घुग्घुस शहरातील समस्या तातडीने निकाली काढून रखडलेल्या कामांना गती द्या – ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार

30

🔹भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.16ऑगस्ट):- शहरात निर्माण झालेल्या विविध समस्या आणि मागील मविआ सरकारच्या उदासीन धोरणांमुळे रखडलेली कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी रविवार, दि. १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बैठक घेतली.

घुग्घुस येथील राजीव रतन चौकातील रेल्वेफाटक जवळील रस्त्याची दुरुस्ती, रस्त्याचे दुतर्फीकरण, सुरू असलेल्या उडाणपूलाच्या कामाचा वेग वाढविणे, शहरालगतच्या बायपास रस्त्याची उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून रस्ता सुरु करणे व दुसऱ्या टप्प्याची पाहणी करणे अशा अनेक प्रश्नांसह शहरात वारंवार निर्माण होणार्‍या वाहतुक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने योग्य कार्यवाही करण्यासंदर्भात याठिकाणी सविस्तर चर्चा पार पडली.यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.

येत्या १७ ऑगस्ट रोजी घुग्घुस येथे भेट देऊन या परिसराची पाहणी करून प्रत्यक्ष कामाचे नियोजन तयार करावे. असे निर्देश बैठकीदरम्यान ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी रेल्वे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, वेकोलिचे अधिकारी, आरडीसीचे अधिकारी यांना दिले. यासोबतच दि. २१ ऑगस्ट रोजी यासंदर्भात सुयोग्य नियोजन करून टाईमबॉम्ब कार्यक्रम पद्धतीने स्थानिक पातळीवरील सर्व प्रश्न सोडवून जनतेला त्रासमुक्त करण्यासाठी शर्तीचे सर्व प्रयत्न करावे, आवश्यक निधीसाठी मागणी करावी त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही सुद्धा ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

या बैठकीला, महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे, तहसीलदार निलेश गौंड, न.प. मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, घुग्घुसचे ठाणेदार बबन पुसाटे, भाजपचे निरीक्षण तांड्रा, सिनू इसारप, राजेश मोरपाका, हसन शेख, रेल्वे अधिकारी, वेकोलि अधिकारी, सा.बां.वि. अधिकारी यांचेसह आदि मंडळी उपस्थित होते