माणसाची अधोगती कशाने होते?

43

एके समयी तथागत बुध्द श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथपिंडकाच्या विहारात राहत होते. त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवन दीप्तिमान करीत एक देव (जनविशेष मानव) बुध्दाजवळ आला आणि त्यांच्या सन्निध जाऊन आदराने त्यांना अभिवादन करुन बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून पुढील श्लोक म्हणाला » ”गौतमा, मी तुला अध:पतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे. कृपा करुन अध:पतनाची कारणे काय असतात ते मला सांगा.” बुध्दानी ती सांगणे मान्य केले व ते म्हणाले-कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्या सारखे आहे. धर्मप्रेमी हा उन्नत पथावर, तर धर्मद्वेष्टा हा अधोगतीच्या पथावरील वाटसरु आहे.अधोगतीच्या वाटसरुला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात. त्याची दुर्गुणी माणसांवर श्रध्दा असते हे त्याच्या अधोगतीचे दुसरे कारण होय.

झोपाळूपणा,गप्पा मारण्याची आवड, निरुद्योगीपणा, आळस, क्रोधाविष्ठता हे सर्व अधोगतीचे तिसरे कारण होय.आईबाप वृध्द झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालनपोषण न करणे हे अध:पाताचे चौथे कारण होय. श्रमण किंवा अन्य जनतेला असत्य भाषणांनी ठकविणे हे अधोगतीचे पाचवे कारण होय.जवळ विपुल द्रव्य,सुवर्ण,धनधान्य असूनही त्या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणे हे अध:पाताचे सहावे कारण होय.आपले कुळ, संपत्ती, जात (जन्म) यांचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टांचा तिरस्कार करणे हे अध:पाताचे सातवे कारण होय.व्याभिचार,मद्यपान, जुगार यांमध्ये द्रव्याचा अपव्यय करणे हे अध:पाताचे आठवे कारण होय.स्वस्रीमध्ये समाधान न पावता वेश्या,गणिका आणि परस्रिया यांचा समागम करणे हे अध:पाताचे नववे कारण होय.असंयमी,उधळी स्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अध:पाताचे दहावे कारण होय.जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला, या जोरावर अफाट महत्त्वाकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अध:पाताचे आकरावे कारण होय.हे कुलोत्तम देवा, ही सर्व अध:पाताची कारणे आहेत. या सर्वांवर विजय मिळवलास तरच तू वाचशील.

सब्ब पापस्स अकरणं कुसलस्स उपसंपदा.
सचितपरियोदपनं में एतं बुद्धान सासनं.

✒️भंते शाक्यपुत्रराहुल,श्रावस्ती बुद्धविहार पैठण(मो:-9834050603)