🔸नवखळा व सायगाटा येथे शेतकऱ्यांशी कृषी संवाद
🔹चंद्रपूर जिल्ह्यातील पेरू व सेंद्रिय शेतींची केली पाहणी
🔸व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महिला शेतकऱ्यांशी संवाद

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.४जूलै): जिल्ह्यात जास्तीत जास्त समृद्ध आणि प्रगतशील शेतकरी निर्माण व्हावे, यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. ते आज चंद्रपूर दौऱ्यावर अाले होते.
नागभिड येथील नवखळा तर ब्रह्मपुरी येथील सायगाटा येथील प्रगतशील शेतकरी सोमेश्वर देव्हारे व शिवदास कोरे यांच्या पेरू व सेंद्रिय शेतीला भेट दिली. तसेच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी कृषी संवाद साधला.
शेतकऱ्यांमध्ये कृषी योजनाची प्रचार प्रसिद्धी व जनजागृतीसाठी हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै ते ७ जुलै कृषी संजीवनी सप्ताह सुरु आहे. यामध्ये सर्व कृषी व कृषी संलग्न विभागाच्या सहकार्याने त्या त्या विभागाच्या योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच प्रगतशील शेतकऱ्यांशी कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त संवाद साधण्यासाठी कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अर्थात उमेदच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला तसेच राज्यातील दीड लाख शेतकरी महिलांसोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी मार्गदर्शन करतांना शेतीची कामे कमीत कमी श्रमामध्ये कशी होतील. तसेच महिलांना शेती संदर्भातील प्रशिक्षण देऊन शेती व्यवसाय कसा पुढे जाईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदच्या माध्यमातून प्रशिक्षित महिला तयार होत आहे. सातबाऱ्यावर कुटुंबप्रमुख पुरुषांबरोबर महिलांचे नाव लावून महिलांना शेती संदर्भातील योजना मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे, असे त्यांनी सांगितले.
नागभीड तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचे यावेळी सत्कार करण्यात आले.ना.दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना प्रगतशील शेतकरी यांनी त्यांच्या विविध शेती संदर्भातील प्रयोग इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन ठरेल असे कार्य करावे. तसेच यावेळी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत संरक्षित शेती व व्यवस्थापन भात व तूर पिकावरील कीड रोगांचे व्यवस्थापन पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
दरम्यान,प्रगतशील शेतकरी सोमेश्वर देव्हारे यांच्या शेतामध्ये ना. दादाजी भुसे यांनी भेट दिली. तसेच पेरू शेतीची पहाणी केली.प्रगतशील शेतकरी अरुण नरुले, रंजना बांबुळे, सोमेश्वर देव्हारे यांनी शेतीमध्ये राबविलेले नवनवीन प्रयोग तसेच सेंद्रिय शेती याविषयीचे मनोगत व्यक्त केले. जिद्द आणि मेहनतीने प्रयत्न केले तर शेती नक्कीच स्वयंपूर्ण होणार असल्याचे मत यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
यावेळी भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर,विभागीय कृषी सह संचालक ,नागपूर रविंद्रजी भोसले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे,कृषी विकास अधिकारी जिल्हा परीषद शंकर किरवे, उपविभागीय कृषी अधिकारी दिगंबर तपासकर,तहसिलदार नागभिड मनोहर चव्हाण,
तालुका कृषी अधिकारी शिरीष भारती,कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही डॉ.व्ही.जी नागदेवते, सहाय्यक गटविकास अधिकारी पुरी,नितीन मते तसेच शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान,ना.दादाजी भुसे यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील सायगाटा येथील कृषिभूषण प्रगतशील शेतकरी शिवदास कोरे यांची सेंद्रिय शेती व भाजीपाला लागवड क्षेत्रात भेट दिली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी संवाद साधतांना शेतकऱ्यांनी उत्पन्न घेताना ते उत्पन्न दर्जेदार कसे होईल. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सायगाटा येथील कार्यक्रमात भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर,विभागीय कृषी सह संचालक ,नागपूर रविंद्रजी भोसले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे,उपविभागीय कृषी अधिकारी डिगंबर तपासकर,तहसीलदार विजय पवार, कृषी विकास अधिकारी जिल्हा परीषद शंकर किरवे,कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही डॉ.व्ही.जी नागदेवते,
ब्रह्मपुरी तालुका कृषी अधिकारी सुनील ताकटे तसेच शेतकरी उपस्थित होते.
नवखळा येथील कार्यक्रमाचे संचालन मंडळ कृषी अधिकारी सोनाली गजभे तर सायगाटा येथे तालुका कृषी अधिकारी सुनिल ताकटे यांनी केले. आभार प्रदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी दिगंबर तपासकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कृषी अधिकारी नागभिड एन.व्ही.तावसकर, पुरुषोत्तम खंडाळे, निलेश मंद्रे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जे.व्ही.कावळे व श्री मोडघरे तसेच कृषी विभागाचे सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक व कृषी मित्र व कृषी मित्र यांनी प्रयत्न केले.

कृषिसंपदा, चंद्रपूर, पर्यावरण, महाराष्ट्र, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED