आपले गुरुजी मोहिमेअंतर्गत वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्यास शिक्षक भारतीचा तीव्र विरोध

33

🔸वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय रद्द करण्याची शिक्षक भारतीची मा. मुख्यमंत्र्यांकडे मागणी

🔹29 आँगस्टला सर्व शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.28ऑगस्ट):-मंत्रिमंडळात झालेल्या चर्चेनुसार शिक्षण आयुक्त पुणे यांनी 24 ऑगस्ट 2022 रोजी राज्यातील शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांना विसीद्वारे ए फॉर साईज पेपरवर शिक्षकांचे वर्गात फोटो लावण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे. या दोन्ही घटना समाज व्यवस्थेतील शिक्षकांच्या सन्मानाला धक्का देणाऱ्या आहेत. शासन पातळीवर जाणीवपूर्वक शिक्षकांना बदनाम करून अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यभरातील शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून *आम्हाला शिकवू द्या* अभियान चालवून शिक्षकांना वर्गात शिकवू देण्याची मागणी करत आहेत.

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राला पुन्हा नंबर एक वर आणण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम देण्याची गरज असताना शिक्षण विभाग शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण करत आहे. विविध शैक्षणिक कामांचे ओझे शिक्षकांवर लादून शिक्षकाचा वेळ वर्गात शिकवण्यापेक्षा इतर कामांमध्ये कसा जाईल, त्याचा परिणाम म्हणून शैक्षणिक दर्जा राखण्यात शिक्षकांना अपयशी कसे ठरवले जाईल आणि अखेर त्याचे खापर शिक्षकांच्या माथ्यावर फोडून अनुदानित शिक्षण व्यवस्था बंद करण्याचा घाट शासनाने सुरू केला आहे. शिक्षक भारती याचा तीव्र निषेध करते.

शनिवार दिनांक 27 ऑगस्ट 2022 रोजी शिक्षक भारतीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य आणि जिल्हाध्यक्ष यांनी उपरोक्त मुद्द्याबाबत सविस्तर चर्चा केली. राज्याध्यक्ष अशोक बेलसरे आणि प्राथमिक शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांनी सभेत कृती कार्यक्रम ठरविला आहे. वर्गात फोटो लावण्याचा निर्णय रद्द न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलनाचे स्वरूप व माहिती नंतर देण्यात येईल, अशी माहिती शिक्षक भारती राज्य संयुक्त कार्यवाह संजय खेडीकर, नागपूर विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे, सल्लागार रावण शेरकुरे, जिल्हाध्यक्ष भास्कर बावनकर, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम टोंगे, राकेश पायताडे, सतिश डांगे, उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश हटवार, अनिल वासेकर,अनिल दहेकर,गंगाधर खिरटकर, बजरंग जेनेकर, महेश भगत, रामदास कामडी, राबिन करमरकर, जब्बार शेख, नंदकिशोर शेरकी, निर्मला सोनवने, रोहिणी मंगरुळकर,रंजना तडस आदींनी दिली आहे.