भंडारा जिल्ह्यात झालेल्या महिला अत्याचार प्रकरणी लाखनी पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल निलंबनाची कठोर कारवाई करा : ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

27

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(ता.8ऑगस्ट):- लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अत्याचार झालेल्या महिलेला पोलिसांकडून कोणतीही आवश्यक मदत मिळालेली नाही. याउलट सदर महिला पोलीस स्टेशनमधून आश्चर्यकारक पद्धतीने निघून जाते. तिच्यावर पुन्हा आणखी दोन इसमांकडून जंगलात नेऊन अत्याचार होतो. एखाद्या पीडीत महिलेची किती परवड होऊ नये याबाबत हे उदाहारण ठरू नये. मुरमाळी गावाच्या या महिला पोलीस पाटील यामध्ये मदत करूनही त्यांचा आणि पीडीतेच्या बहिणीचा जबाब पोलिसांनी घेतलेलें नाहीत. ज्या वाहनातून सदर महिलेला आणण्यात आले त्या चालक आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आलेले नाहीत. पोलीस वाहनाचे लॉगबुकही ताब्यात घेतलेले नाही. या प्रकरणी अत्याचारग्रस्त महिलेला कोणत्याही प्रकारची सहानुभूती अथवा मदत न करणाऱ्या लाखनी पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उप सभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव आनंद लिमये यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत त्यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधून माहिती घेतली असता हे निवेदन त्यांनी आज गृह विभागाला दिले आहे. आपल्या निवेदनात त्या म्हणतात, सदर महिलेला वैद्यकीय उपचार मिळण्याची आवश्यकता असताना तिला पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्याची काय आवश्यकता होती हे मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या महिलेला मदत करण्याची गरज असताना कोणत्या प्रकारची कार्यवाही केली याबाबत माहिती मिळणे आवश्यक आहे. अत्याचारग्रस्त महिलेला कोणत्याही प्रकारचे समुपदेशन का दिले नाही ? या महिलेला मदत करण्यामध्ये टाळाटाळ करण्याची पोलिसांची भूमिका कशामुळे समोर आली ? किंबहुना या मधील मार्गदर्शक सूचना पूर्णपणे धाब्यावर बसविल्याचे दिसून येत आहे. नातेवाईकांना कळविणे बंधनकारक असताना त्यांनी तेही केलेले नाही. पोलिसांच्या ताब्यातून महिला बाहेर का पडली याची चौकशी होणे आवश्यक आहे. यामध्ये या घटनेचे पुरावे नष्ट झाले तर सदर प्रकरणाचे गांभीर्य नष्ट होईल अशी शंका इथे उपस्थित होत आहे. महिलेची आरोग्यस्थिती जर अजून खराब झाली तर या महिलेला न्याय मिळणे कठीण होईल. उरलेले लोकांचे जबाब त्वरीत नोंदविण्यात यावेत. सदर महिलेला पोलीस स्टेशनमधून जाण्याबाबत कोणी दबाव आणला आहे की काय याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे.

या निवेदनाची प्रत राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनाही देण्यात आली आहे.