पांढरवाडी फाटा येथील कार डेकोरचे दुकान फोडून ४ लाखांचा ऐवज लंपास

57

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.26ऑगस्ट):-शहरानजीक पांढरवाडी फाटा येथील कार डेकोरचे दुकान फोडून ४ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. २३) रात्री घडली. गेवराई शहरातुन तीन दिवसात तीन मोटारसायकल चोरट्यांनी पळवल्या आहेत. दरम्यान, सततच्या या चोरीच्या घटनांमुळे गेवराई शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

गेवराई शहरासह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून रोज कुठे ना कुठे चोरी करून हे चोरटे पोलिसांना आव्हान देत आहेत. दरम्यान, दि.२३ रोजी रात्री चोरट्यांनी शहरानजीक पांढरवाडी फाटा येथील देवांश कार डेकोर या दुकानाच्या शटरच्या पट्ट्या तोडून आत प्रवेश करत कार डेकोरेशनच्या साहित्य व रोख रक्कमेसह एकूण चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक बोडखे हे करत आहेत.

शहरातून तीन दिवसात तीन मोटारसायकल चोरीला

गेवराई शहरात सतत सुरू असलेल्या चोरीच्या ईतर घटनेसह वाहन चोरीच्या घटना या सुरूच असून गेल्या तीन दिवसात शहरातून एक बुलेट व अन्य दोन आशा तीन मोटारसायकल चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. यामध्ये रमेश गोरख राठोड यांची बुलेट नाईक नगर येथून तर ज्ञानेश्वर तात्याराव कारके यांची बजाज कंपनीची मोटार सायकल भगवती टॉकीज परिसरातून चोरट्यांनी लंपास केली आहे. शहरात सतत घडत असलेल्या वाहन चोरीच्या घटनेमुळे वाहन धारकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.