सत्ता चालवणारे कलाकार आणि…?

40

जाणार जाणार आणि येणार येणार म्हणता म्हणता जाणारे गले. पण येणार येणार म्हणनारे आले नाही. आले नाही म्हणजे त्या पेहरावात आले नाही. गधा आणि घोड्यात जो फरक असतो त्या फरकात आले. पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांने बालवाडीत बसावं तसे आले. हा राजकीय विश्लेषकांना मोठा धक्का आहे. सगळ्यांचे गणित चुकले. ते गणित चुकवणारे राजकीय रंगभूमीवरील कलाकार नंबर एक देवेंद्र फडणवीस. फडणवीसांची राजकीय रंगभूमीवरील ही अशी एंट्री अनपेक्षित आहे. काही तासांचं मुख्यमंत्री पद गमावल्यानंतर फडणवीसांचं दुःख लपून राहिलं नव्हतं. नंतर मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असं सांगितांना तोच दुःखी चेहरा आजही डोळ्यांपुढे ऊभा राहतो. पण अडिच वर्षांनी पुन्हा येण्याची संधी आली तेव्हा फडणवीसांनी मनाचा भलताच मोठेपणा दाखविला. ज्या पदासाठी भाजपने शिवसेनेशी घटस्फोट घेतला ते पद गमावण्याचा मोठेपणा भाजपने,फडणवीसांनी दाखविला. अजित पवारांच्या भाषेत, ” नक्कीच काळंबेरं आहे. हे काळंबेरं जनतेपासून लपून राहिलं नाही.पण मी,आम्ही सत्तेचे, पदाचे भुकेले नाही, हे भाजप, फडणवीस आपल्या वाणीकृतीतुन दाखविण्याचा प्रयत्न करतात. घाईघाईत अगदी ४/६ लोकांत मुख्यमंत्री पदी शपथ उरकणारे फडणवीस अडिच वर्षांत एवढ्या मोठ्या मनाचे कसे झाले? हा प्रश्न अनेकांना पडला.त्याची वेगवेगळी उत्तरेही आली.

भाजप हायकमांड म्हणजे मोदी, शहा आणि नड्डा यांच्या वजनाने फडणवीस पिचुन निघाले आणि मग कन्हत कन्हत उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिला,असं समजणं चुक आहे. कारण शिवसेनेतून बाहेर पडलेले शिंदे आणि इतर आमदार यांना भाजप शिवाय पर्याय नव्हता. तर हायकमांडने फडणवीसांवर वजन आणण्याचं कारणच उरत नाही. सांप्रत स्थितीत शिंदे गट आणि भाजप मध्ये सत्तेचा वाटा कसा असेल हे ठरलेलं गणित होतं. खुद्द फडणवीसांच्या पत्नीने,देवेंद्र फडणवीस कसे वेश बदलून जायचे ते सांगितलं आहे. शिंदेंनीही सर्व झोपल्यावर मी बाहेर पडायचो हे सांगितलं. शिंदे आणि फडणवीस हे समदुःखी होते. ते असे, उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली त्यावेळी एकनाथ शिंदेंचंही नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आलं होतं पण पक्षप्रमुखांनी ते पद आपल्याकडे ठेवलं. मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, राहिल या ठाकरेंच्या विधानाचा अर्थ ते पद आपल्याला मिळेल असा शिंदेंनी अर्थ काढला. पण ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासूनच शिंदे दुखावले. ही नाराजी भाजपने अचूक हेरली. आणि शिंदेंवर जाळं टाकलं. महाविकास आघाडी तयार झाल्याने मुख्यमंत्री पद गेल्याचं दुःख फडणवीसांनांही होतं. म्हणजे मुख्यमंत्री पद गेल्याचं दुःख फडणवीसांनांही आणि शिंदेंनाही होतं. त्यात एकामागे एक ईडीची पिडा होती. तेव्हा भयग्रस्त शिंदे आणि समर्थक आयतेच भाजपच्या गळाला लागले. ठाकरेंनी मुख्यमंत्री पद हीरावल्याचा बदला फडणवीसांनी असा घेतला.

शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळालं.आणि ईडीचा आपोआपच बंदोबस्त झाला. या नटसंचातील आशिष जायसवाल म्हणतात, पुढे महाविकास आघाडीची आणि शिवसेनेशी युती झाली नसती तर भविष्यात आम्ही निवडून येऊ शकलो नसतो. हे क्षणभर खरं मानलं तरी ही इतर कारणं आहेत. त्याशिवाय विधानसभा आणि विधान परिषदेच्या निकालांचं झुकतं माप भाजप कडे होतं. त्यामुळे शिवसेनेला महाविकास आघाडी पुढील निवडणुकीत मैत्रीचा हात देईल की नाही हे भय असण्यापेक्षा भाजपचं वाढतं वर्चस्व बघुन ही सत्तापालट करणं आवश्यक वाटलं. कदाचित आज शिंदे बरोबर असलेले आमदार अडिच वर्षांनंतर किंवा कालावधी संपण्यापूर्वी बरेचजन भाजपवासी होतील.तेव्हाही आपण साधी जनता म्हणून नवल वाटण्याचं कारण नाही. कारण राजकारण ही लांब पल्ल्याची यात्रा आहे.कित्येक होतकरू कार्यकर्त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जाता आलं तरच राजकारणी यशस्वी होतात. इथे नितीमत्ता चालत नाही. हवा पाहून तिवा मांडणाऱ्यांनाच लाल दिव्याची गाडी मिळते.राजकीय पक्ष हे स्टेशनसारखे आहेत.म्हणुनच या पक्षातुन त्या पक्षात असा प्रवास करावा लागतो. ही फाटाफूट नवीन नाही.त्यासाठी तत्वांचं ओझं सोबत वाहण्याची मुळीच गरज नाही. जुन्याच भक्तांना थोडा नवा प्रसाद चढवला की सारं ओके!फक्त १६ आमदार घेऊन गोवा गाठणाऱ्या शिंदेंकडे सर्व आमदार, खासदार जाऊ लागले, ते सर्व भयग्रस्त आहेत.लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात.पुर्व दिशेला नाही.

उद्या सुर्याने दिशा बदलली तर लोकही दिशा बदलतील. आता जहाज फुटलं आहे. फुटलेल्या जहाजात कुणी बसत नाही. त्यामुळेच आता प्रवासी जहाज बदलत आहेत.आज एवढे प्रवासी बाहेर,तेवढे प्रवासी बाहेर ह्या बातम्या नित्याच्या आहेत.राजकारणात कुणी कुणाचे शत्रू आणि कुणी कुणाचे मित्र नाही. सत्ता स्थापना ही बदलत्या परिस्थितीशी केलेला समझोता असतो. म्हणून सापनाथ नागनाथाची युती झाली होती. धर्मांध आणि धर्मनिरपेक्ष (?) जहाल हिंदुत्ववादी आणि मवाळ हिंदुत्ववादी(?) अशी ही युती होती. महाविकास आघाडी म्हणजे अनैतिकतेने नैतिकतेच्या (?) गळ्यात गळा घालून झालेली गळाभेट होती. जीथे तत्वांची बैठक नव्हती तिथे ही फाटाफूट किमान माझ्यासारख्या माणसाला अपेक्षित होती. म्हणूनच एकनाथ शिंदेंनी कितीही सफाईपुर्ण आपला युक्तिवाद, हिंदुत्ववाद पाजळला तरी ती स्वतःची कवचकुंडले अधिक मजबूत करण्याची कृती आहे, हेच शेवटी आपण मानलं पाहिजे.ज्या हिंदुत्ववादाचं ढोल पीटत ते बाहेर पडले ते हिंदूत्व मनाच्या कोपऱ्यात पडून राहिलं आहे.सत्ता बदलल्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांच्यात खातेवाटप झाले.अर्थातच महत्वाची खाती फुटीर गटाचे (शिंदे गटाचे) मोठे भाऊ भाजपने आपल्याकडे ठेवलें.

आता शिंदेंनी काय बोलावं काय बोलू नये, हे मोठे भाऊ फडणवीसच ठरवतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आपली खुर्ची सदैव शिंदेंच्या बाजूला राहिल अशी काळजी घेतलेली दिसते. शिंदेंना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं फडणवीस शिंदेंचा माईक ओढून स्वतः देतात. फडणवीस बोलायला लागतात तेव्हा शिंदे फडणवीसांच्या हाताला स्पर्श करुन मला काही बोलायचंय असं खुनेनं सांगतात. मग फडणवीस मुकसंमती देतात.हेफुटीर गटाचे शिंदे आणि भाजपचे फडणवीस खरेच लहान भाऊ मोठे भाऊ वाटतात. आजपर्यंत महाराष्ट्राला नाममात्र उपमुख्यमंत्री लाभले. पण फडणवीसांनी आपली खुर्ची शिंदेंच्या बाजूला ठेवून माइक ओढून निर्णय थोपवणारा उपमुख्यमंत्री म्हणून सकल महाराष्ट्राला ओळख करून दिली. पुढे अनेकदा असा अनुभव येईल. आताही आपल्या खांद्यावर हिंदुत्वाचं ओझं फडणवीस आणि शिंदे यांनी ठेवलं नाही. पुढे मंत्री पदाचा विस्तार होईल तेव्हाही हींदुत्वाची धुरा कुणाच्या खांद्यावर राहणार नाही. पण निवडणुकांच्या रणधुमाळीत हेच हिंदूत्वाचं ओझं हे पक्ष, कष्टकरी,शेतकरी आणि कामगारांच्या डोक्यात भरतील. आणि ही भोळी भाबडी माणसं या निवडणुकीपासून त्या निवडणुकीपर्यंत ते डोक्यातुन काढणार नाही. हाच खरा भाजप, शिंदे आणि शिवसेनेचा कामचलाऊ हिंदुत्ववाद आहे, तो आपण सगळ्यांनी ओळखायला हवा.

ओबीसी आरक्षणाविषयी बोलताना फडणवीस बेंबीच्या देठापासून आग ओकत होते. तो प्रश्न संपला आहे. आतापर्यंत सत्ता त्यांची आहे.आता ओबीसींना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.तसेच एक मराठा लाख मराठा म्हणत लाखोंच्या संख्येत मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाच्या अपेक्षा शिंदे पुर्ण करतील,असा आशावाद व्यक्त करायला हरकत नाही.रात्री सगळे झोपल्यावर स्वतःजागणाऱ्या शिंदेंना आणखी जागावं लागणार आहे.पुर्वी फोडाफोडी साठी जागावं लागलं.आता फुटलेले फुटु नये म्हणून जागावं लागणार आहे.फडणवीसांनाही आपल्या अभिनयाची झलक दाखवत राहावं लागेल.वेश बदलून घेणं हा त्यांचा जुनाच प्रकार आहे. तसेच सत्तेतील इतर लहान सहान कलाकार आहेत त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

✒️राजू बोरकर(लाखांदूर,जिल्हा,भंडारा)मो:-७५०७०२५४६७