स्वातंत्र्य सैनिक : हरिश्चंद्र भालेकर

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देशांने इंग्रजांच्या गुलामगिरीतून, पारतंत्र्यातून मुक्त होऊन मुक्त श्वास घेतला, स्वातंत्र्य झाला. त्याचं गौरवशाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात मोठ्या जल्लोषात संपन्न होत आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक देशभक्तांनी, क्रांतीकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. पुरुषांसोबतचं महिलाही खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात सहभागी झाल्या होत्या. अनेकांनी तुरुंगवास भोगला, अनेकांना काळ्या पाण्याची शिक्षाही झाली. भगतसिंह, राजगुरु, सुखदेव हे स्वातंत्र्यवीर तर हसत हसत फासावर चढले. वेगवेगळ्या पातळ्यांवर विविध बंड, आंदोलने झाली. शेवटी इंग्रजांना भारत देश सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला अन् १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री इंग्रजांनी आपला ध्वज खाली उतरवून, सर्व जाती धर्माचे अन् प्रतिनिधीत्व करणारा भारत देश अशोक चक्रांकीत तिरंगा झेंडा डौलाने फडकविण्यात आला.

इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अहिंसक चळवळ पुरेशी नाही असे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मत होते. म्हणून भारतीय पारतंत्र्याच्या काळात इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी सशस्त्र अशा आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले. इंग्रज राजवटीविरुद्ध धैर्याने लढण्यासाठी त्यांनी देशातील भारतीय रहिवासी अन् भारतीय युध्द कैद्यांना आझाद हिंद फौजेत समावेश करुन घेतले. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन या अनमोल, क्रांतिकारी घोषणेनी त्यांनी सर्वांना प्रेरित केले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक भारतीय सहभागी होत होते. त्यापैकीचं एक स्वातंत्र्य सैनिक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंचवली गावचे सुपुत्र हरिश्चंद्र मुकुंद भालेकर.

स्वातंत्र्य सैनिक हरिश्चंद्र भालेकर यांचा जन्म ६ ऑगस्ट १९२२ रोजी चिंचवली गांवी झाला. सुरुवातीला वडिलोपार्जित शेती केल्यानंतर, नोकरीसाठी त्यांनी मुंबई गाठली. तो काळ स्वातंत्र्य लढ्याचा होता. इंग्रज राजवटी विरोधात सर्वत्र आंदोलने, लढे उभारले जात होते. अशा वेळी भालेकर यांची देशभक्ती जागृत होऊन ते स्वातंत्र्य लढ्यात ओढले गेले. अहिंसक मार्गापेक्षा सशस्त्र क्रांती केल्याशिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांना विश्वास होता. त्यातचं, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा त्यांच्यावर प्रभाव असल्याने साहजिकचं ते आझाद हिंद सेनेत सहभागी झाले. त्यांच्या समवेत सहदेव पुतळोजी भालेकरही होते.

आझाद हिंद सेनेत सहभागी झाल्यानंतर हरिश्चंद्र भालेकर अन् सहदेव भालेकर हे सिंगापूर येथे इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात सहभागी झाले होते. दुर्दैवाने ते इंग्रजांच्या तावडीत सापडले. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४८ मध्ये ते भारतात आले. मात्र, त्यांचे सहकारी सहदेव भालेकर यांचं काय झाले त्याबाबत माहिती उपलब्ध नाही. पण, स्वातंत्र्य सैनिक हरिश्चंद्र भालेकर अन् सहदेव भालेकर यांचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग हा चिंचवली गावासाठी निश्चितचं अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे.

हरिश्चंद्र भालेकर यांच्या स्वातंत्र्य रणसंग्रामातील पराक्रमातील माहिती राजापूर तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिक बंडोपंत ठोसर यांनी दिल्यामुळे चिंचवली ग्रामस्थांना त्यांचे कर्तृत्व समजले. नाही तर, ते मुंबईत नोकरी करीत आहेत असाचं ग्रामस्थांचा समज होता. त्यानंतर गांवी आल्यानंतर त्यांचा विवाह झाला. नोकरी निमीत्त पुन्हा मुंबईला गेले. मात्र, स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे त्यांना मुंबईतील एका मिलमध्ये नोकरी मिळाली. २८ सप्टेंबर १९८४ रोजी त्यांचे निधन झाले. भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिराजी गांधी यांनी स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन सुरु करण्याचा घेतलेल्या स्त्युत्य निर्णयामुळे हरिश्चंद्र भालेकर यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या पत्नी श्रीम. तारामती भालेकर यांना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामार्फत पेन्शन सुरु झाली, शिवाय एस.टी. अन् रेल्वे प्रवासासाठी मोफत पासही मिळाला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री नाम. नारायणराव राणे यांच्या हस्ते त्यांच्या पत्नी तारामती भालेकर यांना ताम्रपट देऊन शासनामार्फत सत्कारही करण्यात आला होता. आज, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना स्वातंत्र्य लढ्यातील सैनिक हरिश्चंद्र मुकुंद भालेकर यांच्या क्रांतीकारी स्मृतींना विनम्रतापुर्वक अभिवादन !

✒️मिलिंद कांबळे(चिंचवलकर)मो:-98924 85349

लाइफस्टाइल, लेख, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED