‘देशाला नेतृत्व देणारी पिढी घडविण्याकरिता एकत्र काम करू या’

🔸विद्यापीठ विकास मंच तर्फे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत (दादा) पाटील यांचा सत्कार

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.1सप्टेंबर):-“उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय हे एक उत्तम प्रकारे काम करण्याचे खाते मला मिळाले आहे यामध्ये चांगल्या प्रकारे काम करून देशाला आणि अन्य राज्यांना उत्तम प्रकारे नेतृत्व देणारी पिढी घडवण्याचे काम आपल्याला एकत्रपणे करता येईल. याकरिता देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पाया जीवनात उपयोगी पडणारे शिक्षण, व्यवसायाभिमुख शिक्षण हा आहे. भारतीयता हा या शैक्षणिक धोरणाचा गाभा असून शिक्षण मातृभाषेत मिळणार आहे. मात्र याकरिता सगळ्यांना एकत्र घेऊन समन्वयाने काम करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत (दादा) पाटील यांनी केले.

कोल्हापुरचे सुपुत्र, शैक्षणिक क्षेत्राशी सुपरीचित विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते , पूर्व राष्ट्रीय महामंत्री, पुणे पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले आमदार, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद भूषविलेले वरिष्ठ नेते मा. नामदार चंद्रकांत (दादा) पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून कार्यभार नुकताच स्वीकारला. यानिमित्ताने विद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ विभाग, संस्थाचालक व शैक्षणिक परिवारातील मान्यवर यांच्या वतीने मा. नामदार चंद्रकांत (दादा) पाटील यांचा सत्कार विद्यापीठ विकास मंच महाराष्ट्र राज्यचे प्रदेशाध्यक्ष प्रा. एन. डी . पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

समारंभाचे अध्यक्ष प्रा. एन. डी . पाटील म्हणाले कि विद्यापीठ विकास मंचची स्थापना शिक्षक पालक विद्यार्थी आणि शिक्षण संस्था या सर्वांचे हित जोपासत विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत विद्यापीठाची एक चांगली रचना करीत आदर्श व राष्ट्रप्रेमी विद्यार्थी घडविण्यासाठी गेले चोवीस वर्षे कार्यरत आहे. उत्तम संस्कार केल्यास विद्यार्थी अधिक चांगला नागरिक बनतो. समाजाभिमुख विद्यार्थी अभ्यासक्रम राबवणे ही काळाची गरज आहे. यातूनच राष्ट्रीय मूल्यांची जोपासना होणार आहे. दादांच्या माध्यमातून शैक्षणिक घटकांची चांगल्याप्रकारे वाटचाल देशहितासाठी होणार आहे. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वसमावेशक,विद्यार्थी केंद्रित व शिक्षक अधिष्ठित असून भारतीय शिक्षण प्रणालीचा सुवास असणाऱ्या या धोरणाची आपल्या कारकिर्दीत योग्य प्रकारे अंमलबजावणी होईल. हे करीत असताना शिक्षण संस्था व विद्यापीठे यांच्या समोरील समस्यादेखील योग्य प्रकारे हाताळले जातील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी विद्यापीठ अधिसभा सदस्य संजय परमणे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमात शिक्षणक्षेत्रातील अभ्यासक, शिक्षण संस्थाचालक तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांसंदर्भात मंत्री महोदयांना निवेदन दिली. या कार्यक्रमास माजी कुलगुरू प्रा. नितीन करमळकर, पुणे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे, मुकुंदराव भावे, संजय घोडावत विद्यापीठाचे विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, डॉ. वासंती रासम, शिवाजी विद्यापीठातील सिनेट तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. एन. बी. गायकवाड, संजय परमणे, विशाल गायकवाड, महेश निलजे, विवेक मंद्रुपकर, अनिरुद्ध कोल्हापुरे, केशव गोवेकर, अभिजित पाटील, स्वागत परुळेकर, गुरुदत्त खानोलकर, भारत खराटे, विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष आनंद खामकर, शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असणारे 75 संस्थांचे प्रतिनिधी, संस्थाचालक व शैक्षणिक परिवारातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत विद्यापीठ विकास मंचच्या कोल्हापूर विभागाचे निमंत्रक व सिनेट सदस्य श्री. पंकज मेहता यांनी केले.

प्रास्ताविक व अधिसभा सदस्यांच्या गेल्या पाच वर्षातील कार्याचा आढावा शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे मा. कुलपती नियुक्त सदस्य श्री. अमित कुलकर्णी यांनी केले. मान्यवरांचा परिचय अधिसभा सदस्य विशाल गायकवाड यांनी करून दिला. आभार प्रा. राहुल माने यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिसभा सदस्य संजय परमणे यांनी केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED