शासनाची मदत पोहचलीच नाही ,पुरामुळे सणावरही विरजण शासनाचे केवळ आश्वासनच:- पियूष रेवतकर

29

🔹शासनाचे पंचनामे अजून किती दिवस कागदावरच असणार? संभाजी ब्रिगेडचे पियूष रेवतकर यांचा सवाल

✒️वर्धा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वर्धा(दि.30ऑगस्ट):-कृषी संस्कृतीतील बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अतिमहत्त्वाचा आहे. शेती जगतात बैल पोळा सणाला खूप महत्त्व आहे. कारण ज्याच्या भरोशावर शेतीचा हा डोलारा उभा केला जातो, त्या बळीराजाच्या ढवळ्या-पवळ्याचा सण असतो. परंतु मागील काही दिवसांत अतिवृष्टीमुळे बळीराजा नेहमीप्रमाणे यंदाही संकटात भरडला गेला आहे.जुलैपासून ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्र हजारो हेक्टर आहे. महसूल व कृषी विभागाने बाधित क्षेत्राचे पंचनामे केले आहे. बाधित शेतकऱ्यांची आकडेवारी अद्यापही कागदावरच आहे. त्यांच्या नजरा आता मदतीकडे लागल्या आहे. हाती पैसा नसल्याने सणावर विरजण पडले आहे.

बैल पोळा सण हा शेतकऱ्याचा ३६५ दिवस शेतात राबणाऱ्या सर्जा राजाचा मौल्यवान सण आहे. हा सण मोठ्या उत्साहात शेतकरी साजरा करतात. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील काही दिवसांत अतिवृष्टी झाली व त्यात शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. शासनाच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे लागले होते. पण शासनाची आकडेवारी तीन हेक्टरपर्यंत करण्याची घोषणा फक्त कागदावरच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
शिंदे व भाजप सरकार स्थापन झाल्यांनतर अतिवृष्टीमुळे बाधित असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वाढीव मदत तीन हेक्टरपर्यंत करण्याची घोषणा केली. परंतु त्याचे लेखी आदेश संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत काल परवा पोहचल्याचे सांगण्यात येत आहेत. पंचनामा केलेली आकडेवारी ही कागदावरच राहणार की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

*पोळ्याच्या सणावर निराशा*

पोळ्याचा सण म्हटले की शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. या दिवसाची शेतकरी आतुरतेने वाट बघतात. आपल्या ढवळ्या-पवळ्याला चांगल्या प्रकारे सजवून त्यांची पूजादेखील करतात. परंतु यावर्षी शेतीला वारंवार आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला तोड द्यावे लागत आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या हौसेने साजरा होणारा हा सण यंदा मात्र निराशाजनक गेला. काही शेतकऱ्यापाशी तर हा सण साजरा करण्यासाठी पैसे देखील नाही. अशी वाईट परिस्थिती होती.