचे काम त्यांनी दुसर्‍या वर सोपविले.”आपण आयुष्य असेपर्यंत शिकणे “अनुभव हा जगातील सर्वोत्तम शिक्षक आहे अशी शिकवण देणारे स्वामी विवेकानंद यांनी ४ जुलै १९०२ साली त्यांनी वयाच्या ३९ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
“सतत चांगला विचार करत रहा. वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे.”अशी शिकवण देणार्‍या स्वामी विवेकानंदांच्या पवित्र स्मृतिस विनम्र श्रद्धांजली.

        
                   सौ.जयश्री निलकंठ सिरसाटे*
                              गोंदिया