बीडमध्ये बोगस पीआर कार्डचा घोटाळा; जवळपास 2 हजार बोगस कार्ड काढल्याचा आरोप

28

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.26ऑगस्ट):-जिल्ह्यात पीआर कार्डचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. एकट्या बीड शहरातील तब्बल 2 हजार पीआर कार्ड बोगस असल्याचा आरोप तक्रारदार आणि सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या रामनाथ खोड यांनी केला आहे. बीड शहरात आतापर्यंत देवस्थान आणि व बोर्डच्या जमीनीवर डल्ला मारण्याचे समोर आले होते. मात्र आता बीड (Beed) शहरातील जवळपास 2 हजार पीआर कार्ड बोगस असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आल आहे. विशेष म्हणजे जे व्यवहार झालेत, ते व्यवहार कोणत्या आधारावर केले आहेत यासाठी असणारी जी मूळ संचिका आहे, ती देखील भूमि अभिलेख कार्यालयाकडे नाही. त्यामुळे हे कागदपत्र भूमि अभिलेख अधिकाऱ्याने कोणत्या आधारावर बनवले असा सवाल देखील उपस्थित झाला आहे.

विशेष म्हणजे बीड शहरातील मोंढा भागात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावाने वादग्रस्त असलेलं 2 हेक्टर 80 आर क्षेत्र असल्याचं दाखवण्यात आले आहे. मात्र या सर्व जागेची भूखंड माफियांकडून परस्पर विक्री केली जात आहे. एकट्या बीड शहरात पीआर कार्डचा 1 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा हा घोटाळा असू शकतो. असं आरोप देखील यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि तक्रारदार रामनाथ खोड यांनी केला आहे. तर या तक्रारी करत असल्याने पोलिसांमार्फत दबाव टाकला जात आहे. आतापर्यंत 5 ते 6 नोटीस पोलिसांकडून मला दिल्या आहेत. असा आरोप देखील यावेळी रामनाथ खोड यांनी केला आहे. दरम्यान बीड शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात पीआर कार्डचा घोटाळा समोर आल्यानं, या घोटळेबाजांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करावी. अशी मागणी केली जात आहे.