✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.13ऑगस्ट):-महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांच्या राज्यपाल या घटनात्मक पदाचा वारंवार दुरुपयोग केल्याची माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने वारंवार उघडकीस आणलेली आहे. त्यात रोज नवनवीन भर पडत आहे.

स्वागत तोडकर हा मूळचा रिक्षावाला. त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नाही. मात्र या भामट्याने नावासमोर ‘डॉक्टर’ ( MD, मनोविकार तज्ञ्, NLP, ND ) पदवी लावली व जनतेची फसवणूक केली. या फसवणुकीतून त्याने अक्षरश: कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केली. याच्यावर आजवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. मार्च २०१७ मध्ये ‘महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने’ याच्यावर फिर्याद दाखल केली. त्यानुसार कोल्हापूर येथील राजवाडा पोलिसांनी त्याला बोगस डॉक्टर म्हणून अटकही केली.

या अटकेतून सुटल्यावर या भामट्याने निसर्गोपचार तज्ञ म्हणून प्रॅक्टिस सुरु केली आहे. मात्र ही प्रॅक्टिस सुरु करण्यापूर्वी ‘आयुष’ची मान्यता असणारा कोर्स न करताच निसर्गोपचार केंद्रही सुरू केले. त्यासाठी स्थानिक पोलिसांशी ‘अर्थ’ पूर्ण संबंध जोपासले आहेत. इतकेच नव्हे तर फसवणूक झालेल्या रुग्णांना रोखण्यासाठी त्याने त्याच्या निसर्ग उपचार केंद्रात बाउंसरही ठेवलेले आहेत.

रुग्णांची दिशाभूल करून हा भामटा त्यांची अक्षरश: लूट करीत आहे. काहि दिवसांपूर्वी या भामट्याचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी जाहीर सत्कार केला. या सत्काराच्या फोटोची या भामट्याने जाहिरात केली व तीही ‘सकाळ’ या तथाकथीत विश्वासार्हता जपणाऱ्या वृत्तपत्रातून, संपूर्ण पान जाहिरात. याशिवाय २० एप्रिलच्या ऑनलाईन एडिशनमध्ये या भामट्याचा डॉक्टर म्हणून उल्लेखही केला होता.

वास्तविक राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. भारतीय राज्यघटनेनुसार राज्याचे सरकार काम करत आहे का नाही,  सरकार घटनेची पायमल्ली तर करत नाही ना, हे पाहणे राज्यपालांचे काम आहे. मात्र सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना या कामात जराही रस नाही. त्यांचा सारा वेळ सत्कार समारंभ करण्यातच जातो. राज्याचे कुलपती या नात्याने त्यांनी आजतागायत शिक्षण क्षेत्रातील  कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत. मात्र या घटनात्मक पदाचा वारंवार दुरुपयोग केला असल्याचे पुरावे, ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने वारंवार दिले आहे व त्यासंबंधीच्या बातम्या ‘स्प्राऊट्स’च्या अंकात वारंवार प्रसिद्धी केलेल्या आहेत. प्रसंगी दस्तरखुद्द कोश्यारी यांना समक्ष भेटून त्यांच्याशी चर्चाही केली आहे, मात्र राज्यपाल कोश्यारी यांना या कामात कोणतीही रुची न दिसल्याचे ‘स्प्राऊट्स’च्या एसआयटीला आढळून आले आहे.

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात बोगस पीएचडी पदव्या विकल्या जात आहेत, यात सध्या महाराष्ट्र अग्रेसर आहे. यापैकीच एका कुप्रसिद्ध स्वयंसेवी संघटनेने बोगस पीएचडी वाटपाचा सोहळा आयोजित केला होता. हा कार्यक्रम राजभवनात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यात राज्यपाल कोश्यारी यांनी भाषणही केले.

अशा पद्धतीचे बोगस पीएचडी वाटप देशविदेशात करणारा व या रॅकेटचा सूत्रधार मधू क्रिशन याने तर राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली, यांच्याबरोबर सकाळी राजभवनात ब्रेकफास्ट केला. राज्यपालांनीही त्याचा व त्यांच्या बरोबर असणाऱ्या आरोपींचा जाहीर सत्कार केला, याची फोटोसह बातमी स्प्राऊट्सने १६ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केली.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित संशयावरून एनआयएने ७ मे रोजी २९ ठिकाणी छापेमारी केली. यात सुहेल खंडवानी, छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूट यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यातील सुहेल खंडवानी यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी राजभवनात जाहीर सत्कार केला होता, अशी धक्कादायक माहिती स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीम त्यावेळी ‘स्प्राऊट्स’मधून उघडकीस आणलेली होती. मात्र तरीही दररोज गुन्हेगारी, समाजकंटक प्रवृत्ती असणारे अनेक जण राज्यपालांसोबत फोटो काढून, जनतेची दिशाभूल करीत आहेत.

या सर्व नियमबाह्य घटना स्प्राऊट्सने वारंवार उघडकीस आणल्या आहेत. मात्र राज्यपालांना कोणी भेटायचे, यावर त्यांचे स्वतःचे नियंत्रण नाही. हे सर्व नियंत्रण ठेवण्याचे काम त्यांचे सचिव उल्हास मुणगेकर पाहत आहेत. मुणगेकर यांची नेमणूक राज्यपालांनी केली आहे. मात्र ती नेमणूक ही सपशेल बेकायदेशीर आहे, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने माहितीचा अधिकार वापरून मिळवलेल्या कागदपत्रांतून उघडकीस आणलेली आहे.

विशेष म्हणजे हे सर्व राज्यपाल कोश्यारी यांना ‘स्प्राऊट्स’च्या टीमने प्रत्यक्ष भेटून सांगितले आहे, मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी अद्याप दखल घेतलेली नाही. त्यामुळे ऑनररी बोगस पीएचडी विकण्याचा धंदा करणारे अधिक उर्मटपणे वागून उजळ माथ्याने कोट्यवधी रुपयांची माया गोळा करू लागले आहे. राज्यपाल अर्थात कुलपतींचे त्यांच्यासोबत असलेले फोटो सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध करून जनतेची दिशाभूल करीत आहेत, मात्र राज्यपाल हे मक्खपणे पहात आहेत.

महाराष्ट्र, मुंबई, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED