सुस्वभावाला मर्यादा नाही

32

सहनशिलता, नम्रता, सौजन्यशिलता असे गूण अंगिकारून माणूस इतरांच्या नजरेमध्ये सहज सुस्वभावी बनून राहू शकतो. रागामूळे व्यक्त होऊन स्वतः जरी मोकळेपणा अनुभवीत असलो, तरी त्यामागे आपण आपले प्रतिस्पर्धी, शत्रूच जास्त वाढवित असतो. जगातील कोणत्याही एका मतावर सर्वांचेच एकमत होणे शक्य नाही, मग आपल्या मताशी इतरांनी सहमत व्हावे असा आग्रह धरणे म्हणजे वादाची सुरूवात. वादामध्ये आपण आपल्या विद्वत्तेप्रमाणे हरतो किंवा जिंकतो. जरी जिंकलो तरी आपलेच बरोबर आहे असे होत नाही, कारण वाद थांबविण्यासाठी स्तब्ध राहिलेलाच खर्‍या अर्थाने जिंकलेला असतो. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण थोडीसी माघार घेवून आपले मित्र, आपली माणसे आपण टिकवून ठेवू शकतो, पण खरी अडचण तेव्हा निर्माण होते, जेव्हा *नेहमी मीच का?* असा प्रश्न निर्माण होतो. यावर एक दृष्टान्त द्यावासा वाटतो.

एकदा एक संत नदीमध्ये आंघोळ करीत असताना एक विंचू पाण्यात वाहून जाताना दिसला. संतांनी ते पाहिले आणि आपल्या ओंजळीत धरून त्या विंचवाला उचलले, तसे विंचवाने नांगी मारून संताच्या हाताला जखमी केले. वेदनेने विव्हळत संतांनी हात झटकले तसा विंचू पून्हा पाण्यात पडला. संतांनी पून्हा विंचवाला उचलले आणि विंचवाने पून्हा नांगी मारली. हे वारंवार घडत होते पण कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते. शेवटी न राहवून किनार्‍यावर उभे असणार्‍या वारकर्‍याने विचारलेच, “अहो महाराज तो विंचू आहे, नांगी मारणे कधीच सोडणार नाही, तरीही तुम्ही त्याला वारंवार का वाचविण्याचा प्रयत्न का करीत आहात?”

संतांनी उत्तर दिले, “बरोबर आहे तुझं, विंचू आहे तो कधीच नांगी मारण्याचा त्याचा स्वभाव सोडणार नाही, मग मित्रा मी तर माणूस आहे, मग माझा वाचविण्याचा स्वभाव मी कसा सोडू!” असे म्हणत शेवटी संतांनी विंचवाला किनार्‍यावर आणलेच.

वरील दृष्टान्तामध्ये संताच्या जागी आपण आहोत आणि विंचवाच्या जागी आपला समाज आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव आहे, त्यांनी आपला स्वभाव बदलावा अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपणच सुस्वभावी झालो, तर अडचणच येणार नाही.बर्‍याच वेळा आपण माफी मागून वाद टाळतो आणि मित्रत्व जपतो, पण एक-दोनदा असेच झाल्यानंतर तिसर्‍यांदा मात्र आपण नेहमी मीच माफी का मागावी असा अहंभाव निर्माण होऊन आपण ते टाळतो. नेमकी हिच चूक आपल्याला आपला सुस्वभाव टिकविण्यास अडसर होते आणि आपण माणसांपासून दुरावतो. नविन सून जेव्हा घरात येते, तेव्हा ती सर्वांच्या मताचा आदर करीत असते, इतरांचे बोलणे वाईट वाटत असले, तरी सहन करीत असते. हे करून आपल्या नम्रतेचे आणि सौजन्यशिलतेचा परिचय इतरांना करून देत असते. हळूहळू कुटूंबातील व्यक्तींचा तिच्याप्रत आदरभाव निर्माण होत असतो, पण तो पूर्णत्वास जाण्याअगोदरच *किती दिवस सहन करायचे?* असा प्रश्न निर्माण होतो आणि आजपर्यंत दाखविलेल्या नम्रता आणि सौजन्यशिलतेची वाट लागलेली असते.

यावरून अन्याय सहन करा असे मी मूळीच म्हणत नाही, पण तो अन्याय थांबविण्यासाठी लढाईपेक्षा सौम्य शस्त्रे असताना त्यांचा वापर करणे काय वाईट आहे. मात्र त्यातून मिळणारे परिणाम तात्काळ मिळतील असे नाही, त्यासाठी वाट पहावी लागते. सहनशील किंवा नम्र असणे याचा अर्थ भित्रा असणे असे नाही, उलट सहनशील किंवा नम्र असण्यासाठी, माफी मागण्यासाठी खूप मोठे धाडस लागते. धाडस न करू शकणारेच वाद करतात आणि आपली माणसे गमावून बसतात.

✒️नंदकिशोर मसराम(मो:-8275187344)