मोर्शी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या !

29

🔸वृषालीताई विघे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

🔹संततधार पावसाने शेतकरी त्रस्त, पिकांचे नुकसान !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.10ऑगस्ट):-सततच्या संकटांना धैर्याने तोंड देत काबाडकष्ट करीत आपले हिरवे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बळीराजाच्या आशेवर यंदाच्या पावसाने खरिपातही पाणी फिरवले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून ‘पाऊस सुसाट आणि शेतकऱ्यांची पिकं भुईसपाट’ अशी विदारक परिस्थिती मोर्शी तालुक्यात ठिकठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुका अध्यक्ष तथा माजी महिला बाल कल्याण सभापती सौ वृषालीताई प्रकाश विघे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मोर्शी तालुक्यातील नदी नाले-ओढे यांनाही गेल्या २० वर्षांपासून कुणीही न पाहिलेला पूर यावर्षी दिसून आला असून मोर्शी तालुक्यातील गावांना पावसाने झोडपल्याने तालुक्यातील गावांमधील शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे.मोर्शी तालुक्यामध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्या-नाल्यांना मोठय़ा प्रमाणात पूर सुरू आहे. त्यामुळे नदीकाठची शेती खरडून वाहून गेली. शिवाय, तालुक्यातील हजारो हेक्टर शेतांमध्ये पाणी साचून राहिल्याने उभ्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.संत्रा गळती मोठ्या प्रमाणात सुरू असून यात संत्रा, सोयाबीन, कापूस, तूर, मिरची, यासह आदी प्रमुख पिकांचा समावेश आहे.

अगोदरच कर्जबारीपणा दुबार-तिबार पेरण्यांमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर एक महिन्यापासून सतत संतधार पाऊस, अतिवृष्टीचे नवे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे. मोर्शी तालुक्यात पावसाच्या पाण्यामुळे बाधित झालेल्या शेतीचा सव्‍‌र्हे करुन शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची मदत शासनाकडून त्वरित मिळावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी महिला बाल कल्याण सभापती सौ वृषालीताई प्रकाश विघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

प्रतिक्रिया ——
मोर्शी तालुक्यात संतधार पावसामुळे शेतात आजही मोठय़ा प्रमाणात पाणी साचले आहेत त्यामुळे संत्रा बागा व शेतातील पिके धोक्यात आली आहे. शेतमजुरांना सध्या कामे नसल्याने त्यांच्यावरही उपासमारीची पाळी आली आहे. अजूनही पावसाळा संपायला बराच कालावधी असल्याने शेतकऱ्यांसमोर टांगती तलवार असल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकरी शेतमजूर हवालदिल झाला आहे. शासनाने शेतकरी शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी मोर्शी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी व शेतमजुरांना तात्काळ मदत करावी — सौ वृषालीताई प्रकाश विघे – तालुका अध्यक्ष रा. काँ. महिला आघाडी तथा माजी महिला बाल कल्याण सभापती.