‘बायकॉट’ ट्रेंड….!

68

‘बायकॉट’ म्हणजे ‘बहिष्कार’! पूर्वी इतिहासाच्या पुस्तकात वाचण्यात आलेला शब्द. इतिहास वाचून मस्तके सुधारली. कशावर बहिष्कार घालावा लागायचा, आणि कोणावर बहिष्कार घातलेला चुकीचे होते; हे प्राचीन व आधुनिक इतिहासात वेगवेगळ्या घटनांच्या संदर्भात वाचले. त्यामुळे चूक व बरोबर हे दोन्हीही कळाले.

भारतातील NSO च्या आकडेवारीनुसार, 2021 च्या संदर्भात भारताचा 77.7% साक्षरता दर आहे; म्हणजे तो 80% च्या आसपास आहे. म्हणजे 100 पैकी 80 जण साक्षर म्हणायला हरकत नाही. NSO साक्षरता दर काढते म्हणजे प्रत्येक सात वर्षावरील भारतीय नागरिकांचे समजपूर्वक वाचन व लेखन तपासून तो ‘साक्षरता दर’ घोषित केला जातो. थोडक्यात, साक्षरता म्हणजे ‘ज्यांना समज आहे.’; जे शहाणे आहेत; ज्यांना स्वतःची बुद्धी आहे; व ती कशी वापरायची हे ठाऊक आहे.

आता ट्विटरवरील भारतीय वापरकर्त्यांची संख्या सांगतो. यांची संख्या फार महत्वाची आहे. कारण हे त्या साक्षर लोकांमधील जास्त शहाणे; थोडक्यात यांना ‘क्लास ऑडिइन्स’ म्हणू आपण. यांची संख्या भारतीय लोकसंख्येतील 2.36 कोटी एवढी आहे(ट्विटरच्या जानेवारी 2022 च्या डेटानुसार). यु.एन. च्या 2022 च्या ताज्या आकडेवारीनुसार भारताची अंदाजित लोकसंख्या जी ‘वर्ल्डोमीटर इलाबोरेशन’ द्वारे काढली आहे; ती 155 कोटीच्या घरात जाते. म्हणजे 155 कोटीतील 2.36 कोटी ‘ट्विटर वापरकर्ते’ म्हणजे भारतीय लोकसंख्येच्या 1.5% लोकं ट्विटर वापरतात. आता फेसबुककडे वळूया. फेसबुक वापकर्त्यांची भारतातील संख्या 23.96 कोटी म्हणजे जवळपास 24 कोटी एवढी आहे. टक्केवारीत 15.45% भरते. याचा अर्थ दोहोंचे वापरकर्ते वेगवेगळे जरी पकडले तरी ते भारतीय लोकसंख्येच्या 20% ही होत नाहीत.

तुम्हाला लेखाचे शीर्षक पाहून हा प्रश्न पडला असेल, की हा इतकी आकडेवारी का सांगतो आहे. लेखाचे शीर्षक काय, अन् हा बोलतो काय! काहीच मेळ नाही. चला तर येतो मग विषयावरती. ट्विटरवरील वापरकर्ते आणि फेसबुकवरील वापरकर्ते यांची तुलना केली तर जनमानसात एक समज आहे. ट्विटरचे वापरकर्ते थोडे सामंजस्य, समजूतदार व जबाबदार या प्रकारात जास्त मोडतात, फेसबुकशी तुलना केली तर. आता त्यांचा समजूतदारपणा मोजणारे मीटर काय नाही. पण चला, म्हणू समजूतदार! बरं,मी हे सर्व भारतीय लोकांविषयी बोलत आहे. तुम्ही जगातील देशांशी आणि त्यांच्या डेट्याशी या लेखापुरती तरी तुलना करू नका; किंवा त्याचा अंदाजही बांधू नका. असो!

सध्या कोणत्याही विषयावर जो ‘बायकॉय ट्रेंड’ सुरू आहे, तो या वापरकर्त्यांचीच देण आहे. असे नाही की जेमतेम 1.5% तील सर्वच हे करत असतील. त्यातील खूप झाले तर 5% असतील. (कारण शहाण्यात पण थोडे अतिशहाणे असतात. तेच समजा तर.) 1.5% च्या 5% म्हणजे 0.075% म्हणजे आपल्या लोकसंख्येतील 0.11 कोटी म्हणजे 11 लाख म्हणजे आमच्या नांदेड जिल्ह्याच्या लोकसंख्येचा तिसरा भाग. आता या संपूर्ण ट्विटर वापरकर्त्यांपैकी तिसरा हिस्सा तर ऍक्टिव्हच नाही. म्हणजे वर्षानुवर्षे ट्विटर वापरलेच नाही. आता मीच ट्विटरवर अकाउंट काढून जमाना झाला, पण शेवटी कधी लॉग इन केले ते मला पण आठवत नाही.

कुठल्याही गोष्टीचा ‘बायकॉट’ हे 11 लाख तुटपुंजे ठरवणार का मग? हो! असतील जरा हुशार, नाहीतर अतिहुशार! मग बाकीचे सगळे उरलेले कमी शहाणे की मुर्खच. बरं, असू द्या! थोडे कमी शहाणे. सामान्याहून अतिसामान्य असतील; पण यांच्या डोक्यांची बेरीज म्हणजे सामान्य बुद्धिमत्तेची बेरीज केली तर त्या 0.075% हुन कैक जास्त भरेल न राव! एवढे पण न समजायला मूर्ख बसले नाहीत इथं.

आता फेसबुककडे वळूया. फेसबुकवरील जनता ही तशी सामान्य म्हणजे ‘मास ऑडिएन्स’. त्यातील निम्मे तर असे आहेत जे फेसबुक अकाउंट काढून बसले, पण वापरत नाहीत. उरलेल्यापैकी तिसरा हिस्सा तर मायनर मुलांचा असेल, ज्यांना ट्रेंड कशाचा असतो हेच कळत नाही. 2021च्या ‘राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाच्या’ आकडेवारीनुसार 10 वर्षाखालील 37.8% मुले फेसबुकवर वापरकर्ते आहेत. काही मोजक्या मुलांच्या सर्व्हेत ही माहिती समोर आली. मला तर आजही मिसुरडे न फुटलेल्या फार कोवळ्या मुलांचे फेसबुकवर रिक्वेस्ट येतात; जे मी रिजेक्ट करतो. फेसबुकवरील ऍक्टिव्ह वापरकर्त्यांचा वाटा हा 15%च आहे. 15.45% चे 15% म्हणजे 2.31% होतात; आणि हे 2.31% म्हणजे भारतीय लोकसंख्येतील 3.58 कोटी जनता. पैकी सर्वजण ‘बायकॉट’ करायला बसले नाहीत. लोकं फेसबुकवर वाढदिवस, अभिष्टचिंतन, कौतुक, शुभेच्छांसाठी आहेत. आता बायकॉट करणाऱ्यांची आकडेवारी काय सांगता येणार नाही. तसे मी आजच माझे फेसबुक लॉग इन केले तर माझ्या मित्रांतील एकही मित्र त्या गटातील दिसला नाही. तुमचे फ्रेंड्स पण तुम्ही चेक करू शकता. एक,दुसरा सोडला तर कोणी त्या ‘ट्रेंड्स’मध्ये सहभागी नसेल. इंस्टाग्रामवरील तर सगळेजण त्यांच्या जीवनात काय चालू आहे, हे दाखवायलच बसले; त्यामुळे त्यांचा विचार इथे नको. आणि काही असले तरी नक्कीच ते ट्विटरचे पण वापरकर्ते असतील, ज्यांची आकडेवारी मी आधीच सांगितली आहे.

व्हाट्सअप्पवर करोडो वापरकर्ते आहेत. पण यात कुठला ट्रेंड चाललेला मला काही दिसला नाही. एखादं दुसरा त्याच ट्विटरवरचे स्क्रिनशॉट टाकत असतो, इतकेच!

उपरोक्त आकडेवारी हे काय मी घरी बसून तयार केलेली नाही; तर ती अधिकृत, विश्वसनीय, जागतिक तसेच भारतीय संस्थांची आहे. राहिला थोडाबहुत माझा अंदाज, तर जसे हे बायकॉटवाले अंधाधुंद तीर मारू शकतात तर मलाही थोडेसे स्वातंत्र्य आहेच की!

ही ‘बायकॉट प्रणाली’ आपल्यापर्यंत पोहचते कशी काय मग? तर त्याची ‘मोठी बातमी’ करून न्यूज चॅनेलवाले तुमच्या विचारांच्या ताटात वाढतात. आपणही विचार न करता, जवळ असलेली बुद्धी न वापरता ते ग्रहण करतो. त्यांचे मत आपले करून त्यात सामील होतो. विषय हा आहे, की बायकॉट कशाला करायचे त्याला करा! ही ज्याची त्याची मर्जी! पण एखादी गोष्ट बहिष्कृत करत आहोत, म्हणजे समाजातल्या एका चालत्या अंगापासून अलग करत आहोत. तुम्हाला एखादी गोष्ट नाही पटली, तर तुम्ही विरोध करू शकता. पण, दुसरा विरोध करतोय म्हणून आपणही आंधळ्यागत त्यात सामील होणे म्हणजे बुद्धी गहाण ठेवल्याचीच खूण होय.

आपण त्या 80% साक्षर लोकांमधले आहोत. ज्यांना समजपूर्वक एखादी गोष्ट कळते. जे डोळे बंद करून अनुकरण नाही करत. जे कामाशी काम, अन् जिथे चूक होत असेल त्याचा वेळीच दाम काढून खराखुरा भाव सांगतात, ते आहोत आपण!

ट्विटर व तिथले ट्रेंड म्हणजे सम्पूर्ण देश नाही. ते देशातील एक घटक होत. त्यांचे एक मत आहे; जे त्यांनी व्यक्त केले. त्यांचे मत, तुमचे होऊ शकत नाही. एकमत होत असेल तर ती ज्याची त्याची मर्जी. पण,कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता निष्कर्षापर्यंत पोहचू नये, एवढेच माझे म्हणणे आहे. कारण बहिष्कार हा इतिहासात असो की वर्तमानात तो वाईटच असतो. ज्याने कोणाचे तरी अतीव नुकसान होत असते, एवढे ध्यानात ठेवा.

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(लेखक/कवी/व्याख्याते,नांदेड)मो:-8806721206