‘त्या’ नक्षलवाद्याची ओळख पटली; ‘हे’ रेकॉर्ड धडकी भरवणारं!

16

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(5 जुलै):-पोलिसांच्या सी-६० कमांडो पथकाने एलदडमी जंगलात केलेल्या कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव शंकर उर्फ सोमा असून तो पेरमिली दलम कमांडर होता व त्याचा गडचिरोली जिल्हा तसेच तेलंगण राज्यातील विविध नक्षलवादी कारवायांमध्ये सहभाग होता, असे स्पष्ट झाले आहे.

सी-६० कमांडो पथकाने शुक्रवारी सायंकाळी केलेल्या कारवाईदरम्यान झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी मारला गेला होता तर बाकीचे नक्षलवादी जंगलात पसार झाले होते. या नक्षलवाद्याची लगेचच ओळख पटली नव्हती. घटनास्थळी आढळलेले अनेक पुरावे व पोलीस रेकॉर्ड तपासल्यानंतर त्याआधारे आता या नक्षलवाद्याची ओळख पटली आहे. अभिलाष कोटे उर्फ चंदर उर्फ शंकर उर्फ सोमा (३६) अशी विविध नावे धारण करून हा नक्षलवादी वावरत होता. तो तेलंगणमधील कारापल्ली येथील रहिवाशी होता, असे रेकॉर्डवरून स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर ८ लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या नक्षलवाद्यावर खूनाचे तब्बल पाच गुन्हे दाखल आहेत. त्याशिवय जाळपोळ, अपहरणाचे विविध वीस गुन्हेही त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. तो पेरमिली दलमचा कमांडर होता. महाराष्ट्र व तेलंगण राज्यात मिळून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे किमान १५ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

नक्षलवाद्यांचे प्रशिक्षण शिबीर उद्ध्वस्त:-

गडचिरोली पोलिसांच्या सी-६० कमांडो पथकाने एलदडमी जंगलात धाडसी कारवाई करत नक्षलवाद्यांचे शिबीर उद्ध्वस्त केले होते. काल ही कारवाई करण्यात आली होती. यावेळी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शंकर मारला गेला होता. एलदडमीच्या जंगलात नक्षलवाद्यांचे प्रशिक्षण शिबीर सुरू असल्याची खात्रीशीर माहिती कमांडो पथकाला मिळाली होती. मोठा घातपात घडवण्याच्या उद्देशाने हे शिबीर घेण्यात येत असल्याचेही सूत्रांकडून कळले होते. त्या पार्श्वभूमीवर घातपाताआधीच नक्षलवाद्यांचे शिबीर उधळण्याची योजना पोलिसांनी आखली. त्यानुसार नियोजनबद्धरित्या धडक देऊन हे शिबीर उधळण्यात आले होते. सुमारे एक तास कमांडो व नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. चकमक संपल्यानंतर घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा वा नक्षलवादी चळवळीशी संबंधित साहित्य आढळून आले आहे. या कारवाईनंतर पसार झालेल्या नक्षलवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे. एलदडमीच्या जंगलात कालपासून शोधमोहीम सुरू आहे.