“मेत्ता” (मैत्री)

गौतम बुद्धाच्या मैत्री भावनेला अंत नाही,बुद्धांनी दर्शवलेली मैत्री ही केवळ मानवा पुरतीच मर्यादित नसून ती प्राणी पक्षी वनस्पती संपूर्ण सजीव सृष्टी या सर्वांच्या प्रती आहे,”मैत्री” करण्याचा संदेश गौतम बुद्धाने दिला, मेत्ता (मैत्री) आपणास आनंदी ठेवते व दुःखापासून, वेदनेपासून मुक्त होण्यास मदत करते.मनाच्या उदात्त अवस्थेमधील प्रथम उदात्त अवस्था म्हणजे “मैत्री भावना” होय. ज्याप्रमाणे सदगुण हा मानवी मनामध्ये निसर्गतःपाहायला मिळतो,त्याचप्रमाणे वाईट प्रवृत्ती सुद्धा मानवामध्ये कुठेतरी दडलेल्या असतात.या प्रवृत्तीचा विकास करायचा की त्याचे दमन करायचे हे प्राप्त परिस्थिती आणि व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असते. सद्गुणाचा विकास करण्यासाठी अत्यंत कठोर परिश्रम घ्यावे लागतात. ज्यांना समाज हितकारक व सैद्धांतिक आणि कृतीने उदात्त बनावयाचे आहे, ते लोक सद्गुणाचा विकास करण्याची संधी गमावत नाहीत. ते आपल्या मनातील सुप्त दुर्गुणांना वर ही येऊ देत नाहीत परंतु मनात दडलेल्या सदगुणांचा विकास करण्यासाठी, त्यांना योग्य वळण लावण्यासाठी प्रखरपणे प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे मानव जमिनीखाली दडलेल्या हिऱ्याला बाहेर काढण्यासाठी प्रचंड पैसा खर्च करतात व परिश्रम ही करतात तर कधी कधी त्यांना प्राणही पणास लावतात, त्याचप्रमाणे मनुष्याला आपल्या सद्गुनाच्या शोधासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि संयम अत्यंत आवश्यक असतो, सद्गुणाच्या शोधासाठी मानवाकडे संपत्ती असावीच ही अट नसते गरीब- श्रीमंत, स्त्री- पुरुष कोणीही या मौल्यवान सदगुणांना जाणून त्याचा विकास करू शकतात.ज्याप्रमाणे निसर्गतःच मानवामध्ये काही दुर्गुण लपलेले असतात.

त्याचप्रमाणे त्या विरोधी सद्गुण ही उपजतच असतात.मानवा मधला अत्यंत विनाशकारी दुर्गुण म्हणजे क्रोध,राग होय. पण याच दुर्गुणाला नष्ट करणारा सद्गुण म्हणजे मेत्ता भावना (मैत्री भावना). मेत्ता खऱ्या मित्राच्या मनाची उदात्त अवस्था असते.कारण खरा मित्र आपल्या मित्राच्या कल्याणाची खरीखुरी मंगल भावना मनात बाळगत असतो. ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाच्या संरक्षणासाठी तिचे प्राण पणास लावते त्याचप्रमाणे मानवाने असीमित मैत्री भावना या सृष्टीतील सर्व जीवांच्या बाबतीत बाळगावी. असा धम्म उपदेश तथागत गौतम बुद्ध देतात, हे जरी वाचायला आणि समजायला सोपे वाटत असले तरीही त्याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये अवलंब करणे हे ही तितके कठीणच.
तथागताने सांगितलेली ही मैत्री भावना म्हणजे आईने आपल्या बाळा विषयी दाखवलेले उत्कट प्रेम नव्हे तर त्याच्या खऱ्या कल्याणाची बाळगलेली मनीषा होय. कारण बाळाविषयी चे उत्कटप्रेम त्याला बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते, आपल्या मुला विषयी मैत्री भावना म्हणजे त्याला सुमार्गावर चालण्यासाठी प्रेरित करणे होय. मैत्री भावना म्हणजे वैशियक प्रेम किंवा वैक्तिक आपुलकी दाखवणे नव्हे कारण या दोन्हीमुळे दुःखाचा उदय होतो.

मैत्री भावना म्हणजे केवळ शेजार सौख्य नव्हे कारण मैत्री भावना ही शेजारी आणि इतर या मध्ये भेद करत नाही. मैत्री म्हणजे वैश्विक बंधुत्व किंवा भगिनी भाव नव्हे कारण यामध्ये सर्व प्राणीमात्र सामावलेले असतात. प्राण्यांमध्ये मानवासारखे बौद्धिक सामर्थ्य नसल्याने त्यांच्या प्रति जास्तीत जास्त करुणा दाखवणे गरजेचे असते. मैत्री म्हणजे केवळ राजकीय,वंशिक,धार्मिक,बंधुत्व नव्हे.
राजकीय बंधुत्व केवळ समान राजकीय विचारधारा असलेल्या व्यक्तीमध्येच निर्माण होऊ शकते.वशिक व राष्ट्रीय बंधुत्व एकाच वंशाच्या व एकाच राष्ट्रांमधील लोकांमध्ये निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपलाच वंश व आपल्याच राष्ट्राविषयी प्रेम निर्माण होऊन इतर राष्ट्राविषयी घृणा निर्माण होते.याचेच उदाहरण म्हणजे हिटलरने ज्यु वंशियाचा केलेला तिरस्कार आणि कत्तल.पश्चिमेकडील राष्ट्रांनी आफ्रिका आणि आशिया मधील राष्ट्रांना केलेले गुलाम. धर्मांच्या नावावर चाललेली जिहाद व कृसेड. गोऱ्या वर्णांच्या लोकांनी काळ्या वर्ण लोकांच्या केलेल्या कत्तली.

जातीय व धार्मिक द्वेषातून होणाऱ्या दंगली.मैत्री भावना या सर्व संकुचित बंधुत्वाच्या पलीकडील आहे. तथागत गौतम बुद्ध आणि ही मैत्री भावना जशी राहुल प्रति,जशी आनंदा प्रती तशीच मैत्री भावना देवदत्त,अंगुलीमाला प्रतिही दाखवली.मैत्री भावना ही इतर प्रति दाखवण्यासाठी नव्हे तर इतरांप्रति सारखे स्वतः प्रति सुद्धा व्यक्त करावयाची भावना आहे.मैत्री भावनेमुळे होणारे फायदे.इतरा प्रति द्वेषभावना नसल्याने सुखाची झोप येते.जशी सुखाची झोप लागते तशीच आनंदाने जाग ही येते.वाईट स्वप्ने पडत नाहीत.मैत्री भावना बाळगणारी व्यक्ती इतरांनाही प्रिय असते.मैत्री भावना बाळगणारी व्यक्तीचे चित्त एकार्ग असते.मैत्री भावनेमुळे चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव असतात.

✒️भंते शाक्यपुत्र राहुल(श्रावस्ती बुद्धविहार पैठण)मो:-9834050603

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, शैक्षणिक, सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED