आधी बाईलवेडे: मग रामभक्तीचे धडे!

(संत तुलसीदास जयंती व पुण्यतिथी सप्ताह विशेष)

रामभक्तीमध्ये संतश्रेष्ठ तुलसीदासजी इतके तल्लीन झाले होते, की त्यांना राम नामाशिवाय काहीच सुचत नव्हते. आपल्या याच भक्तीमधून त्यांनी प्रसिद्ध रामचरीतमानस या भक्ती काव्याची रचना केली. ज्यामध्ये असे म्हटले गेले आहे, की या महान काव्याची रचना करण्यासाठी त्यांना स्वयम श्रीरामभक्त हनुमान यांनी सांगितले होते. भगवान श्रीरामांप्रती असलेल्या आपल्या या निस्सीम भक्तीमुळे त्यांना श्रीरामांनी चित्रकुट मधील अस्सी घाट येथे प्रकट होऊन दर्शनसुद्धा दिले होते. या प्रसंगी भगवान श्रीरामांनी त्यांना चंदनटीळा लावल्याचाही उल्लेख त्यांनी या दोह्यात केला आहे-

“चित्रकुट के घाट पै, भई संतन के भीर|
तुलसीदास चंदन घीसै, तिलक देत रघुबीर||”

जसे सूर्यमालेत सूर्याला महत्वाचे स्थान प्राप्त आहे, तेच स्थान संतश्रेष्ठ तुलसीदासजींना भारतीय कवींमध्ये मिळालेले आहे. ते एक हिंदू संतकवी होते. ते आपल्या रामभक्तीमुळे प्रसिद्ध होते. त्यांना रामायणाची रचना करणाऱ्या महर्षी वाल्मिकींचा कलयुगी अवतारसुद्धा म्हटले जाते. तसेच भयनाशक हनुमान चालीसाचे ते रचनाकार देखील आहेत. प्रभू श्रीरामचे ज्यांना साक्षात दर्शन घडले, असे महान संतकवी म्हणजेच संतशिरोमणी तुलसीदासजी होत.संतशिरोमणी तुलसीदासजींचा जन्म श्रावण महिन्यात शुक्ल पक्षात सप्तमीला झाला. परंतु त्यांच्या जन्म तिथी वरून वेगवेगळे मतभेद पहायला मिळतात. जाणकार इतिहासकारांनुसार त्यांचा जन्म १४९७, १५११ किंवा १५३२- संवत १५८९मध्ये झाला असल्याचे म्हटले जाते. तथापि त्यांच्या जन्माबद्दल दोहा प्रसिद्ध आहे-

“पन्द्रह सौ चौवन विसे कालिन्दी के तीर!
श्रावण शुक्ला सप्तमी, तुलसी धरयो शरीर!!”

त्यांचे जन्म ठिकाण म्हणून उत्तर प्रदेशमधील राजापूर-चित्रकूट या ठिकाणाचा उल्लेख करण्यात येतो. त्यांच्या आईचे नाव हुलसीदेवी तर वडिलांचे नाव आत्माराम दुबे असे होते. संत तुलसीदासजींचे पाळण्यातील नाव रामबोला असे होते. या नावामागे एक कथा आहे. असे म्हटले जाते, की त्यांचा जन्म हा इतर मुलांसारखा झाला नसून फार अद्वितीय स्वरूपाने झाला होता. ते आपल्या आईच्या गर्भात जवळपास १२ महिने राहिल्यानंतर जन्माला आले. विशेष म्हणजे जन्मतःच त्यांना पूर्ण दात देखील होते. जन्माला आल्या आल्या त्यांच्या मुखातून प्रथम शब्द- राम असा निघाला होता व याच कारणामुळे त्यांचे नाव रामबोला असे ठेवण्यात आले होते.रामबोलाचे संत तुलसीदास कसे झाले? यामागेसुद्धा खुप रोचक कथा आहे. संत तुलसीदासजींच्या पत्नीचे नाव रत्नावली होते. तिच्या प्रेमात ते इतके बुडाले होते, कि ते एक क्षणसुद्धा तिच्याशिवाय राहू शकत नव्हते. एके दिवशी ती माहेरी गेली, असे कळल्यावर ते खुप व्यथित झाले. तिला भेटण्याकरिता व्याकूळ झालेले संत तुलसीदासजी रात्रीच्या घनदाट काळोखात नदी पार करून गेले. ही गोष्ट त्यांच्या पत्नीला आवडली नाही व दोघांमध्ये वाद निर्माण झाला. रात्नावलीने त्यांना खालील दोह्यामधून फटकारले-

“अस्थि चर्म मय देह यह, ता सों ऐसी प्रिती!
नेकु जो होती राम से, तो काहे भव-भीत!!”

याच दोह्यामुळे रामबोलाचे मतपरिवर्तन झाले व यातूनच जन्म झाला तो संतश्रेष्ठ तुलसीदासजी यांचा.संतशिरोमणी तुलसीदासजींचे प्रथमगुरु नरहरिदास होते. अगदी लहानपणीच आई आणि वडिलांचे निधन झाल्याने ते पोरके झाले होते. अशा या अनाथ मुलाला गुरूदेव नरहरिदासजींनी सांभाळले. त्यांनी संत तुलसीदासजींना आपल्या आश्रमात राहायला जागा दिली. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले संत तुलसीदासजींनी वेदांचे ज्ञान वाराणसी येथून प्राप्त केले. त्यांना हिंदी साहित्य आणि दर्शनशास्त्राचे धडे प्रसिद्ध गुरु शेषाजी यांच्याकडून मिळाले होते. नंतर ते आपल्या मूळगावी परतले.गुरुकडून मिळालेली शिक्षा ते लोकांना लघुकथा आणि दोहे यांद्वारे सांगत होते. सोप्या भाषेत मिळणाऱ्या ज्ञानाद्वारे लोकांना त्यांचे उपदेश समजत होते. त्यांनी संपूर्ण भारतभर यात्रा केली. परंतु त्यांनी जास्तीत जास्त वेळ हा काशी, अयोध्या आणि चित्रकुट येथेच व्यतीत केला. येथूनच त्यांच्या रामभक्तीची सुरुवात झाली-

“सुत दारा अरु लक्ष्मी पापी के भी होय।
सन्त समागम हरि कथा तुलसी दुर्लभ दोय।।”

गोस्वामी तुलसीदासजी हे महान कवी तर होतेच, परंतु ते प्रख्यात लेखकसुद्धा होते. त्यांच्याद्वारे मुख्यत्वे अवधी आणि ब्रज भाषेमध्ये लिखाण काम केले गेले. ते ब्रज भाषेतील- वैराग्य सांदिपनी, गीतावली, साहित्य रत्न, कृष्ण गीतावली, दोहावली, विनय पत्रिका आदी प्रमुख रचना आहेत. तर अवधी भाषेमधील- रामचरितमानस, बरवाई रामायण, पार्वती मंगल, जानकी मंगल अशा अनेक रचना प्रसिद्ध आहेत. यांपैकी रामचरितमानस हे भक्तीकाव्य फार प्रसिद्ध आहे. हे काव्य म्हणजे एक प्रकारचे रामायणच आहे. या काव्यामध्ये सात कांड आहेत. हे सात असे आहेत- बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, लंकाकांड आणि उत्तरकांड. यामधील सुंदरकांड हे वर्णन फार प्रभावी आहे. संत तुलसीदासजींनी हे काव्य सव्वीस दिवसांत लिहून पूर्ण केले, असे म्हटले जाते. यांशिवाय हनुमान चालीसा, हनुमान बहुक, तुलसी सतसाई आणि हनुमान अष्टक हे सुद्धा सर्वज्ञात आहेत. रामचरितमानस या ग्रंथाची प्रस्तावना त्यांनी सुरुवातीला मांडली आहे. यामध्ये भगवान श्रीराम तसेच रावण महाराज यांच्या पुर्वजन्मांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे.

रामलीला या उत्सवाचा प्रारंभ हा रामचरितमानस मधूनच झाला, असे मानले जाते. विनय पत्रिका ही त्यांची शेवटची रचनाकृती होय; ज्यावर प्रभू श्रीरामाचे हस्ताक्षर होते, असे सांगितले जाते. आयुष्याच्या शेवटी त्यांना आजारपणाने ग्रासले होते. शेवटी १६२३- संवत १६८०मध्ये गंगा नदीच्या किनारी अस्सी घाट येथे त्यांचा मृत्यू झाला. याचा उल्लेख या दोह्यात पाहायला मिळतो-

“संवत सोलह सौ असी, असी गंग के तीर|,
श्रावण शुक्ला सप्तमी, तुलसी तज्यो शरीर||”

अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या मुखात राम नाम होते, खरोखरच आपल्याही ओठांतून सहज शब्द उमटतील, की भक्ती असावी तर अशी!

!! पुरोगामी नेटवर्क परिवारातर्फे जयंती-पुण्यतिथी सप्ताहाच्या पावण पर्वावर त्यांना व त्यांच्या लेखनकौशल्याला विनम्र अभिवादन !!

✒️श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी(भारतीय संतचरित्रांचे गाढे अभ्यासक व विश्लेषक)गडचिरोली,मो:-७७७५०४१०८६

गडचिरोली, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, शैक्षणिक, सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED