लॉकडाऊनचा गोंधळ; पवारांनी मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं?

17

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई:-एकीकडे राज्यात अनेक निर्बंध शिथील केल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे अनेक शहरांत कठोरपणे लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश जारी झाल्याने सध्या सर्वत्र संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावर काँग्रेससोबतच राष्ट्रवादीचे मंत्रीही नाराज असल्याची चर्चा असून याच अनुशंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.
शरद पवार आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. सुमारे तासभर मुख्यमंत्री ठाकरे व पवार यांच्यात विस्ताराने चर्चा झाली. या चर्चेनंतर कोणतीही अधिकृत माहिती मुख्यमंत्री वा पवार यांच्याकडून देण्यात आली नसली तरी लॉकडाऊनच्या मुद्द्यावरच ही बैठक होती, असे सूत्रांनी सांगितले.

राज्यात करोनाची स्थिती लक्षात घेऊन ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्याबाबत शासन आदेशही निघाला आहे. ‘ मिशन बिगिन अगेन ‘चा दुसरा टप्पा असे नाव त्यास देण्यात आले आहे. त्यात अनेक निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात मुंबई, ठाण्यासह विविध भागांत स्थानिक पालिका व जिल्हा प्रशासनाने अचानक कठोर लॉकडाऊन लागू केले आहे. मुंबईत घरापासून दोन किलोमीटरच्या पुढे वाहन नेल्यास वाहन जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मिरा भाईंदर या पालिकांच्या हद्दींसह अन्य भागांतही १० दिवसांचा कठोर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आपली वाटचाल नेमकी अनलॉकच्या दिशेने सुरू आहे की लॉकडाऊनच्या दिशेने, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारमध्येही धुसफूस वाढली आहे.

विशेष म्हणजे शरद पवार यांनी गुरुवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती. त्यात गृहमंत्रालयही काही बाबतीत अंधारात असल्याचं पुढे आलं होते. याशिवाय सरकारमध्ये काही निर्णय परस्पर घेतले जातात. आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही, असं राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांचं म्हणणं आहे. याबाबत पवार यांनाही माहिती देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने ही भेट महत्त्वाची ठरली.

पवार व मुख्यमंत्र्यांमध्ये तासभर चर्चा झाली. यादरम्यान, पवारांनी मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊनबाबत काही सूचना केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अर्थचक्राला वेग देण्याची गरज आहे. त्यासाठी निर्बंध शिथील ठेवावे लागतील. ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नोकरदार, कामगार मुंबईत ये-जा करतात त्याचा विचार करायला हवा. निर्बंधांमुळे अगदीच कोंडी होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल, असे अनेक मुद्दे पवार यांनी मांडल्याचे कळते. त्यावर मुख्यमंत्री आता कोणता निर्णय घेतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.