


हा देश माझा याचे,
भान जरासे राहू द्या रे….!
या ओळी आठवण्याचे कारण हे, की उद्या 15 ऑगस्ट म्हणजे भारत देशाचा ‘स्वातंत्र्य दिन’ आहे; आणि तो 76वा म्हणजे स्वातंत्र्याचे 75 वर्षे ‘अमृतमहोत्सवी’ साजरे करत आहोत. ज्याची तयारी गेल्या दीड वर्षांपासून म्हणजे 75 आठवड्यांपासून शासन-प्रशासन करत आहे. आपणही गेल्या 10-12 दिवसांपासून या तयारीत आहोत. शासकीय कर्मचारी असेल तर तो फार फार तर महिना दुमहिन्यापासून असेल. असो!
उपरोक्त कविता स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापटांची आहे. त्या कवितेत देश कसा असावा? देशातील नागरिक कसे असावे? आणि त्यांनी एक माणूस म्हणून देशाप्रती काय करावे? हे सर्व विवेचिले आहे. लहानपणापासून ते आजच्या यु- ट्यूबच्या काळातही ही कविता बऱ्याच वेळा कानावर आली. कधी ऐकून तालासुरात म्हटलीही! कवितेचा ‘सूर’ आजही तोच आहे; पण लोकांची ‘लय’ बिघडत आहे. कारण ते सध्या ‘ताला’वर राहिले कुठे आहेत!
व्हाट्सअप्पचे ग्रुप्स घ्या, की ज्या-त्या समाजबांधवांनी स्वतःच्या समाजाची एकी म्हणून दुसऱ्या समाजाविषयी निंदनीय केलेल्या पोस्ट असोत, त्यात या कवितेचे भान काही दिसत नाही. स्वतःला मोठे सांगण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखने जरुरी नसताना, मी एक वाचक म्हणून नेहमीच लोकांच्या या द्वेषाने भरलेल्या पोस्ट पाहत आलो आहे. द्वेष इतका पराकोटीचा की एकच पोस्ट ‘मेनी टाइम्स फॉरवरडेड’ म्हणून लिहून येत आहे.
कोण असतात हो, ही ‘लोकं’!, आणि कसा बनतो यांचा ‘समाज’? अन् हे समाज ‘देश’ बनवतो! म्हणजे, यांना ‘देश’च कळलेला नाही.
घरावर राष्ट्रध्वज उंचावला, छातीच्या खिशाला लावला, किंवा गाडीच्या डॅशबोर्डवर लावला, व मग देशभक्तीपर गाणी वाजवली म्हणजे देशासाठी आपण काही केले, आणि मला ‘देश’ कळला असे होत नाही. बाईकची राष्ट्रध्वज घेऊन काढलेली रॅली व सोबत डी.जे. चा ताल, ‘देशभक्ती’ ठासून आत भरून ‘देश म्हणजे…?’ नाही शिकवत. स्वातंत्र्यदिनाच्या चार दिवस मागे व चार दिवस पुढे, मोबाईलची रिंगटोन-कॉलर ट्यून वाजवल्याने, तुमचा सोशल डिस्प्ले त्रिरंगी केला व ‘मेरा रंग दे बसंती चोला’ स्टेटसवर ठेवल्याने ‘देश’ नाही कळत हो!
गाडीच्या बोनेटवर व मागच्या काचेवर ‘भारतमातेचे’ रंगात न्हालेले चित्र ‘देश’ शिकवत नाही. ती भारतमाता नक्कीच ‘देश’ आहे. पण त्या मातेचे स्थान ह्रदयात हवे; अन् तिचे पिल्ले म्हणजे आपण नागरिकही त्यातच सामावेत. तो ‘देश’ गेल्या 1947 पासून ते आजतागायत अपेक्षीत आहे. पण आम्हाला देश म्हणजे काय आणि त्या देशाची व्याख्याच माहिती नाही. केवळ ‘देशासाठी’ म्हणून करतोय? एवढेच माहित! देशाहून माणूस मोठा नसतो; हेही माहित. पण माणसानेच देश बनतो; हे कधी कळेल? ‘राकट देशा,कणखर देशा, दगडांचा देशा’ याचा शब्दशः अर्थ काढला की काय? अन्वयार्थ तर कोणाला समजणार नाहीच. पण देश म्हणजे काय? हे सगळेच समजावायला निघाले. शेजारी देश पाकिस्तानला किंवा चीनला चार शिव्या घालून, तिथल्या नागरिकांना वाईट बोलून देशभक्तीही कळत नाही आणि ‘देश’ही. एवढं नक्की की स्व-देशाचा दुष्मन तो आपला. मग तो पाकिस्तान असो की स्व-देशातल्या विध्वंसक शक्ती. त्या देशासाठी वाईटच!
रंगातला भेद जेव्हा केवळ कलाकृतीत दिसेल, जेव्हा प्रत्येक धर्माची कला कळेल, जेव्हा धर्मातला राहणीमान व बोलचाल एवढाच फरक कळेल, जेव्हा माणसे एकाच रक्ताची असून अवयव समान आहेत ही समानता कळेल, उच्च-नीच केवळ वयात,शरीराच्या वाढीतच असते हे कळेल, जेव्हा ‘तुमचे-आमचे’ एक वाटेल, ‘देश’ तेव्हा कळेल.
माझी मायभूमी, तिची माती, मातीतलीच माणसे, मातीत नष्ट होताना जेव्हा जात-धर्म न बघता रडू येईल तीच ‘देशभक्ती’ असेल. देशाला फोडते ती शक्ती देशातली असली तरी त्याला विरोध करणे हीच खरी ‘देशभक्ती’. माझा देश माझ्याहून मला मोठा वाटला पाहिजे. माझी माणसे माझी का? हा धागा दुसरीकडेही जोडता आला पाहिजे. तर देश जुटेल; कारण तेव्हा माणसे जुटलेली असतील.
‘देश’ म्हणजे आपण; आणि आपण म्हणजे ‘सर्वजण’. ‘जन’ व्हायला सर्व आहेत, पण ‘सर्वांना’ विसरत आहेत. विसरणे समजू शकतो. तो असेल स्मृतीचा दोष. पण, या ‘सर्वांत’ आजही भेद होतो; तो पूर्वीही व्हायचा. देश अशाने घडतो की नाही? माहित नाही. पण तो बिघडतो नक्की.
सैनिकांचा गणवेश घालून, मोठे राष्ट्रध्वज हातात घेऊन, नुसत्या पोकळ घोषणांनी देशभक्तीचा आवाज होत असेलही, पण त्या गर्दीत, आशा अनेक गर्दीची जत्रा होऊन, घोषणा लाखोल्यात जाऊन, गर्दीचा दंगा, व दंग्यात जर मरणासन्न वेदनेच्या किंकाळ्या फुटत असतील तर ‘देश’ही नाही आणि ‘देशभक्ती’ही!
आज तिरंगी ध्वजासोबत स्वतःचा फोटो बऱ्याच जणांचा स्टेटसला पाहिला; पाहून मस्त वाटले. रंगात रंगून गेले; सगळे आनंदी झाले. पण 16 ऑगस्टला भरभराटीचा रंग जर नुसता ‘हिरवा’च वाटला आणि शौर्याचे प्रतीक जर ‘भगवे’ दिसले, तर ‘पांढऱ्या’ शांततेचे ‘चक्र’ गतिमान होणार नाही. मग असे पुढे 76वे येऊ द्या की 100वे महोत्सव, ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा होईल; पण देश कळल्यावाचूनच!
मला देश समजायचा तर इथली माणसे कळावी लागतील. माझा देश तर माणसेही माझी म्हणावी लागतील. माझी माणसे व परकी माणसे हा भेद विसरावा लागेल. ‘देश’ समृद्ध आहे, ते इथल्या गुणी लोकांमुळे. देश आबाद आहे,तुमच्या आमच्या भाईचाऱ्यामुळे. इथली लोकं ओळखा, ‘देश’ म्हणजे काय? नक्की ओळखू येईल.
सर्वांना 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
देश माझा आहे,
कारण इथली माणसे
माझी आहेत….
देश माझा आहे,
कारण देश माणसांचा आहे…
देश माझा आहे,
कारण देश आमचा आहे…
माझा-आमचा समान करतो
तो देश ‘माझा’ आहे…
✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(लेखक/कवी/व्याख्याते,नांदेड)मो:-8806721206




