गोंदवले जवळ पुन्हा एकदा अपघात;महामार्गाच्या अपुऱ्या कामामुळे अपघातांची मालिका सुरूच

34

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.8ऑगस्ट):- सोलापूरहून गोंदवल्याकडे देवदर्शनासाठी निघालेली चार चाकीवरील चालकाचा ताबा सुटून गोंदवले खुर्द (ता.माण)जवळ पुलावरून वीस फूट खोल थेट बंधाऱ्यात कोसळली. रविवारी दुपारी चारच्या सुमारास झालेल्या या अपघातात सोलापूरचे तीघे गंभीर जखमी झाले.सातारा लातूर महामार्गावरील गोंदवले खुर्द जवळील वाघाच्या ओढ्यावरील पुलाचे काम अपूर्ण राहिले आहे. सध्याच्या पावसामुळे या ठिकाणचा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने धोक्याचा बनला होता. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने रविवारी सकाळीच या रस्त्यावर मुरूम टाकला होता. परंतु हा मुरमाड रस्ता अधिकच धोक्याचा झाल्याने दुपारी अपघात झाला.

सोलापूरहून बसवराज महादेव झुरळे (वय 27), हणमंत सुखदेव रुपनर (वय 52), आप्पासो नामदेव काळे (वय 51), वैजनाथ तुकाराम काळे (वय 41) (सर्व रा.शेळगी मित्रनगर, सोलापूर) हे स्विप्ट कारने (एम एच 13 डी इ 9219) गोंदवले बुद्रुक कडे देवदर्शनासाठी निघाले होते. गोंदवले खुर्द जवळील शिलवंतवस्तीजवळील वाघाचा ओढ्यावरील पुलाजवळ येताच या रस्त्यावर पसरलेल्या मुरमाचा अंदाज ना आल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे अर्धवट काम झालेल्या पुलाला ठोकर देऊन कार वीस फूट खोल पाण्यात पडली. या जोरदार धडकेत पुलाचे लोखंडी गज तुटून पडले. तर कारचे भाग तुटून अस्ताव्यस्त पडले.

पुलाला जोरदार ठोकर बसल्याने कार पाण्यात फेकली गेल्याने हणमंत सुखदेव रुपनर, आप्पासो नामदेव काळे,वैजनाथ तुकाराम काळे हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. सुदैवाने अपघातात चालक बसवराज महादेव झुरळे बचावला. सातारा लातूर महामार्गाचे रेंगाळलेले काम व निकृष्ठ कामामुळे गोंदवले खुर्द गावाच्या हद्दीत अपघातांची मालिकाच सुरू आहे. गेल्या मंगळवारी याच रस्त्यावर अपघात होऊन तीन तरुणांना जीव गमवावा लागला. त्यानंतर पाचव्याच दिवशी आज अपघात झाला.