🔸गुरूचा महिमा🔸

8

✒️लेखिका:-सौ. भारती दिनेश तिडके

(गोंदिया, मो:-8007664039)

आई ही सर्वात पहिली गुरु असते. ती आपल्या मुलांना योग्य संस्कार देते व योग्य मनुष्य बनण्यास मदत करते. नंतर शाळेत शिक्षक हा गुरु असते. तर आणखी एक महत्त्वाचा गुरु असतो तो म्हणजे निसर्ग.
आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. महर्षी व्यासांनी महाभारत पुराणे लिहिली, त्या व्यास मुनीना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत.,अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, व्यवहारशास्त्र, नीतिशास्त्र ,मानसशास्त्र आहे असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ व्यासांनी लिहिला.
“गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु ,गुरुर्देवो, महेश्वरा||
गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः||”
हा श्लोक आपण रोज प्रात: स्मरणात म्हणतो. यात किती खोल अर्थ दडलेला आहे? गुरु हे प्रत्यक्ष ब्रह्मा ,विष्णु आणि शिव आहेत. अशा श्रीगुरुंना मी नमन करतो असा या श्लोकाचा अर्थ आहे. भक्ताला ज्ञानाची प्राप्ती होते ती केवळ गुरु मुळेच. त्यामुळे कितीही मोठा माणूस असला तरी त्याला मिळणारे ज्ञान, आत्मज्ञान या सर्वांच्या प्राप्तीसाठी गुरुची आवश्यकता असतेच. म्हणतात ना”गुरु विना कोण दाखवील वाट|
आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट||”.
आयुष्यात अत्यंत यशस्वी व मोठ्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती त्यांच्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून, पुढे जात मोठ्या झाल्या. अगदी एकलव्याचे उदाहरण घ्या, गुरूने त्याला नाकारले तरी त्याने आपल्या गुरूंचे पुतळा उभा करून धनुर्विद्येचा अभ्यास केला. यामागचा भावार्थ असा आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक परिश्रम तर हवेच पण त्याला श्रद्धेची ,विश्वासाची जोडही हवी. हा विश्वास श्रद्धा आपल्याला गुरुत दिसते. त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते. ही प्रेरणा देणारी व्यक्ती आपला गुरूच आहे. गुरु दत्तात्रेयांनी चोवीस गुरु केले असे म्हणतात, त्यांनी त्यांच्या प्रत्येक गुरूकडून चांगल्या गोष्टी उचलल्या आणि स्वतःला सिद्धपद प्राप्तीसाठी तयार केले.
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे. परंतु घटाने, घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची तो हा दिवस.
गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप.वर्षभर प्रत्येक गुरु आपल्या भक्तांना अध्यात्माचे बोधामृत भरभरून देत असतात.त्या गुरूंच्या प्रती अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे हा गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागील उद्देश आहे. अंधकाराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा गुरू असतो. जो सकल जीवा स चांगले शिकवितो संस्कार देतो तो गुरू.
“गुरु हा संत कुळीचा राजा |
गुरु हा प्राणविसावा माझा||”.