


✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.16ऑगस्ट):-विधान परिषदेचे सदस्य होताच गोपीचंद पडळकरांनी कोट्यवधीची गाडी घेतली. ही गाडी खरेदी करण्यासाठीची रक्कम त्यांनी भ्रष्टाचारातून उभारल्याचा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी आज,रविवारी बारामतीत आयोजित पत्रकार परिषदेतून केला. पडळकर यांनी त्यांच्या विधान परिषदेच्या फंडातून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. सांगली, कोल्हापूर तसेच विविध ठिकाणी रस्ते शिवाय इतर बांधकामांच्या कामातून हा भ्रष्टाचार करण्यात आला, असा दावा देखील पाटील यांनी केला.
पडळकरांंच्या भ्रष्टाचारासंबंधी सर्व पुरावे शासन दरबारी सादर करणार असल्याचे पाटील म्हणाले. एका लोकप्रतिनिधीकडून करण्यात येणाऱ्या या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी,अशी मागणी या निमित्ताने त्यांनी केली.चौकशी समिती नेमून यासर्व प्रकरणाचा तपास करावा आणि पडळकर यांच्या सोबत सामील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.देशाचे राष्ट्रीय नेते शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवर खालच्या स्तरातील आरोप करून प्रकाश झोतात आलेल्या पडळकरांनी त्यांची पायरी ओळखावी, असा सल्ला देखील पाटील यांनी दिला.आदरणीय नेतृत्व पवारांवर सातत्याने करण्यात येणारी टिका म्हणजे पडळकरांच्या बालबुद्धीचे प्रतीक होय.
कुणावर टीका करायची? टीका करतांना कुठल्या शब्दांचा वापर करायचा ? याची जाण पडळकरांना नाही. त्यांचे राजकीय भवितव्य अंधातरी असल्याने त्यांच्या डोक्यात ‘केमिकल लोचा’ झाला आहे. अशात त्यांनी मानसोपचारतज्ञांकडून उपचार करून घ्यावा, असा सल्ला देखील पाटील यांनी पडळकरांना दिला. पडळकरांसारखे हजारो ‘गल्लीछाप’ नेते शरद पवार त्यांच्या खिशात घेवून फिरतात. त्यामुळे सध्या मोकाट असलेल्या पडळकरांनी मर्यादेत राहावे अन्यथा त्यांना राजकीय तर नाहीच सामाजिक महत्व देखील राहणार नाही, असा सूचक इशारा पाटील यांनी दिला.




