शेतीसंदर्भात शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावे:- रवींद्र भोसले

  49

  ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  ?कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त नंदगूर येथे शेतकरी संवाद व शिवार फेरी

  चंद्रपूर(दि.5जुलै): जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी शेतकऱ्यांनी शेती संदर्भात नवनवीन प्रयोग करावे, यासाठी प्रगतशील शेतकऱ्यांची मदत घ्यावी असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक नागपूर रवींद्रजी भोसले यांनी केले. कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त चंद्रपूर तालुक्यातील नंदगूर येथे शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

  संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै ते 7 जुलै कृषी संजीवनी सप्ताह सुरू आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांशी संवाद तसेच शेतकऱ्यांना कृषी व कृषी संलग्न योजनांची माहिती व्हावी तसेच  या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा हे या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे.

  यावेळी चोरगाव येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग कोकोडे आणि नंदगूर येथील भाविक कन्नाके यांचा शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विभागीय कृषी सहसंचालक रविंद्रजी भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्ह्यामध्ये अनेक प्रगतशील शेतकरी आहेत. तसेच शेती संदर्भातील नवनवीन प्रयोग शेतकरी करीत असतात. या प्रगतशील शेतकऱ्यांचे अनुकरण इतरही शेतकऱ्यांनी करावे,असे आवाहन देखील विभागीय कृषी सहसंचालक रविंद्रजी भोसले यांनी शेतकऱ्यांना केले.

  प्रगतशील शेतकरी पांडुरंग कोकोडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शेतीचे उत्तम नियोजन केले तर शेती शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देऊ शकते. शेतीच्या खर्चाचा आणि उत्पन्नाचा चांगला लेखाजोखा त्यांनी यावेळी सादर केला.

  दरम्यान, नंदगूर येथील भाविक  कन्नाके यांच्या शेतामध्ये त्यांनी शिवार फेरी केली.यावेळी त्यांनी मत्स्यशेती,भात शेती व भाजीपाला लागवडीची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी एखाद्या उद्योजक प्रमाणे शेतीचा हिशेब ठेवून स्वतः शेतीचे चांगले उद्योजक बनावे, अशी अपेक्षा उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन करून व्यक्त केली.

  यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप वाहने, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, तसेच क्षेत्रिय कर्मचारी, शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.