गोंदवले येथे सातारा-लातूर महामार्गावर तिहेरी अपघात;वेग पतिबंधात्मक उपाययोजनांची होतेय मागणी

55

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.3ऑगस्ट):- सातारा-लातूर महामार्गावर गोंदवले खुर्द जवळ आज दुपारी दीडच्या सुमारास समोरासमोर झालेल्या तिहेरी अपघातात तिघे तरुण जागेवरच ठार झाले तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की चक्काचूर झालेली अपघातग्रस्त वाहने सुमारे तीनशे फूट अंतरापर्यंत फरपटत गेली. या अपघातात सुदैवाने पाच वर्षांच्या मुलाला कसलीही इजा झाली नाही. सर्व मृत पळशी (ता. माण) येथील असल्याने पळशी गावावर शोककळा पसरली.

सातारा लातूर महामार्गाचे काम पूर्ण होत असताना गोंदवले खुर्द परिसरात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.आज दुपारी दीडच्या सुमारास स्विप्ट कार (एम एच. ०५ व्ही ९६९५) व बुलेट यांचा समोरासमोर अपघात झाला. या धडकेत बुलेटस्वार उंच हवेत फेकले गेले. याच दरम्यान रस्त्याने चाललेल्या क्रूझर (एम एच १३ ए सी १७४९) वर एक जण जाऊन आदळला व त्यानंतर रस्त्यावर फेकला गेल्याने जागेवर मृत झाला. इतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात तुषार लक्ष्मण खाडे (वय 22 ),अजित विजयकुमार खाडे (वय 23), महेंद्र शंकर गौड (वय 21) सर्व रा. पळशी, ता. माण हे जागीच ठार झाले.

या अपघातात बुलेटचा अक्षरशः चक्काचूर झाला. स्विप्ट कारचेही मोठे नुकसान झाले. दोन्हीही वाहने सुमारे तीनशे फूट फरफटत गेल्याने रस्त्यावर वाहनांचे भाग विस्कटून पडले होते. स्विप्ट कार मधील निवृत्त पोलीस आनंदराव ढेंबरे (वय ६२) मुलगा गणेश ढेंबरे (वय २८) व विहान गणेश ढेंबरे (वय ५) सर्व रा. दीडवाघवाडी, ता. माण हे पिंपरी (पुणे) येथून गावी निघाले होते. या अपघातात आनंदराव व गणेश हे गंभीर जखमी झाले. तर या अपघातातून विहान आश्चर्यकारक बचावला. जखमींना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर दहिवडी पोलिस मात्र सुमारे तास उलटूनही घटनास्थळी न आल्याने लोक संतप्त झाले होते.

दरम्यान याच परिसरात गेल्या काही महिन्यात झालेला हा सहावा भीषण अपघात आहे.प्रशस्त रस्ता,तीव्र उतार यामुळे याठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे या परिसरात वेग प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.