अपघातानंतर दोन तासांत काय घडलं?, चौकशी व्हायला हवी; विनायक मेटेंच्या पत्नीने व्यक्त केला संशय

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.15ऑगस्ट):-शिवसंग्रामचे संस्थापक व माजी आमदार विनायक मेटे यांच्या निधनाने कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. १५ ऑगस्ट रोजी शिवसंग्राम भवन येथे त्यांचे पार्थिवदेह अंतिम दर्शनासाठी ठेवले आहे. यावेळी अनेकांना शोक अनावर झाला होता. असं कसं झालं…आमचा वाघ गेला.. अशा शब्दांत कुटुंबियांनी आक्रोश केला. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या प्रसंगाने उपस्थितांचे डोळे चिंब झाले होते.

अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. १०० नंबरला फोन केला. मात्र, फोन उचलला नाही. मदतीसाठी मी विनवणी करत होतो, मात्र कुणीही थांबत नसल्याने मी रस्त्यावर झोपलो. असे मेटे यांचा गाडीचालक एकनाथ कदम याने सांगितले. यानंतर विनायक मेटे यांच्या अपघातानंतर दोन तासांत काय घडलं? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे. विनायक मेटेंच्या अपघातानंतर घडलेल्या घटनांबाबत ज्योती मेटे यांनी संशय व्यक्त केला आहे.

विनायक मेटे यांच्या निधनाने आई, भाऊ, मुले, पत्नी आणि आप्तस्वकीय शोकसागरात बुडाले. त्यांना लाडाने घरी बप्पा म्हणत.त्यांच्या एकेक आठवणी जागवत कुटुंबियांनी आक्रोश केला. त्यांच्या ८० वर्षांच्या मावशीने माझ्या बप्पाचे असे कसे झाले, आम्ही कोणाकडं पाहायचं, असे म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी केली. अंतर्मनातून त्यांनी फोडलेला टाहो पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. ग्रामीण भागातून महिला, वृद्ध देखील मोठ्या प्रमाणात आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. १५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भातण बोगद्याजवळ मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. जखमी झालेल्या मेटे यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुंबईतील जेजे रुग्णालयात सायंकाळी मेटे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी बीड येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मेटे मुंबईला येत होते.

रविवारी पहाटे पाचच्या सुमारास मेटे यांच्या गाडीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. पुढे असलेल्या कंटेनरला गाडीने धडक दिली. चालकाच्या मागील सीटवर बसलेले मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर बराच काळ ते घटनास्थळी रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. अखेर पोलिसांना माहिती मिळताच एका रुग्णवाहिकेतून त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात आणले. अपघातात मेटे यांचे अंगरक्षक राम ढोबळे हेही गंभीर जखमी झाले असून, चालक एकनाथ कदम याला किरकोळ इजा झाली.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED