✒️सातारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    सातारा(4जुलै):-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीगाठी वाढल्याचं दिसत आहे. साताऱ्यातील आपल्या घरी असलेले उदयनराजे भोसले यांच्या भेटीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या ‘जलमंदिर पॅलेस’वरील येरझाऱ्या वाढल्या आहेत. कारण नुकतंच काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उदयनराजेंची भेट घेतली होती. मात्र त्याआधी शिवसेना नेते आणि गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांनीही उदयनराजेंची भेट घेतल्याचं समोर आलं आहे.

ना.विजय वडेट्टीवार यांनी काल 3 जुलै रोजी आढावा बैठकीच्या निमित्ताने सातारा दौरा केला. त्यावेळी त्यांनी उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तर त्याआधी म्हणजे 2 जुलै रोजी शिवसेना नेते आणि गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांनीही उदयनराजेंची भेट घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते उदयनराजेंच्या गाठीभेटी का घेत आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, आमची कोणतीही राजकीय चर्चा नाही. ही केवळ सदिच्छा भेट होती. उदयनराजे आणि मी वर्गमित्र आहे, असं यावेळी शंभुराज देसाई यांनी सांगितलं.

ना.विजय वडेट्टीवारही उदयनराजेंच्या भेटीला

दरम्यान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही उदयनराजेंची काल भेट घेतली. वडेट्टीवार हे काल साताऱ्यात होते. महापुराच्या पार्श्वभूमीवर सरकारने केलेल्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला. या दौऱ्यादरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेते आणि राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावर पत्रकारांनी त्यांना भेटीविषयी विचारले असता, भेळ खायला आणि चहा प्यायला उदयनराजेंकडे गेलो होतो, अशी मिश्किल टिपण्णी केली.

महाराष्ट्र, राजकारण, राजनीति, राज्य

©️ALL RIGHT RESERVED