देश का करना हो संपूर्ण विकास तो बालिका शिक्षा ना करे नजर अंदाज!!

मुझे अपने आप ही घडना है सो पढना है!
क्योकी मे लडकी हू मुझे पढना है!
कई जोर जुलूम को समझना है सो पढना है!
कई कानुनो को परखना है सो पढना है!
मुझे नये धर्म को रचना है सो पढना है!
सबकुछ ही बल्की बदलना है सो पढना है!
अनपढ का नही जमाना है सो पढना है!
सब ज्ञानीयो से बतियाना है सो पढना है!
क्योकी मे लडकी हू मुझे पढना है!
पढना है पढना है तुम्हे क्यू पढना है?
पढनें को बेटे काफी है तुम्हे क्यू पढना है!
मुझे क्यू पढना है?
क्योकी मै लडकी हूँ मुझे पढना है!
कुछ करने की मन मे आई है सो पढना है!
कुयोकी मे लडकी हूँ मुझे पढना है!
मुझे दर दर नही भटकना है सो पढना है!
मुझे अपने पाव चलना है सो पढना है!
मुझे अपने डर से लढना है सो पढना है!

प्रसिद्ध लेखिका, कवयित्री कमला भसीन यांची मुलीच्या शिक्षणविषयक कविता ऐकली तेव्हा सहज सुचलं. अतिशय साध्या सरळ भाषेत त्यांनी मुलींनी का शिकावे याची सुरेख मांडणी केली आहे. तसंही मुलींचे शिक्षण हा सुरुवातीपासूनच कळीचा मुद्दा ठरलेला! एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करते. एका स्त्रीच्या शिक्षणाचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होतो. पर्यायाने समाजाला आणि राष्ट्राला ही होतो. त्यासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सर्वप्रथम मुलींसाठी शाळा सुरू केली. त्या मागील उद्देश हा होता की पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रियांना ही पुरुषाच्या बरोबरीचे स्थान मिळावे.व्यवस्थेने लादलेली अलिखित बंधने स्त्रियांनी झुगारून द्यावी. आपला स्वाभिमान जागृत ठेवून आपल्या अस्तित्वाची लढाई तिने स्वतः लढावी. गुलामगिरीच्या शृंखला तोडून सन्मानाने जीवन जगावे आणि हा उद्देश साध्यही झाला. आजची स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना पुरुषाच्या पुढे जाऊन सक्षमपणे कार्य करत आहे परंतु पुरुषाच्या मानाने हे प्रमाण नगण्य म्हणावे लागेल!!

गुणवत्तेच्या दृष्टीने मुली दहावी बारावी बोर्डात नेहमीच बाजी मारतात. यावर्षीही मुलींची गुणवत्ता मुलांच्या मानाने उल्लेखनीय होती. एवढी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुली नंतर जातात तरी कुठे? हा प्रश्न पडतो .या मुलींच्या शिक्षणात नेमक्या काय अडचणी निर्माण होतात. एकाच वर्गात शिकणार्‍या मुलांचे शिक्षण सुरळीत सुरु असताना मुलीचे शिक्षण का बंद होते. मुले शिक्षण घेत असताना त्यांच्याच वयाच्या मुलीचे विवाह होतात आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मुलीवर येऊन पडते. एकविसाव्या शतकात पदार्पण करणाऱ्या भारतातील मुलींचे शिक्षण स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही जेमतेमच होत असेल तर ही खेदाची गोष्ट आहे. शिक्षणाची जिद्द,चिकाटी, गुणवत्ता असतानाही दहावी-बारावी नंतर किंबहुना आठवी नंतरही मुलींच शिक्षण बंद होत असेल. तर याची कारणे काय असावीत. मेरीटमध्ये येणाऱ्या या मुली प्रशासकीय अधिकारी डॉक्टर इंजिनिअर होऊन देशाच्या उत्पन्नात निश्चितच भर पडू शकतात आणि आत्मनिर्भर होऊ शकतात परंतु आत्मनिर्भर होण्याअगोदरच त्यांना घराच्या चौकटीत बंदिस्त तर केले जात नाही ना?चांगलं स्थळ आलं म्हणून मुलीचं लग्न लावल असा विचार करणाऱ्या लोकांनी हाही विचार करावा की, पुढे चालून मुलीच्या जीवनात काही संकट आली तर या संकटातून बाहेर पडण्यासाठी शिक्षणच तिला मदत करेल. अतिशयोक्ती नाही पण समाजात असेही काही उदाहरण आहेत की, अपघात म्हणा किंवा काही कारणामुळे एखाद्या मुलीला वैधव्य आलं तर तिची कौटुंबिक आणि सामाजिक जी कुंचबना होते.

तिला कुठलाही आधार राहत नाही. जर त्या स्त्रीचा पती नोकरीला असेल तर अनुशेषभरतीतून तिला नोकरी मिळू शकते. पण शिक्षण नसल्यामुळे ती स्त्री नोकरी मिळवण्यास अपात्र ठरते.तेव्हा वेळ गेल्यावर शिक्षणाचे महत्त्व समजते. समाजात कितीतरी अशा मुली आहे की त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही त्यांच्याकडून ती संधी हिरावून घेतली गेली. जे काही त्यांना आयुष्यात करायचे होते ते त्यांना करता आले नाही.याची खंत त्या सांगत असतात. यात काल्पनिक असे काहीच नाही तर ही वास्तविक परिस्थिती आहे.

मुलींनी शिकावे सन्मानाने जगावे यासाठी फुले दांपत्याने मुलींसाठी पहिली शाळा काढली. मुली शिकल्या तर काय बदल होतील याचे चित्र त्यांनी रंगवले या चित्रांना गडद रंगाने भरण्यासाठी आपण शिकणे गरजेचे आहे. तसेच तो मुलींचा मूलभूत अधिकार आहे. काही कारणाने मुलींचे शिक्षण बंद झाले असेल किंवा भविष्यात शिक्षण बंद होणार असेल तर मुलींनी प्रसिद्ध लेखिका कवयित्री कमला भसीन यांच्या काव्यातून प्रेरणा घ्यावी.त्या आपल्या काव्यातून मुलींना शिक्षणाची प्रेरणा देतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शिक्षण गरजेचे आहे. स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. आपल्या पुढील पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी शिक्षण गरजेचे आहे. प्रत्येकाला त्याच्या मानवी हक्काची जाणीव व्हावी. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव व्हावी.अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची क्षमता निर्माण व्हावी.पूर्वापार चालत आलेल्या व्यवस्थेने स्त्रियांवर अलिखित बंधने लादली. त्या बंधनाविरुद्ध तिने आवाज उठवावा. नैतिकतेचा आग्रह धरावा. वैज्ञानिक तत्त्वानुसार जीवन जगावे. कालबाह्य प्रथा-परंपराना नकार देण्याची क्षमता निर्माण व्हावी. शिक्षण म्हणजे जीवनाचा अविभाज्य अंग आहे म्हणून मुलींनी शिकलं पाहिजे.

शिकून तरी काय करणार मुली?हा प्रश्न सर्रास पालकांच्या तोंड वळणी पडला.शिक्षण आणि नोकरी हे समीकरण पक्के झालेले असल्यामुळे पालकांना पहिला प्रश्न पडतो की शिकून तरी कुठे नोकरी लागणार आहे. शिकून प्रत्येकाला नोकरी लागणार नसली तरी शिक्षणानें येणार शहाणपण माणसाला जगण्यासाठी लागणारे बळ शिक्षणातून मिळतं. खरं-खोटं चांगलं-वाईट योग्य-अयोग्य याचं ज्ञान शिक्षणाने मिळतं. मुलगी शिकली प्रगती झाली हे जे वाक्य आहे ते अर्धवट शिकलेल्या मुली कशा सार्थ करू शकतील? शिकलेली आई घर पुढे नेई असे म्हटले जाते यामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे.एक शिकलेली आई आपल्या पाल्याचे कुटुंबाचे पालन पोषण त्याचा सांभाळ चांगल्या पद्धतीने करू शकते.आज आपल्या देशात अस्वच्छतेमुळे होणारे आजार असतील किंवा माता मृत्यूचे प्रमाण असेल आहार, विहार, स्वच्छता, आरोग्य या गोष्टी शिक्षणाने साध्य होतील. अर्धवट शिकलेली आई हे कसं काय साध्य करू शकेल?

मुलगी शिकून काय होईल या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. एक स्त्री शिकली तर तिचा सन्मान स्वाभिमान ती स्वतः जपेल आयुष्यात येणार्‍या संकटाचा सामना करण्याची क्षमता शिक्षनाणे निर्माण होईल.ग्रामीण भागातील एका छोट्याशा गावातील मुलगी पी टी उषा जगातील एक फास्ट रनर.. पद्मश्री, अर्जुन पुरस्काराने तिला सन्मानित केलं जातं.अंतरिक्षात पहिली झेप घेणारी कल्पना चावला असेल किंवा भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असेल सोनिया गांधी असेल, मदर टेरेसा असेल भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी ही उदाहरणं कशाची आहेत हे शिक्षनाने साध्य झालेले आहे. शिक्षणाचा मार्ग अवलंबला म्हणून कुटूंबच नाही तर देश सांभाळण्याची जबाबदारी या स्त्रियांनी प्रभावीपणे पार पाडलेली आहे. शिक्षनाने कर्तबगार स्त्रिया समाजात निर्माण होतील. आज पायलट असेल किंवा इंजिनियर असेल डॉक्टर म्हणा किंवा एखादी कर्तबगार सर्जन म्हणा. त्यांचे कार्यकर्तृत्व कशामुळे उजळलं तर ते शिक्षणामुळ! पांढरपेशा वर्गातील उदाहरण असली तरी याचं कार्य कर्तुत्व शिक्षणामुळेच!! शेतकरी मजूर आदिवासी वंचीत वर्गातून ही अशी उदाहरणे पुढे यावीत जेणेकरून त्यांच्या पाऊलखुणा वर पावले ठेवून आपल्याही मुली शिक्षण घेतील सक्षम होतील.

आदरणीय राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा शिक्षणानेच मिळाला. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या आदिवासी समाजातुन आलेल्या त्यांची नेमणूक म्हणजे अतिशय सुखद गोष्ट! आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकून वंचित आदिवासी भटक्या जमातीतील स्त्रियांनाही आपल्या मुली शिकाव्या आणि प्रगतीपथावर त्यांच्याही पाऊल खुणा उमटाव्यात असा आशवाद निर्माण होईल.शिक्षणाने अबला सबला होतील. फक्त घर सांभाळणाऱ्या देश ही सांभाळतील .फक्त घरातील आर्थिक उत्पन्नात भर टाकणाऱ्या देशाच्या आर्थिक उत्पन्नात भर टाकतील .एवढे दिवस अज्ञानाने झालेले नुकसान ज्ञानाने भरून निघेल. शिक्षणाची पताका गगनामध्ये भरारी घेईल.अनारोग्य आरोग्यात बदलेल आणि हा बदल अनुभवायचा असेल तर आपण मुलींना शिकवलचं पाहिजे!

लग्नाच्या बाजारात मुलींचा भाव वधारवा म्हणून मुलींना शिक्षण देणे योग्य नाही. कधी कधी तर शिक्षण पूर्ण होण्याआधीच चांगला वर मिळाला म्हणून तिचं लग्नही लावल जात. म्हणजे येथे शिक्षण दुय्यम झालं. मुलगी चांगल्या घरात पडली असं म्हटलं जातं. मुलगी काय एखादी निर्जीव वस्तू आहे का त्यासाठी अशा पद्धतीने असंवेदनशीलपणे मुलींविषयी उद्गार काढले जातात. मुलीच्या विवाहासाठी सरकारी सेवेत रुजू असणारा मुलगा निवडणारे पालक मुलींना सरकारी सेवा करण्यास प्रोत्साहन का देत नाहीत. सरकारी नोकरी संपत्ती घरदार चांगले म्हणून मुलीचे लग्न लावून देतात काय तर म्हणे तिला घराबाहेर जायचं काम नाही.असं म्हणून मुलीच्या नैसर्गिक स्वातंत्र्यावर प्रतिभेवर बंधने घातली जातात. म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर ही आपण उलटी वाटचाल करत आहोत का? चूल आणि मूल या चौकटीत त्यांना बंदिस्त करत आहोत का? मुलगी स्वतःचं संरक्षण करू शकेल एवढं सक्षम आपण तिला बनवू शकत नाही का? तू स्वतःचे रक्षण करू शकतेस एवढा आत्मविश्‍वास तिच्यात निर्माण करू शकत नाही का? शासनाने मुलीच्या शिक्षणासाठी सुविधा द्याव्यात असं करावं तसं करावं असं म्हणणारे पालक आपल्या मुलीचे शिक्षण व्हावे यासाठी किती प्रामाणिक प्रयत्न करतात??

मुलगा मुलगी हा भेद मुलीच्या शिक्षणातील एक अडथळा आहे. मुली काय परक्याचे धन! त्यांना शिक्षण देऊन करायचं काय ? मुलीच्या शिक्षणासाठी करायचा खर्च मुलाच्या शिक्षणासाठी केलेला बरा अशी पालकांची मानसिकता असते .मुलीच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुढे करून पालक अनेकदा तालुक्याच्या ठिकाणी किंवा शिकण्यासाठी मुलींना दुसरीकडे पाठवण्यासाठी तयार नसतात. पालकांची ही मानसिकता बदलण्यासाठी शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मुली शिकल्यावर होणारे बदल, तसेच मुलींच्या शिक्षणानें होणारे फायदे, स्वतःच्या पायावर उभा राहिल्यावर मुलींना मिळणारे निर्णय स्वातंत्र्य,शहरी भागात मुलींच्या शिक्षणासाठी पालक करत असलेले प्रयत्न, ग्रामीण भागातील मुलंमुली गुणवत्तेच्या बाबतीत कुठेही कमी नाहीत असा विश्वास त्यांच्यामध्ये शिक्षक निर्माण करु शकतात.

बालविवाहाच्या समस्येमुळे मुली शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात त्या कायमच्याच! मुलीच्या शिक्षणातील आणखी एक अडथळा म्हणजे बालविवाह! महाराष्ट्राला आपण प्रगत महाराष्ट्र म्हणतो. ज्या 70 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बालविवाह होतात त्यापैकी महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांचा समावेश होतो. बालविवाहाचे महाराष्ट्रातील प्रमाण अतिशय चिंताजनक आहे. प्रत्येक चार विवाहामागे एक बालविवाह होतो म्हणजे 26 टक्के एवढे बालविवाहाचे प्रमाण आहे. जालना जिल्ह्यात पस्तीस टक्के बालविवाह होतात. परभणी 48/,बीड 43/ हिंगोली 37/असे धक्कादायक प्रमाण बालविवाहाचे आहे. प्रगत महाराष्ट्रात एवढे बालविवाह होतात याविषयी कोणी ब्र काढत नाही. सामाजिक राजकीय हितसंबंधांमुळे” तेरी भी चूप मेरी चूप “या पद्धतीने बालविवाह होत आहेत आणि मुली शिक्षणाच्या प्रवाहातून कायमच्या बाहेर पडत आहेत. जोपर्यंत बालविवाह थांबत नाही तोपर्यंत मुलीचे शिक्षणाचे प्रमाणही वाढणार नाही. कारण बालविवाह मुळे होणारी गळती ही सर्वाधिक आहे.

ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण बंद होण्याचं पहिलं कारण म्हणजे त्यांना शिक्षणासाठी लागणार प्रोत्साहन!ते ग्रामीण भागात शून्य टक्के आहे.मुलींच्या शिक्षणाला ग्रामीण भागातून प्रोत्साहन देणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक! शिक्षकांनी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले तर नक्कीच परिस्थिती बदलते. ग्रामीण भागांतील मुलींचे शिक्षण आजही स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही सातवी किंवा आठवीपर्यंत म्हणजे जितक्या इयत्ता पर्यंत शाळा तितक आमच्या मुलींचं शिक्षण!शिक्षकांनी दिलेले प्रोत्साहन आणि पालकांचे समुपदेशन यांनीही बराचसा फरक पडतो. मी ज्या शाळेत कार्यरत आहे त्या शाळेत जवळ जवळ सात वर्षे काम करत आहे. पदवीधर असल्यामुळे सातवी-आठवीच्या किशोरवयीन मुलींना मी शिकवत असल्यामुळे त्यांच्या समस्या मी जवळून हाताळल्या. माझ्याकडे सहावीचा वर्ग आला. त्या वर्गात मुलींची संख्या 34होती. सतत तीन वर्ष या विद्यार्थ्यांनींशी माझा संपर्क आला.नेहमी नेहमी शिक्षणाचे महत्त्व त्यांना पटवून दिल्यामुळे त्यांच्या अभ्यासात आलेल्या सुधारणांमुळे त्या मुलीमध्ये शिक्षण घेण्याची उमेद निर्माण झाली.आता 34 पैकी 28 विद्यार्थ्यांनी नियमित तालुक्याच्या ठिकाणी शाळेत शिकत आहेत. एवढेच नाही तर अनेक पालकांनी आपल्या मुलींना शिकण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी ठेवलेले आहे. नीट ची तयारी करण्यासाठी काही मुली शहराच्या ठिकाणी राहत होत्या.परंतु कोरोनामुळे म्हणा किंवा पालकांच्या मानसिकतेमुळे म्हणा काही मुलींच्या शिक्षणात अडथळा निर्माण झाला. पालकांची मानसिकता बदलणे हे खूप मोठे आव्हान आहे.शिक्षण घेण्यासाठी मुलींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आणि हे प्रोत्साहन शिक्षक चांगल्या पद्धतीने देऊ शकतात.असा माझा स्वतःचा अनुभव आहे.

गरिबीमुळे मुलींचे शिक्षण बंद होतं हे जरी खरं असलं तरी.. शिक्षण बंद करण्याची वेळ आली तर आधी मुलीचं शिक्षण बंद होतं.मुली घरकामात तसेच आई सोबत शेतात मजुरी करतात आणि त्यांना शिक्षणाची आवड असतानाही दररोज शाळेत पाठवले जात नाही.मुलीच्या शिक्षणाबद्दल अनास्था, असुरक्षिततेची भावना, गरिबी इत्यादी कारणे आहेत. तसेच एखाद्या गरीब वर्गातून आलेल्या पालकाला आपल्या गरीबाच्या मुलीवर कोणी अन्याय अत्याचार केला तर कोणाला दाद मागावी म्हणून अतिशय असंवेदनशील वाक्य आपल्या मुलीविषयी त्यांना बोलावं लागतं. “चुलीतलं लाकुड चुलीतच जळतं” अतिशय मन हेलावून टाकणारे वाक्य या वाक्यातून त्याच्या हतबलतेची जाणीव होते. ग्रामीण भागातील परिस्थिती बदलू शकते. यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे.

वंचित,आदिवासी, भटके-विमुक्त यांच्या तर मुलींचेच काय मुलांच्याही शिक्षणाची दुरावस्था आहे. कष्ट करून करून मुलांच्या हातावरील शिक्षणाची रेखाच मिटली आहे की काय असं आता वाटायला लागलं आहे. अलीकडे तर त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटत नाही तर शिक्षण त्यांच्यासाठी दुरापास्तच!

विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले

वित्ता विना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्याने केले. विद्या न मिळाल्यामुळे काय काय अनर्थ घडले याचा सार महात्मा फुलेंनी वरील ओळीतून बहुजनांना सांगितला.विद्या नसल्यामुळे शूद्रांची जे हाल झाले. ते हाल स्त्रियांचे होऊ नये. समाजाच्या अलिखित बंधनांना स्त्रियांनी आवाहन द्यावे. समाजातील अलिखित बंधनामुळेच लोकांना मुली नकोश्या वाटतात. नकोशा वाटणाऱ्या मुलींना जर पालकांनी शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले तर परिस्थिती काही वेगळी निर्माण होईल. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मुलींनाही मिळेल. शिक्षणानें आलेल्या शहाणपणाचा उपयोग त्या आपलं कुटुंब चालवण्यासाठी करतील. सासर तसेच माहेरच्या लोकांचा आधार त्या बनतील! आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे त्या महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतील. एवढी पात्रता शिक्षण त्यांच्यामध्ये निर्माण करेल. खरं खोटं योग्य-अयोग्य यातील अंतर त्यांना समजेल. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार त्या नक्कीच करतील. शिक्षण त्यांना गुलामगिरीचे चटके बसू देणार नाही. स्वातंत्र्याचे महत्त्व त्यांना समजेल. आपणही योग्य निर्णय घेऊ शकतो याची जाणीव शिक्षण त्यांना पदोपदी करून देईल. आपल्या कुटुंबाचा उद्धार कसा करता येईल याचा मार्ग त्यांना शिक्षण दाखवेल. दारिद्र्य कसं संपवायचं याचा मार्गही शिक्षण दाखवेल. स्वाभिमान,सन्मान अभिमान काय असतो याची जाणीव शिक्षण त्यांना करून देईल. या सर्व गोष्टी अनुभवण्यासाठी मुलींना शिकवावं लागेल.

आपल्या मुलींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रत्येक पालकांनी मुलीला शिकवलं पाहिजे. मुलगी ही ओझं नाही तर ती वडिलांचा सन्मान आहे..अभिमान आहे.. मी माझ्या मुलीला मुलाप्रमाणेच शिक्षण देईल तिला तिच्या पायावर उभे राहण्याचे बळ देईल. स्वाभिमानाने सन्मानाने जगण्याची प्रेरणा देईल. समाजात स्वतःचं अस्तित्व निर्माण करून अनेकांच्या यशस्वी जीवनाच्या कहाण्या बनतील. मुलींना शिक्षणाचे स्वातंत्र्य मिळाले तर मुलीही उंच आकाशात गरुड भरारी घेतील. पृथ्वीवरच नाही तर चंद्रावरही यशस्वी पाऊल खुणा निर्माण करतील.अशी प्रत्येक पालकांनी प्रतिज्ञा केली पाहिजे. आपल्या मुलीच्या यशस्वी कहाण्याचे भागीदार आपण व्हायला पाहिजे. म्हणून प्रत्येक पालकाने जीवन कौशल्य व्यवहार कौशल्य निर्माण करणारे शिक्षण मुलींना द्यावे. शिक्षणामुळे मुलींना आपले भविष्य आणि आयुष्य घडवण्याची संधी मिळेल.

जीवन जगण्याची कला शिकवतं ते शिक्षण! मनगटातील ताकद वापरायला शिकवतं ते शिक्षण! स्वाभिमान जपायला शिकवतं ते शिक्षण!गोरगरीब दीन दलिताविषयी सहानुभूती निर्माण करत ते शिक्षण!सामाजिक बांधिलकी जपायला शिकवतं ते खरं शिक्षण ! नैतिकतेशी नातं जोडतं ते शिक्षण! चांगल्याला चांगलं खर्‍याला खरं म्हणायला लावतं ते शिक्षण! जगणं मरनं यातील अंतर ओळखायला लावतं ते शिक्षण! स्त्रियांचा सन्मान करायला शिकवतं ते शिक्षण! अन्याय विरुद्ध बोलायला लावतं ते शिक्षण! योग्य-अयोग्य ओळखायला लावतं ते शिक्षण! गुलामगिरीच्या चिखलातून बाहेर पडायला लावतं ते शिक्षण! चांगलं वाईट ओळखायला लावतं ते शिक्षण! आपल्या गरजा पूर्ण करत करत इतरांना आपण कशी मदत करू शकतो याचा विचार करायला लावतं ते शिक्षण! सामाजिक बांधिलकी जपायला लावतं ते शिक्षण! धर्माच्या पलीकडे विचार करायला लावत ते शिक्षण! जातीपातीच्या बंधनातून बाहेर पडण्यास मदत करतं ते शिक्षण! श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक ओळखायला लावतं ते शिक्षण! विज्ञान आणि चमत्कार यातील फरक ओळखायला लावतं ते शिक्षण! माणुसकीचं नातं जपतं ते शिक्षण! भूतदया शिकवतं ते शिक्षण! स्वातंत्र्य समता बंधुता जपतं ते शिक्षण! संविधानाविषयी जागरूकता निर्माण करतं ते शिक्षण! संत महापुरुषांच्या विचाराचा जागर करतं ते शिक्षण! समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान करतं ते शिक्षण! समाजातील दुर्बल घटका विषयी सहानभूती निर्माण करतं ते शिक्षण! दुसऱ्याच्या स्वातंत्र्याच्या आड येत नाही ते शिक्षण! दुसऱ्यांच्या मानवी हक्कांना इजा पोहोचवत नाही ते शिक्षण! भ्रष्टाचाराला भ्रष्टाचार म्हणतं ते शिक्षण!मानवतेचा उद्धार करायला लावतं ते शिक्षण! नैतिकतेची शिकवण देते ते शिक्षण! कालबाह्य प्रथा परंपरा ओळखायला लावतं ते शिक्षण! असं परिपूर्ण शिक्षण मी माझ्या मुला मुलींना देईल असा प्रत्येक पालकाने आणि शिक्षकांनी निर्धार करावा. एवढा आशावाद स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवप्रसंगी आपण सर्वांनीच निर्माण करावा.

✒️मनिषा अंतरकर(जाधव)मो:-7822828708

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED