धरणगावात अण्णाभाऊ साठेंची जयंती उत्साहात साजरी…

30

🔹भा. रा. युवक काँग्रेस आणि राजे प्रतिष्ठान यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन…

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.3ऑगस्ट):-येथील मोठा माळी वाडा परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. भा. रा. युवक काँग्रेस आणि राजे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक च्या जीर्ण झालेल्या फलकाचे देखील नूतनीकरण करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे डॉ.व्ही.डी.पाटील यांनी सांगितले की, आपल्या मुलांना शिकवा तरंच त्यांचा विकास होईल. बहुजन समाजातील महापुरुषांनी सर्व समाजाला संघटीत करण्याचं कार्य केले आहे, असे प्रतिपादन डॉ. पाटील यांनी केले.

विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी अण्णाभाऊ साठेंच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय करून दिला. कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांचे चरित्र सातासमुद्रापार रशिया मध्ये सांगणारे अण्णाभाऊ हेच आद्य शिवशाहीर आहेत. दीड दिवस शाळेत गेलेल्या व्यक्तीला साहित्यरत्न किताब देऊन गौरविण्यात आले कारण अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून दीन दुबळ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली.

कार्यक्रम प्रसंगी डॉ.व्ही.डी.पाटील, विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील सर, राजे प्रतिष्ठान चे शहराध्यक्ष राजू महाजन, काँग्रेसचे रामचंद्र माळी, भूषण भागवत, योगेश येवले, रोटवद चे राजू पाटील, नंदलाल महाजन, सामजिक कार्यकर्ते शेखर महाजन, संजय महाजन (गब्बर पहेलवान) यांच्यासह परिसरातील माता भगिनी, पुरुष बांधव, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू चित्ते, अजय चित्ते, पूनम चित्ते, किशोर चित्ते यांच्यासह भा. रा. युवक काँग्रेस आणि राजे प्रतिष्ठान चे कार्यकर्ते तसेच समाज बांधवांनी परिश्रम घेतले.