बैलांप्रती एक दिवस उतराईची संधी!

33

(पिठोरी अमावस्या- बैलपोळा विशेष)

श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पहायला मिळते. अनेक सण या महिन्यात आपल्या भेटीला येतात. पावसाचे दिवस असल्याने सृष्टी आधीच हिरवाईचा शालू नेसून नव्या नवरीवानी सजलेली असते. संपूर्ण वातावरणात एक प्रकारचा गारवा पसरल्याने मानवी मन देखील ताजे तवाने झालेले असते. अशा या श्रावण महिन्यात आपण नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांसारखे सण साजरे करतो आणि या श्रावण महिन्याची सांगता होते ती श्रावण महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या पोळा या सणाने! तो बैलपोळा व तान्हापोळा असा दोन दिवसांचा असतो. पोळ्याची गाणी- झडत्यांमुळे सानाथोरांचे खुप मनोरंजन होते-

पोया रे पोया, बैलांचा पोया।
तुरीच्या दायीने, मारला हो डोया।।
कांद्याने आमचे, केले हो वांदे।
ऊसवाला बाप, ढसा ढसा रडे।।
एक नमन गौरा पार्बती; हर बोला, हर हर महादेव..!

श्रावण अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्येला शेतकरी बांधव आपल्या सर्जा-राजाचा हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतांना आपल्याला दिसतात. पुणे मुंबई यांसारखी मेट्रो शहरे या सणाविषयी कदाचीत अनभिज्ञ असावीत, एवढी ती वाढली आहेत. या शहरांची धावपळ पाहिली, की पोळा या सणाची यांना काही माहिती आहे की नाही, असे वाटते. परंतु या शहराच्या आसपासची गावे आणि संपूर्ण महाराष्ट्रात बळीराजा मात्र आपल्या जिवाभावाच्या सोबत्याचा हा सण अत्यंत पारंपारिक पध्दतीने आजही साजरा करतांना दिसतो. पोळा या सणाच्या आदल्या दिवशी बैलांना रितसर आमंत्रण देण्याची पध्दत आहे बरं का? शेतकरी प्रेमाने बैलांना म्हणतो, की आज आवतन घ्या; उद्या जेवायला या! वरून झडती हाक-

वाटी रे वाटी खोबऱ्याची वाटी|
महादेव रडे दोन पैश्यासाठी||
पार्बतीच्या लुगड्याले छप्पन गाठी|
देव कवा धावल गरिबांसाठी?
एक नमन गौरा पर्बती; हर बोला, हर हर महादेव..!

असे आमंत्रण या बैलांना दिले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी बैलांना नदीवर नेले जाते, त्यांना झकास अंघोळ घालण्यात येते. घरी आणल्यावर त्यांच्या सर्वांगावर गेरूचे ठिपके दिले जातात. शिंगाना आरसे, चवारे, बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा घातल्या जातात. पायांमध्ये चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालतात. नवी वेसण नवा कासरा घातल्यानंतर अंगावर रेशमी नक्षीकाम केलेली झूल पांघरली जाते. कैलासातील महादेवाच्या नंदीलाही लाजवेल, अशी बैलजोडी शृंगारली जाते. जनावरांचा गोठा स्वच्छ करण्यात येतो. घरातील सुवासीनी बैलांची विधीवत पूजा करतात. बैलांकडून पोळ्याच्या दिवशी कोणतेही काम करून घेतले जात नाही. गोडधोड, पुरणपोळीचा घास त्यांना भरवला जातो. बैलांची कायम निगा राखणाऱ्या बलक्याला- गड्याला नवे कपडे दिले जातात. बालपणी आपण त्यांच्या सजण्याचे वर्णन कवितेतून वाचत होतो-

शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली!
चढविल्या झूली, ऐनेदार!!

बैलांचे जेवण झाल्यानंतर सायंकाळी त्यांना गावाबाहेर मंदिरात नेले जाते. सर्व शेतकरी आपापल्या जोड्या घेऊन असल्यास मारुतीच्या मंदिराजवळ किंवा एका ठिकाणी एकत्र येतात. आंब्याच्या पानांचे तोरण बांधून बैलांना रांगेत उभे करण्यात येते. ढोल, ताशे, नगारे आदी वाद्य वाजवले जातात. झडत्या- पोळ्याची गाणी म्हटली जातात. येथे बैलांच्या शर्यती देखील आयोजित केल्या जातात. ज्याच्या जोडीला सर्वात चांगले तयार केले वा सजवले असेल, त्या जोडीला पारितोषीक दिले जाते. आपापल्या गावातील परंपरेनुसार उत्सव साजरा झाल्यानंतर किंवा पोळा फुटल्यानंतर कार्यक्रम संपन्न होतो. घरी निघतांना बैलांना घरोघरी नेल्या जाते. तेथे आयाबाया बैलांची पूजा करतात. बैल नेणाऱ्यास बोजारा- पैसे देण्याची प्रथा रुढ आहे. हिंदू संस्कृतीत वृक्षांप्रमाणेच वन्यजिवांना देखील पुजनीय मानल्या जाते. झडती खुणावते-

पोळा रे पोळा, पाऊस झाला भोळा!
शेतकरी हीतासाठी, सगळे व्हा गोळा!
एक नमन गौरा पर्बती; हर बोला, हर हर महादेव..!!

वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलांप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणून पोळा या सणाकडे आपण पाहातो. पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरांप्रमाणे हे उत्सव आजही गावागावांमधून उत्साहात साजरे होतांना आपल्याला दिसतात.

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे बैलपोळा सर्व शेतकरी बांधवांना सुख समृद्धीवर्धक ठरो!!

✒️एक शेतकरीपुत्र:-श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे.
रामनगर- गडचिरोली, ७७७५०४१०८६.