भारतीय नागरिक मतदार होऊन हरवलायं?

27

भारतातील एक नागरिक २१ वर्षाचा झाल्या नंतर त्याने मतदानाचा अधिकार वापरला तेव्हा पासून तो हरवलायं,कुणाला आढळल्यास कळवावे, पण त्याला कोणत्या पत्त्यावर आणून सोडावे? हे सोडणाऱ्याने स्वतः ठरवावे.कारण २१ वर्षापासून तो साठ वर्षा पर्यंत मतदान करत आला. त्यामुळेच त्याने स्वताचा घर बनविले नाही.सरकारी वसाहतीत,इंदिरा निवास,रमाई निवास,अटल योजनेचा,दातोपंत ठेगडी,दीनदयाळ अनेक योजनेचा लाभ धारका होता.आता तो निराधार आणि बेरोजगार सुद्धा असल्यामुळेच तो कुठे ही कधी राहू शकणारा आहे.त्यामुळेच या तरुण तडपदार ते जेष्ठ नागरिकाची मानसिकता बरोबर नसून हा देशातील कोणत्यातरी राजकीय पक्षाच्या एकतर्फी प्रेमात पडलेला असतो. परंतु ज्या पक्षावर आपण मनापासून नागरिक,मतदार म्हणून प्रेम करतो.तो पक्ष या नागरिक, मतदारा वर प्रेम करतो की नाही किंवा त्यांची काळजी करतो की नाही? हे तपासून बघण्याची या नागरिकाची मतदारांची अजिबात मानसिकता नाही.

सुजान नागरिक, मतदार असल्यामुळे दरवेळी या पक्षप्रेमामुळे त्यांचा विश्वासघात होत आलाय. कधी या नागरिकाचा पक्ष सत्तेत आला तरी याचे नुकसान होते आणि सत्तेच्या बाहेर असला तरी याच नागरिक, मतदारांचे न भरून येणारे नुकसान होत आले आहे. मतदान करतांना देशातील दोन पक्षाशिवाय तिसरी बटनही ई व्ही एम मशिनच्या बॅलेट युनिट वर असते याकडे जागृत मतदारांनी कधीच लक्ष दिले नाही.या नागरिकाने नुकतंच मुलाच्या नर्सरी मध्ये प्रवेश घेण्यासाठी कर्ज काढलाय. याचा शिक्षणावर अजुनही ठाम विश्वास आहे. माझा मुलगा शिकून मोठा होईल अशा स्वप्नात तो आज घराच्या बाहेर पडलाय. माझ्या आई वडिलांनी मला स्वतःला शिकवतांना इतके पैसे कधीच खर्च केले नाही असंच काहीसं पुटपुटत त्याने उंबरठा ओलांडला होता.तो घराबाहेर पडतांना सिलेंडरचे पैसै आलमारीत ठेवलेत, असे बायकोला म्हणाला व दुचाकी सुरू करून निघाला होता. थोड्या दूर जाताच त्याला बायकोचा फोन आला. ती म्हणाली, सिलेंडर महागला डिलीव्हरीला आलेला माणूस जास्त पैसे मागतोय. तुम्ही ठेवलेले पैसे कमी पडता आहेत. हा थोड्यावेळ गप्प राहिला आणि म्हणाला शेजाऱ्याकडून मागून घे,मी आल्यावर परत करतो आणि हा पुढे दुचाकीने निघाला.

एक अर्धा किलोमीटर गेलाच असेल की आणखी त्याच्या मोबाईल वर मॅसेज आला की अमुक अमुक कलम अंतर्गत या तारखेपर्यंत विज बिल व‌ वाढीव‌ विज बिल न भरल्यास आपले विज कनेक्शन डिस्ककनेक्ट करण्यात येईल. त्याने तो मॅसेज वाचला व मागे घराकडे वळून पाहिले. इतकं जास्त विज बिल का आले? असा प्रश्न त्याला पडला पण कामावर जायला उशीर होत असल्यामुळे पुढे जाऊ लागला. रस्त्यावर याला कुठे तरी याने मत दिलेल्या राजकारणी पक्षाचे मोठे बॅनर दिसले ज्यावर त्या पक्षाच्या मुख्य नेत्याने नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या ते भव्य बॅनर बघून याचं मन भरून आलं,माझी सरकार निवडून आली असा अभिमान उराशी ठेवून हा पुढे जाऊ लागला.

सिंगल वर येताच त्याला मित्राने हात दाखवला,मित्र खूप दिवसांनी भेटला म्हणून चहा पिण्यासाठी याने आग्रह केला. दोघांनी चहा घेतला व हा पैसे देण्यासाठी गेला, एक दहाची नोट काढून याने चहावाल्याला दिली. त्याने आणखी दहा मागितले. याला कळले नाही, कि तो आणखी दहा का मागतोय? शेवटी चहावाल्याने सांगितले की आजपासून दूधाचे भाव वाढलेत, दूधावर जीएसटी लागली आहे. त्यामुळे आजपासून 10 रू कप चहा झालायं. याने मूकाट्याने आणखी दहाची नोट काढून दिली व जीएसटी म्हणजे काय व त्याच कॅल्क्युलेशन काय असते? कोण हे लागू केलं ? याचा मनात विचार करत मित्राचा निरोप घेऊन तो पुढे निघाला.पुढे जातच आहे की,त्याला त्याच्या विमा एजंटचा फोन आला. त्याने सांगितले की दहा दिवसात वार्षिक विमा हप्ता भरायचा आहे, तर रू 5600 घ्यायला कधी येऊ? याने म्हटले की मी विमा हप्ता तर 5000 दरवर्षी भरतो आता 5600 कशाचे? विमा एजंट म्हणाला की, आता विमा हफ्त्यावरही जीएसटी लागू झालीय त्यामुळे यावर्षी पासून 5600 भरावे लागतील.एवढे बोलून त्याने फोन ठेवला. हा सुन्न होऊन विचारच करत राहिला, मी विमा कशाला काढला? म्हणून स्वतः ला दोष देत गाडी सुरू करून पुढे निघाला.

अगदी थोडचं दूर गेला असेल लगेच यांच्या वडिलाचा गावावरून फोन आला.वडील म्हणाले,बापू तू जे शेतात कचरा मारण्याच्या औषधांसाठी पैसे पाठविले ते कमी पडताहेत व खतांचे पैसेही कमी पडताहेत. हा म्हणाला मी तर मागच्या इतकेच पैसे पाठवले होते.वडील म्हणाले,अरे बाळा ती 70 रूपयांची कचरा मारणारी पुडी आता 120 रूपयांची झाली आणि खतांच्या चुंगडीवर 200 रू वाढलेत, तू आणखी पैसे पाठव, शेतात कचरा खूप झालाय व खताची गरज आहे. मी आणखी पैसे पाठवतो असे म्हणून याने फोन ठेवला पण मनात विचार केला की मागच्या वर्षी 70 रूपयाला मिळणारी पुडी आता 120 कशी व खताच्या बॅगवर 200 रू का वाढले? असं का होतंय याला कळेनासं झालं पण कामावर जायला उशीर होत असल्यामुळे हा तातडीने समोर निघाला.

मनात कुणाकुणाला पैसे द्यायचे याचा विचार करून गणित जमवू लागला. अचानक त्याला आठवलं की माझ्या मोबाईल चा रिचार्ज आज संपणार आहे त्यामुळे तो मोबाईल रिचार्ज करण्यासाठी एका नेहमीच्या दुकानात थांबला व त्याला मोबाईल नं सांगून 56 दिवसांचा रिचार्ज करण्यास सांगितले आणि खिशातून 500 रूपयांची नोट काढून त्याला दिली. दुकानदाराने रिचार्ज केला व आणखी 100 रू मागितले. याला राग आला हा दुकानदारावर चिडला,रिचार्ज करण्याचे 100 कशाचे? म्हणून उलट त्याला सुनवू लागला, शेवटी दुकानदाराने त्याला रिचार्ज चे रेट दाखवले, अहो साहेब मागच्या महिन्यापासून प्रत्येक रिचार्ज चे रेट वाढलेत, तुम्हाला माहिती नाही का? हा म्हणाला नाही, मी दोन महिन्यांपूर्वी रिचार्ज केला होता, असे म्हणून आणखी 100 रूपयाची नोट काढून त्याने दुकानदाराला दिली व दुकानाच्या बाहेर पडला. मनात, मी मोबाईल वापरणे बंद करतो असे ठरवून तो समोर निघाला.या नागरिकाची कंपनी छोटी आहे, जेमतेम 20 ते 25 लोक इथं काम करतात पण कंपनीच्या मालाची गुणवत्ता चांगली असल्यामुळे, अल्पावधीतच कंपनीची उलाढाल बऱ्यापैकी वाढली. हा नागरिक प्रामाणिक असल्यामुळे व कंपनीच्या स्थापनेपासून सोबत असल्यामुळे मालकाचा यांच्यावर विशेष जीव होता. शेवटी हा कंपनीत पोहचला. इमाने इतबारे आपले काम आटोपून आपल्या सहकाऱ्यांचा निरोप घेऊन,बाहेर पडतच होता की याला चपराश्याने आवाज दिला की, साहेब तुम्हाला बोलवत आहेत.

हा साहेबांच्या केबिनमध्ये गेला. साहेबांनी त्याला बसवले व म्हणाले की आता आपली कंपनी मोठ्या कंपनीत मर्ज (एकत्रीकरण) होत आहे कारण आता मोठ्या कंपन्या आम्हा साधारण कंपन्यांना जगू देणार नाही आणि जरी आम्ही जगायचं ठरवलं तरी त्यांच्याशी आम्ही स्पर्धा करू शकणार नाही. त्यामुळे आता आम्हाला त्यांना कंपन्या विकल्याशिवाय पर्याय नाही. याला सर्वस्वी जबाबदार सरकार असून फक्त दोन तीन लोकांच्या ताटात सरकारने सर्वच अर्थव्यवस्था देऊन टाकली आहे त्यामुळे त्यांनी अर्थव्यवस्थेत घुसून सर्वच काही घेणे सुरू करून एकाधिकारशाही निर्माण केलीय. त्यांच्यावर सरकारचा वरदस्त असल्याने त्यांना सर्वच मोकळीक आहे. त्यांच्या तुलनेत आपण माल विकू शकत नाही. वस्तुंच्या किमतीवर आता संपूर्णपणे त्यांचे नियंत्रण असून वाटेल तेवढ्या किंमत वाढविण्याचा सपाटा त्यांनी सुरू केलाय. भविष्यात ही महागाई प्रचंड वाढणार असून त्या काळात आमच्या सारख्या छोट्या कंपन्या गुदमरून मरणार आहेत. शिवाय त्यांच्याकडे भव्य प्रमाणात यांत्रिकीकरण असल्यामुळे तुमच्यासारख्या लाखो प्रामाणिक कामगारांना कामावरून काढण्यात येणार आहे.आपण जर त्यांना कंपनी विकली नाही तर आपल्याला कच्चा माल त्यांच्याच दुसऱ्या कंपनीतून येतो तो येणे बंद होईल किंवा त्याच्या किंमती कमालीच्या वाढविल्या जातील त्यामुळे या सर्व भविष्यातील घटना लक्षात घेता मी ही कंपनी विकण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही आम्हाला कंपनीच्या सुरूवातीपासून साथ दिलीय त्यामुळे मला तुम्हाला हे सर्व सांगणे आवश्यक आहे. आपल्या सर्वच कामगारांना आम्ही पुढच्या आठवड्यापासून बंद करत आहोत आणि आता तुम्ही सर्व तुमच्या नवीन रोजगाराच्या शोधात लागा अशी तुम्हाला नम्र विनंती करत आहोत.

या आठवड्यात तुमचा सर्वांचा हिशोब करून सर्वांशी बोलून आम्ही कंपनी बंद करून, ही कंपनी‌ मोठ्या कंपन्यांच्या स्वाधीन करीत आहोत.हा नागरिक निमुटपणे मालकाचे अर्थशास्त्र समजून घेत होता पण ते सर्व याच्या डोक्यावरून जात होते या सर्व संभाषणात “हे सर्व सरकार करत आहे” व “नवीन रोजगार बघा” हेच दोन वाक्य त्याच्या लक्षात राहिले. तो उठला आणि काही प्रतिक्रिया न देता निघला.

यानंतर कामावर यायचे नाही, नवीन काम शोधायचे इतक्या वर्षांची सवय अचानक कशी मोडायची? एकंदरीत हे सर्व आठवत तो शून्यात बघत गाडी कडे आला व दुचाकी सुरू करून घराकडे निघाला. मनात मात्र, आता काय करायचं? कुणा कुणाला किती पैसे द्यायचे आहेत? आता पैसे कुठून आणायचे? नवीन काम कुठं मिळेल? मिळेल तरी, किती पैसे मिळतील? दुसरी कंपनी घराजवळ राहील का? नवीन ठिकाणी कंपनी मिळाली तर तिकडे बस्तान बसवायला किती त्रास होईल, ती कंपनी सुध्दा बंद झाली तर, असे असंख्य विचार त्याच्या मनात घोंघावत होते. अचानक घराकडे परततांना त्याला मघाचा त्याच्या पक्षाचा बॅनर दिसला, त्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली व त्या बॅनरवरील नेत्याकडे बघत म्हणाला,तुम्हाला रोज बघतो साहेब, बरं वाटते, टिव्ही रोज तुमच्याबाबत चांगलं चांगलं सांगते, तुम्ही खूप विकास करत आहात असं नेहमीच म्हणते पण तुमच्या या विकासात आज माझी नोकरी का गेली? तुमच्या या मोठ्या विकासात आमची छोटी कंपनी का बंद पडली, तुम्हाला पाहूनच मुलाचं नाव विकास ठेवलाय आता त्याच्या नावाचं अर्थ काय काढू?

तो आजचं पहिल्यांदा शाळेत गेलायं, सरकारी शाळा दिसल्या नाही म्हणून बायकोच्या बचत गटातून कर्ज काढून त्याच्या नर्सरीची फी भरली, पुढच्या वर्षी अजून कर्ज काढीन पण त्याला शिकवीन‌ कारण तुमचा विकास मला त्याला दाखवायचा आहे, चुकीच्या माणसाला मत दिल्याचे परिणाम त्यालाही सांगायचे आहेत.कदाचित पुढचा सिलेंडर भरतांना मला आणखी पैसे जमवा लागतील, लाईट कापण्याची तर साहेब मला दर महिन्याला धमकी येते, वडील थकले आता पण आमची शेती थकली नाही,कदाचित पुढच्या वेळी शेती पडीत राहील नाहीतर विकावी लागेल, आता मला प्रत्येक महिन्याच्या अखेर हातऊसने पैसे मागावे लागतात, पगार वाढूनही पुरत नाही आता, आधी पगार कमी असतांनाही शेपाचशे पगारातून उरायचे, आता बचत नावाचा शब्द आमच्या सारख्या गरीबांना दुर्मिळ झालायं, मी गरीब असूनही घाबरत नव्हतो पण आज मला आर्थिक असुरक्षितता वाटत आहे.

मी खूप मेहनती आहे पण मला आज काम नाही, माझी स्वप्न मोठी नाहीत तरी मी समाधानी का नाही, गाडी जूनी असल्यामुळे एवरेज कमी झाला म्हणून दोनदा कार्बोरेटर साफ केला पण नंतर मेकॅनिक म्हणाला पेट्रोल महाग झाला आता, कदाचित विमा पॉलिसी आता मला बंद करावी लागेल तीचे हफ्ते ही आपण महाग केलेत तिच्या भरवश्यावरच तर आमच्या सारखे गरीब जगण्याचा कमी व मरण्याचा समाधान मानत होते, आता टिव्ही वर तुमची स्तुती ही कमी ऐकायला येईल किंवा बंद होईल कारण त्याचाही रिचार्ज आपण महाग केलात, आई नसलेल्या लहान पोराबारांच्या दुधावरही जीएसटी लावली साहेब, असे करतांना थोडीशी ही शरम वाटली नाही आपल्याला.

मी खूप शिकलो नाही त्यामुळे मला तुमचे अर्थशास्त्र कळत नाही पण एवढं समजते, आम्ही सामान घेतो म्हणून तुम्हाला जीएसटी मिळते उद्या आम्ही सामानच घेऊ शकलो नाही तर काय भुरका जमा करणार का? तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला म्हणून आज माझ्यासारख्या 20,25 जणांची नोकरी गेली पण लक्षात ठेवा उद्या तुमच्या राजेशाही थाटाला भगदाड पाडायला आम्हीच येऊ.जातो साहेब, कमी शिकला असल्यामुळे जास्त बोलणे येत नाही, पण घरी जाऊ की नाही आज कळत नाही, मुलगा शाळेतून आला असेल त्याला बघायची खूप इच्छा आहे, तो मला आज शाळेतील गंमती जंमती सांगणार आहे पण नंतर भूक लागली म्हणणार आहे. त्याचा “भूक लागली” हा शब्द ऐकायची माझ्यात हिंमत नाही. एवढे बोलून हा एक भारतीय नागरिक मतदार होऊन हरवलायं?. पण अद्याप घरी पोहचला नाही,असा नागरिक कुणालाही दिसल्यास दुसऱ्या नागरिकाला अवश्य कळवावे.

✒️संकलन:-सागर रामभाऊ तायडे,भांडूप,मुंबई(मो:-९९२०४०३८५९)